लेख – उमद्या नेतृत्वाची अखेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीए संतोष घारे

देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱया पालनजी उद्योगसमूहातील सायरस मिस्त्री यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने आर्थिक, उद्योग विश्वातून एक उमदे, प्रतिभावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. नम्र स्वभावाचे असले तरी ते कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. अशा उमद्या नेतृत्वाच्या जाण्याने आर्थिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे 4 सप्टेंबर रोजी पालघरजवळ अपघाती निधन झाले. मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईकडे येत होते. दहा वर्षांपूर्वी रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर त्यांची जागा कोण घेणार याकडे साऱया जगाचे लक्ष लागले होते. यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. टाटा यांचे वारसदार म्हणून अनेक नावे समोर होती. टाटा यांचे सावत्र भाऊ पालनजी मिस्त्री यांचे जावई नोएल टाटा आणि पेप्सिकोच्या अध्यक्षा इंद्रा नूयी यांची नावे त्यात आघाडीवर होती; पण अनेक खटाटोपानंतर अखेरीस टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील सर्वात नवा आणि तरुण चेहरा असलेल्या सायरस मिस्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. टाटा या आडनावाव्यतिरिक्त या उद्योगसाम्राज्याचा वारसदार होण्याची ती दुसरी वेळ होती.

टाटा सन्समध्ये सर्वाधिक व्यक्तिगत भागभांडवल असलेल्या शापूरजी पालनजी मिस्त्री यांचे सायरस धाकटे सुपुत्र होत. 2006 मध्ये त्यांची टाटा सन्सच्या संचालक मंडळावर निवड करण्यात आली होती आणि नंतर त्यांच्या नावाला टाटांचे उत्तराधिकारी म्हणून पसंती देण्यात आली. त्यावेळी रतन टाटा यांनीही त्यांच्या निवडीचे स्वागत केले होते. ही निवड अत्यंत दूरदृष्टीने केलेली आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सायरस यांच्या निवडीने टाटा उद्योगसमूहाला प्रथमच तरुण वारसदार लाभला होता.

सायरस यांचे व्यक्तिमत्त्व शापूरजी पालनजी यांच्याप्रमाणेच प्रसिद्धीपराङ्मुख होते. उद्योगजगतात नावारूपाला आलेल्या व्यक्ती ज्याप्रमाणे सतत झगमगाटात राहणे पसंत करतात तसे सायरस यांचे व्यक्तिमत्त्व नव्हते. ते नेहमी स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवत. पाटर्य़ांना जाण्याची त्यांना मुळातच आवड नव्हती. त्यांची जीवनशैली लो प्रोफाइलच राहिली आहे. जवळपास 17 ते 20 अब्ज डॉलर्सची संपत्ती असणाऱया कुटुंबातील 35-40 वर्षांचा तरुण लो प्रोफाइल राहतो, ही बाब अनन्यसाधारणच होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, टाटा समूहाचा सर्वेसर्वा म्हणून निवड झाल्याच्या दुसऱया दिवशी सायरस जेव्हा टाटांच्या मुंबईतील मुख्यालयामध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी साधा शर्ट-पॅण्ट असा पोषाख परिधान केला होता. अगदी शर्टच्या बाह्या दुमडून ते आले होते. गंमत म्हणजे, त्यावेळी त्यांच्या स्वागताला आलेले सर्व जण सुटाबुटात आले होते. साधेपणाची आवड त्यांना पूर्वीपासूनच होती. मुंबईतील शालेय शिक्षणादरम्यान ते भलेही शाळेत आलिशान गाडय़ांमधून जात असत; पण वर्गातील त्यांची वर्तणूक अतिशय सामान्य होती. रतन टाटा यांनी उत्तराधिकारी म्हणून नेमताना या गुणाची दखल घेतली असावी.

असे असले तरी टाटा समूहामधील त्यांची कारकीर्द ही चमकदार ठरली नाही. परिणामी 2016च्या बोर्डरूममध्ये सत्तापालट झाला आणि मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवले गेले. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई करण्याचा निर्णय टाटा समूहाकडून घेतला गेला. तेदेखील न्यायालयात गेले आणि टाटा समूहाच्या निर्णयाला आव्हान दिले; परंतु सर्वोच्च न्यायालयाने मिस्त्री यांचे आरोप फेटाळून लावले. जपानच्या एनटीटी डोकोमो कंपनीबरोबर झालेल्या करारानुसार आर्थिक जबाबदारी झटकण्याची गंभीर चूक मिस्त्री यांनी केली. जपानच्या नामांकित कंपनीने टाटा टेलिकॉममध्ये पैसा घातला. त्यांनी ठरविले असते तर निश्चित वर्षानंतर ते आपल्या सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या निम्म्या मूल्यांवर बाहेर पडले असते. दुर्दैवाने या कराराची छाप हिंदुस्थानी ग्राहकांवर पडली नाही आणि कामगिरी जेमतेम राहिली. शेवटी एनटीटी डोकोमोने करारानुसार टाटाला आपला वाटा विकून बाहेर पडण्याचा निर्णय केला. टाटाने या कराराचा आदर करायला हवा होता; परंतु मिस्त्री यांच्या टाटा समूहाने तांत्रिक अडचणींचे कारण सांगून वाटा देण्यास टाळाटाळ केली. एकप्रकारे त्यांनी कराराचा भंग केला. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले आणि तेथील निर्णय टाटांच्या विरोधात लागला. या प्रकरणामुळे टाटा समूहात तणाव निर्माण झाला. एखादी परकी कंपनी टाटा समूहावर विश्वास ठेवत नसेल तर ती टाटाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी गोष्ट होती.

टाटा समूहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा शापूरजी उद्योगसमूहामध्ये कार्यरत होण्याचा निर्णय घेतला. सायरस हे लोप्रोफाइल आणि नम्र स्वभावाचे असले तरी कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. शापूरजी समूहामध्ये त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करत अनेक बदल घडवून आणले. अत्यंत उमदे, हुशार, प्रतिभाशाली आणि संवेदनशील असणारे असे हे व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने आर्थिक क्षेत्राची हानी झाली आहेच; परंतु त्यापलीकडे जात एका गोष्टीचे दुःख अधिक आहे, ते म्हणजे ज्या शापूरजी उद्योगसमूहाने स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानच्या इतिहासात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अत्यंत भरीव कामगिरी केली त्यांच्या एका सदस्याला रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागणे हे निश्चितच दुर्दैवी आहे. तसे पाहता त्यांच्या कारकिर्दीत आलेली काळरात्र संपून उषःकालाची सुरुवात होणार होता;. परंतु त्यापूर्वीच त्यांना काळाने ओढून नेले. दोनच महिन्यांपूर्वी पालनजी मिस्त्री यांचे निधन झाले आणि त्यापाठोपाठ सायरस यांनीही जगाचा निरोप घेतल्याने या उद्योगसमूहावर आणि मिस्त्री कुटुंबीयांवर ओढवलेले दुःखाचे संकट किती मोठे असेल याची कल्पनाच करवत नाही.