आभाळमाया – …चंद्र पुनवेचा!

>> दिलीप जोशी

परवा कोजागरी पौर्णिमा. ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे?’ अशी विचारणा करणाऱया टिपूर चांदण्यांची रात्र. पाऊस खरोखरच माघारी गेला असेल तर निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर लगेच चंदेरी प्रकाश पसरू लागेल. चंद्र पृथ्वीच्या खूपच जवळ असल्याने त्याच्या पृष्ठभागावरून परावर्तीत होणारा सूर्यप्रकाशसुद्धा खूप असतो. इतका की, निरभ्र पौर्णिमेच्या रात्री कोणत्याही दिव्या-दिवटी-टॉर्चविना आपल्याला प्रवास करता येऊ शकतो. अर्थातच चंद्रप्रकाश हा परावर्तीत प्रकाश असल्याने तो शीतल असतो. सूर्यप्रकाशाचे तेज आणि प्रखरता त्यात नसली तरी सौम्य उजेडाचा स्नेह त्यात असतो. आपल्या संस्कृतीत चांद्रमासावर आधारित कालगणना आणि प्रत्येक ‘तिथी’चे एकेक वैशिष्टय़ आहे. बहुतेक तिथींशी वर्षातले कोणते ना कोणते सण जोडलेले आढळतील.

चंद्रविहीन रात्रीची अमावास्याही चमचमणाऱया तारकांची आरास घेऊन येते आणि पिठोरी दिव्यांची, सर्वपित्री तसेच दिवाळीतली अमावास्याही सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाची असते. पौर्णिमेचे सण तर जल्लोषाचे. नारळी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, होळी पौर्णिमा अशा अनेक पौर्णिमा उत्साहाने साजऱया केल्या जातात. शेतकऱयांसाठी नवान्न पौर्णिमा महत्त्वाची असते आणि दर्यावर्दी लोकांना पुनवेचा चंद्र आल्हाददायक वाटतो.

पाश्चात्य कॅलेंडर, सौर दिनदर्शिका असते, त्यांचे सणही तसेच असतात. आपला इंग्लिश कॅलेंडरचा एकमेव सण म्हणजे मकरसंक्रांत. एरवी सारे चंद्रावर अवलंबून, तरीसुद्धा पाश्चात्य देशात चंद्राबद्दलच्या काही संकल्पना आहेतच. एका इंग्लिश महिन्यात दोन पौर्णिमा आल्या की दुसऱया पौर्णिमेचा चंद्र त्यांच्या ‘ब्लू मून’ ठरतो. आता याचा निळय़ा रंगाशी काही संबंध नाही. कुठल्याही पौर्णिमेचा चंद्र कधी निळा दिसत नाही; परंतु ‘बन्स इन अ ब्लू मन’ हा वाप्रचार पाश्चात्य जगात क्वचित घडणाऱया घटनेसाठी वापरला जातो. साहजिकच केव्हातरी एका महिन्यात येणाऱया दोन पौर्णिमांपैकी दुसऱया पौर्णिमेचे अप्रूप जास्त.

चांद्रमास 29 दिवसांचा असल्याने फेब्रुवारी या अठ्ठाविशी किंवा ‘लिप इयर’ला एकोणतिशी असलेल्या महिन्याचा अपवाद वगळता तिशी किंवा एकतिशी महिन्यात दोन पौर्णिमा येण्याची शक्यता असते. एक तारखेला पौर्णिमा आली तर तीस तारखेला पुढची असते. तोच तो ‘ब्लू मून!’ या महिन्यात एक तारखेला पौर्णिमा होती म्हणून तीस-एकतीस या दोन्ही तिथी पुन्हा पौर्णिमेच्या झाल्या. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तसे होणार नाही.

‘ब्लू मून’च्या निळय़ा संकल्पनेचे अप्रूप आपल्याला, कारण निळेशार आकाश आणि निळा समुद्र यातून हा रंग आपली पृथ्वी व्यापून टाकतो. 75 टक्के पाण्यामुळे अंतराळातून पृथ्वी निळी दिसते. म्हणून तिला ‘ब्लू प्लॅनेट’ किंवा नील-ग्रह म्हटले जाते. चंद्राला ते भाग्य नाही, कारण चंद्रावर ना वातावरण ना पाणी. आपल्याला आकाश निळे दिसण्याचे कारण, पृथ्वीवरच्या वातावरणात सूर्यप्रकाशातील रंगांचे होणार विकिरण. निळा रंग सर्वाधिक पसरल्याने या प्रकाशाच्या ‘डिफ्रॅक्शन’मुळे आपले दिवसाचे आकाश निळे दिसते. चंद्रावर वातावरण अगदीच नगण्य असल्याने सूर्यप्रकाशाचे विकिरण होत नाही. त्यामुळे चांद्रभूमीवरून दिवसाचे आकाशही काळय़ा रंगाचेच दिसते. तिथून आपली पृथ्वी मात्र निळी दिसते.

आता चंद्राबाबतच्या पाश्चात्यांच्या आणखी दोन संकल्पना म्हणजे ‘सुपरमून’ आणि ‘मायक्रोमून’. याला मात्र वैज्ञानिक, गणिती आधार आहे. चंद्र जेव्हा पृथ्वीला जवळ म्हणजे सुमारे तीन लाख छप्पन्न हजार किलोमीटर अंतरावर असतो तेव्हा पौर्णिमेचे चंद्रबिंब एरवीच्या पौर्णिमेपेक्षा पाच-सात टक्के मोठे दिसते यालाच ‘सुपरमून’ म्हणतात. परंतु हा फरक काही प्रचंड नव्हे. याउलट चंद्र पृथ्वीपासून दूर जातो. तेव्हा चार लाख पाच हजार किलोमीटर अंतरावर असतो. अशा स्थितीत दिसणाऱया पौर्णिमेचा चंद्र हा किंचित लहान दिसत असल्याने त्याला ‘मायक्रोमून’ असे म्हणतात. यंदाची कोजागरी ‘मायक्रोमून’ची पौर्णिमा आहे. आकाश ढगाळ नसेल तर पुनवेचा चंद्रमा छानच दिसेल. प्रश्न राहिला तो ‘कोजागरी’चा. गेल्या काही महिन्यात कोविडच्या धास्तीने जगाची झोपच उडवली आहे. हे ‘पॅन्डॅमिक’ पर्व संपले की पुढच्या पौर्णिमा अधिक तेजस्वी भासतील आणि सगळय़ाच ‘तिथी’ सणासारख्या वाटतील!

आपली प्रतिक्रिया द्या