केप्लर पर्वाचा अंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुजाता बाबर

‘मरावे परी कीर्तिरूपी उरावे’ असे जीवन असावे हे तत्त्व घेऊन अनेकजण आपले आयुष्य घालवत असतात. पण हे केवळ माणसालाच नाही, तर अवकाशस्थ दुर्बिणींनादेखील लागू आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. हबल अंतराळ दुर्बिणीने इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या अस्तित्वाने तर मानवाच्या अंतराळ पर्यटनाच्या स्वप्नांना मोठा आधार दिला. अशाच एका अंतराळ यानाच्या पर्वाचा अंत झाला. ते यान म्हणजे केप्लर अंतराळ यान.

केप्लर यानाविषयी तपशीलवार लिहायचे ठरले तर एक पुस्तकच लिहावे लागेल. गेल्या वर्षीच्या अखेरीस डिसेंबर 2017 मध्ये ‘केप्लर 90’ या सूर्यासारख्या तार्‍याचा शोध लावला होता. या तार्‍याला सूर्यासारखी ग्रहमाला आहे हे या शोधामध्ये समजले होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्यासमान सजीव इतरत्र निश्चित आहेत या आशेला जणू पुष्टीच मिळाली होती. या यानाचे कार्य 30 ऑक्टोबर 2018 रोजी संपविण्यात आले. व्हेंटिलेटरवर असलेल्या नातेवाईकाचा मास्क काढताना जे दुःख आणि यातना होतात तसेच दुःख आणि यातना अनेक खगोलप्रेमींना झाल्या असाव्यात. याचे मुख्य कारण म्हणजे, अवघ्या साडेनऊ वर्षांच्या आयुष्यात या यानाने अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. या कालावधीमध्ये त्याने 5,30,506 तारे आणि 2662 ग्रह शोधले आहेत.

7 मार्च 2009 रोजी अमेरिकेमधील ‘नासा’ संस्थेतर्फे ‘योहानेस केप्लर’ या अत्यंत द्रष्टय़ा आणि विद्वान खगोलशास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ केप्लर अंतराळ यान अवकाशात सोडण्यात आले. अंतराळात सूर्यमालेच्या बाहेर सूर्यासमान ग्रहमाला शोधणे आणि पृथ्वीशी मिळतेजुळते परग्रह शोधणे हे या यानाचे मुख्य उद्दिष्ट होते. या यानाचे वजन 1039 किलो होते. यावर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा श्मिड्ट कॅमेरा बसविलेला होता. हे यान जेव्हा अंतराळात सोडले तेव्हा याचे आयुष्य साधारण साडेतीन वर्षे असेल असा अंदाज होता. त्यामुळे ही मोहीम 2012 साली खरे तर संपणार होती, पण ती 2016 पर्यंत वाढविण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे, या यानामधून मोठ्या प्रमाणात माहिती मिळत होती. जुलै 2012 मध्ये या यानामध्ये बिघाड झाला. ऑगस्ट 2013 पर्यंत ही दुरुस्ती करण्यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे या हे विस्तारित यान पाठविण्यात आले आणि यामुळे कार्य न करणार्‍या केप्लरला बूस्ट मिळाले आणि पुढे जाऊन केप्लर यानाने अनेक तारे आणि ग्रह शोधले.

जानेवारी 2015 पर्यंत केप्लर यानाने 440 तारे आणि त्यांच्याभोवती 1013 एक्झोप्लॅनेट्स खात्रीशीररीत्या शोधले होते. शिवाय 3199 ग्रहांचा अंदाज बांधला होता. केप्लर यानाने पाठविलेल्या माहितीनुसार किमान 40 अब्ज पृथ्वीसारखे खडकाळ एक्झोप्लॅनेट्स असावेत आणि हे सगळे एक्झोप्लॅनेट्स आपल्या आकाशगंगेमधील सूर्यासारख्या अनेक तार्‍याच्या भोवती फिरत असावेत असा अंदाज शास्त्रज्ञांनी केला होता. यातील सर्वात जवळचा ग्रह 3.7 पार्सेक अंतरावर असावा असा अंदाज केला होता. 6 जानेवारी 2016 रोजी केप्लर यानाने 1000 वा ग्रह नोंदवला होता. संपूर्ण जीवनकाळात त्याने पाच लाख 30 हजार 506 तारे आणि दोन हजार 662 ग्रह शोधले. हे एक अफाट कार्य आहे आणि अपेक्षेपेक्षा खूपच जास्त.

केप्लर यानाचा मुख्य हेतू होता, ग्रहमालांच्या रचना आणि त्यातील बहुविविधता शोधणे. यातून अनेक उद्दिष्टे निर्माण झाली. एक म्हणजे पृथ्वीच्या आकाराएवढे किंवा मोठे किती ग्रह आहेत, ते नेमके कुठे आहेत,  किती गोल्डीलॉक झोनमध्ये आहेत, म्हणजे किती ग्रहांवर सजीव सृष्टी असू शकते. या ग्रहांचा आकार आणि आकारमान काय असेल हे शोधणे हे दुसरे उद्दिष्ट होते. तिसरे उद्दिष्ट होते ते म्हणजे यातील किती ग्रह बहु-तार्‍याच्या प्रणालीत असतील ते शोधणे. चौथे उद्दिष्ट होते अल्पायुषी असणार्‍या विशाल ग्रहांच्या भ्रमण कक्षांची व्याप्ती, तेजस्विता, आकार, वस्तुमान आणि घनता शोधणे. इतर तंत्रज्ञान वापरून शोधलेल्या प्रत्येक ग्रहमालेमधील अजून ग्रहांचे अस्तित्व शोधणे आणि शेवटचे उद्दिष्ट म्हणजे ग्रह प्रणालींशी संबंधित असलेल्या तार्‍याचे गुणधर्म निश्चित करणे. ही सगळी उद्दिष्टे केप्लर यानाने मोठ्या प्रमाणात पार पडली असे म्हणायला काहीच हरकत नाही. केप्लरचे कार्य जरी संपले असले तरी अजूनही ते भ्रमण कक्षेत आहे.

केप्लरचा भ्रमणकाळ 372.5 दिवसांचा होता. 1 मे 2018 रोजी केप्लर पृथ्वीपासून 0.917 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट्स म्हणजेच 13.7 करोड किलोमीटर्स इतके लांब होते. ते हळूहळू पृथ्वीपासून दूर जाईल. वर्षाला 2.6 करोड किलोमीटर्स इतक्या वेगाने ते दूर जाईल. म्हणजे अजून 26 वर्षांनी ते सूर्याच्या पलीकडे जाईल आणि 51 वर्षांनी पुन्हा पृथ्वीजवळ येईल.

2009 मध्ये ही मोहीम अंतराळात पाठविल्यावर प्रथमतः आपल्याला माहीत असलेल्या एक्झोप्लॅनेट्सविषयी खात्रीशीर माहिती पाठवायला सुरुवात झाली. शिवाय अनेक रूपविकारी तार्‍याविषयी माहिती मिळाली. पहिल्या काही महिन्यांतच जवळपास 7500 तार्‍याविषयी माहिती मिळाली. वर्ष संपताना पाच नव्या ग्रहांविषयी माहिती मिळाली. यात वैशिष्टय़पूर्ण माहिती म्हणजे, केप्लर 16 बी ग्रहाचा शोध लागला. तोही एका द्वैती तार्‍याभोवती फिरणारा ग्रह! विशेष म्हणजे ही एक नवी प्रणाली होती. जून 2010 पर्यंत केप्लर मोहिमेमधून ग्रहमाला असलेल्या 400 तार्‍याची माहिती मिळाली होती. 2010 मध्ये केप्लरने ‘केओआय 4’ आणि ‘केओआय 81’ या दोन प्रणाली शोधून काढल्या, ज्यामध्ये मूळ तार्‍यापेक्षा लहान आणि गरम वस्तू होत्या. या वस्तू म्हणजे कमी वस्तुमानाचे श्वेत बटू असावेत असे शास्त्रज्ञांचे मत होते. 2012 मध्ये केप्लरने दूरच्या तारकीय महाकाय ज्वालादेखील नोंदविल्या आहेत. त्यापैकी काही 1859 कॅरिंगटन इव्हेंटपेक्षा (1859 मधील एक महाकाय सौर वादळ) 10000 पट अधिक शक्तिशाली आहेत. त्या इतक्या मोठ्या आहेत म्हणजे त्या तार्‍याजवळ गुरूच्या आकाराचा ग्रह असावा असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. ‘केप्लर 9 डी’ हा एक्झोप्लॅनेटदेखील खूप लोकप्रिय ठरला. हा ग्रह चार तार्‍याच्या प्रणालीमधील ग्रह होता. अशा प्रकारची प्रणाली प्रथमच सापडली होती. 2012च्या अखेरपर्यंत केप्लर यानाने एकूण 2321 वस्तू  शोधल्या होत्या. 2012 व 2013 मध्ये केप्लर कॅटलॉग प्रसिद्ध झाले होते आणि नंतरही ते अद्ययावत होत गेले. एप्रिल 2013मध्ये नासाने केप्लर-62, केप्लर-62 एफ आणि केप्लर- 69सी या तीन नवीन पृथ्वी-आकाराच्या एक्सप्लॅनेट्सची घोषणा केली. हे सगळे ग्रह केप्लर यानाने शोधले होते. हे तीनही ग्रह गोल्डीलॉक झोनमधील असावेत असा अंदाज होता. यांचे मूळ तारे होते केप्लर-62 आणि केप्लर-69. अशा प्रकारे ही शोधमालिका पुढे वाढतच गेली. विशेषतः हे दुरुस्तीच्या वेळी विस्तारित जोडयान पाठविल्यानंतर केप्लर यानाची कार्यक्षमता वाढली आणि पुढे या यानाने अनेक ग्रहमाला आणि तारे शोधले. याची यादी प्रचंड मोठी आहे. ही एका लेखात देणे अवघड आहे. यात महत्त्वाचा तारा होता, केप्लर 90 आय. हा तारा आपल्या सूर्यमालेपासून 2545 प्रकाशवर्षे दूर आहे. याचे 90 बी, 90 सी, 90 डी, 90 ई, 90 एफ आणि 90 एच असे सात ग्रह आधी शोधून काढलेले होतेच. यातील 90 सी आणि 90 डी या दोन ग्रहांच्या मध्ये 90आय हा नवीन ग्रह सापडला आहे. हा ग्रह आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण केप्लर 90 व त्याची आठ ग्रहांची माला ही आपल्या सूर्यमालेशी बरेचसे साधर्म्य साधते.

2016मध्ये केप्लर मोहीम वाढविण्यात आली. केप्लर मोहिमेमधून अनेक महत्त्वपूर्ण शोध लागले आहेत. माहितीचा प्रचंड मोठा साठा या यानाने पाठविला आहे. त्यातून अजून नवीन शोध लक्षात येतील. 2018 मध्ये तिच्यातील इंधन संपत आले. ऑगस्ट 2018 मध्ये हे यान ‘स्लीप मोड’मध्ये गेल्याचे नासाने सांगितले. या मोहिमेमध्ये माहितीचा इतका प्रचंड साठा मिळत होता की, काही देशांमधील शास्त्रज्ञ नागरिकांनी (Citizen Scientists) देखील माहिती विश्लेषणात मदत केली. 30 ऑक्टोबर 2018 रोजी या मोहिमेचा अखेर झाला. अर्थातच परग्रह आणि त्यांचे शोध काही थांबलेले नाहीत. केप्लरच्या नंतर लगेचच एक नवीन मोहीम पाठविण्याचा मानस आहे. या मोहिमेचे नाव आहे ट्रांझिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (टेस) (Transiting Exoplanet Survey Satellite; TESS). ही दुर्बिण नवीन परग्रह शोधण्यासाठी बनवण्यात आली आहे. ती केल्पर दुर्बिणीपेक्षा 400 पट मोठ्या क्षेत्राचे सर्वेक्षण करेल.  असो, केप्लर यानाने इतिहास घडविला आहे. केप्लरच्या अफाट कार्याला सलाम!

[email protected]