व्यायामवेडी

281

>> वरद चव्हाण

कश्मीरा कुलकर्णी. सर्वसाधारणतः व्यायामाचे वेड हे पुरुषांमध्ये आढळते. पण सेटवरही व्यायामाची साधने घेऊन जाण्याइतके वेड कश्मीरामध्ये आहे.

नमस्कार, फिटनेस फ्रिक्स! 2020 ची सुरुवात झाली आहे, नवीन दशकाची सुरुवात झाली आहे. केलेले संकल्प पाळताय ना? नक्कीच पाळत असाल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आता वेळ आहे आपल्या 2020 च्या पहिल्या सेलिब्रिटीची. या सेलिब्रेटीला मी ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेमुळे भेटलो. व्यायाम, अध्यात्म आणि आयुर्वेदाची संपूर्ण माहिती आहे या आजच्या सेलिब्रिटीला. अध्यात्माची तर इतकी आवड की, 31 डिसेंबरला जेव्हा आपण सगळे पार्टीच्या मूडमध्ये असतो तेव्हा हिने नवीन वर्षाचे स्वागत ‘गिरनार पर्वतावर’ जाऊन केले. आजची आपली फिट सेलिब्रिटी आहे ‘कश्मीरा कुलकर्णी’. कश्मीरा अभिनेत्री होणार हे विधात्यानेच (देवानेच) ठरवलं होतं. सांगतो कसं ते! कश्मीराची आई गर्भवती असताना तिच्या आई-बाबांचा लग्नाचा वाढदिवस होता. कश्मीराच्या बाबांना वाटलं हा वाढदिवस आपण चित्रपट बघून साजरा केला पाहिजे. म्हणून दोघं सांगलीच्या एका चित्रपटगृहात ‘नाचे मयुरी’ हा चित्रपट बघायला गेले होते. पण चित्रपट सुरू असतानाच कश्मीराच्या आईला लेबर पेनचा त्रास होऊ लागला. ऍम्ब्युलन्स येईपर्यंत कश्मीराचा जन्मच चित्रपटगृहात झाला आणि आपली मुलगी अभिनेत्रीच होणार असं कश्मीराच्या आईने ठरवलं. कश्मीराला लहानपणापासूनच मैदानी खेळ खेळण्याची प्रचंड आवड. कबड्डी राज्यस्तरीय व व्हॉलीबॉल राष्ट्रीयस्तरापर्यंत कश्मीरा खेळली आहे. ‘योगा’ शिकण्याची लहानपणापासून प्रचंड आवड. मैदानी खेळ, व्यायाम याची इतकी आवड की, ती आमच्या शूटवरसुद्धा येताना ‘हुला हुप्पा रिंग’, बास्केटबॉल आणि तुम्हाला वाचकांना कदाचित विचित्र वाटेल, पण कश्मीरा तिच्यासोबत एक मोठा टायरसुद्धा घेऊन फिरत असे. याशिवाय बॅटल रोप वर्कआऊटसाठी रोपस्सुद्धा घेऊन फिरत असते. जर तुम्हाला हे व्यायामाचे प्रकार माहिती नसतील तर कृपया वरील वर्कआऊट गुगल करा. खरं सांगू का, आजपर्यंत बऱयाच अभिनेत्री बघितल्या मी, गाडीत मेकअपची व्हॅनिट, फार फार तर भरपूर कपडे, ज्वेलरी, डाएटचे सामान याव्यतिरिक्त फारसं काही गाडीत नसतं, पण कश्मीराचा व्यायामाबद्दलचं हे वेड कुठल्याही पुरुषालासुद्धा लाजवेल असे आहे. बारीक दिसणं किंवा राहण्यापेक्षा कश्मीराचा फिट राहण्याकडे जास्त कल आहे. लेखाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कश्मीराचा अध्यात्मावर जास्त विश्वास आहे. मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्मासारखा दुसरा पर्यायच नाही असं तिचं ठाम मत आहे. साहजिकच यामुळे कश्मीरा मांसाहाराला हात लावत नाही. ती शुद्ध शाकाहारी आहे. पण शाकाहारी असल्यामुळे प्रथिनं व जीवनसत्त्व तिला तिच्या फिटनेससाठी जेवढे हवं तेवढं मिळत नाही याची तिला पूर्ण जाणीव आहे. म्हणून अधूनमधून मल्टीव्हिटॅमिन्सच्या औषधांचा कोर्स ती करत असते. पण हे कोर्स सतत करायचे नसतात हेही ती आवर्जून सांगते. आपल्या शरीराला नियमितपणे अत्यावश्यक असणारे 140 जीवनसत्त्व आहेत. हे जीवनसत्त्व आपल्या प्रत्येक आहारातून आपल्या शरीराला मिळतेच असं नाही. म्हणून कधी तरी अशा औषधांचा कोर्स केला पाहिजे. पण जर आपण सतत बाहेरून हे जीवनसत्त्व पुरवत राहिलो तर आपलं शरीर हे जीवनसत्त्व बनवणं सोडून देतं. कारण त्याला कळत असतं की, या जीवनसत्त्वाचा पुरवठा बाहेरून होतोय. म्हणून सहा महिन्यांतून एकदा तेही डॉक्टरच्या सल्ला घेऊनच हा कोर्स करावा. आजपर्यंत आपण अनेक सेलिब्रिटींबद्दल वाचत आलोय की, ते सेटवरचं जेवण न जेवता घरूनच जेवणाचा डबा आणतात. पण कश्मीराचं तसं नाही. तिच्या मेकअप रूममध्ये ती स्वयंपाकाचा सर्व सामानाचा सेटअप असतो. मग ती शेगडी असो व हॉट प्लेट ती चातुर्मास, श्रावण पाळत असल्यामुळे तिला तसंही शूटचं जेवण चालत नाही. चार महिने कांदा, लसून न खाणं हे अध्यात्मापेक्षा आयुर्वेदिकदृष्टय़ा खूप चांगलं आहे असं तिला वाटतं. त्याचबरोबर आपल्या हिंदुस्थानी परंपरेचा तिला प्रचंड अभिमान आहे. म्हणूनच जेवताना मांडी घालून बसणं किंवा एरवी पण मांडी घालून ताठ बसणं तिला आवडतं आणि म्हणूनच तिने घरीसुद्धा खुर्ची किंवा बेड ठेवला नाही आहे. जमिनीवरच बसणं किंवा गादी घालून झोपणं तिला आवडतं. पण घरी आलेल्या पाहुण्यांची अगदीच गैरसोय होऊ नये म्हणून एक सोफा पाहुण्यांसाठी ठेवलाय. मघाशी ‘मी बॅटल रोप वर्कआऊट’चा उल्लेख केला. त्यालासुद्धा कश्मीराने वेगळीच नावं दिली आहेत. गोधडी धुणं, किंवा आता जमिनीतून पाणी काढण्यासाठी हापसा मारायचाय अशी पारंपरिक नावं तिने या व्यायामांना दिली आहेत. आहे की नाही आपल्या मातीशी जोडलेली आपली आजची सेलिब्रेटी! हा लेख आतापर्यंतच्या लेखांमधला नक्कीच जरा वेगळा लेख होता आणि तुम्हाला आवडलादेखील असेल याची मला खात्री आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या