ठसा – डॉ. अंजली कीर्तने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतिनिधी

संशोधन, लेखन, चरित्र लेखन, लघुपटांची निर्मिती अशा वैविध्यपूर्ण लेखनाची डॉ. अंजली कीर्तने यांची वाटचाल सांगता येईल. कथा लेखिका, कादंबरीकार आणि कविता त्यांचा आवडीचा साहित्य प्रकार. कविता लेखन हे तर त्यांचे पहिले प्रेम होते, याही क्षेत्रात त्यांनी आपली नाममुद्रा अधोरेखित केली आहे. अंजली कीर्तने यांच्या निधनाने साहित्य, संशोधन क्षेत्राची हानी झाली आहे. ‘ललित’ हे वाङ्मयीन मासिक आणि मॅजिस्टिक परिवाराशी त्यांचा निकटचा स्नेह होता.
4 मे 1953 रोजी मुंबईत जन्म झालेल्या अंजली कीर्तने यांनी 70 व्या वर्षी 16 डिसेंबर 2023 रोजी अखेरचा श्वास घेतला. दुर्धर आजाराशी त्यांनी प्रदीर्घकाळ झुंज दिली, पण ती अयशस्वी ठरली. ध्यासपूर्ण अभ्यासातून दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे कार्य कर्तृत्व शब्दबद्ध करणाऱया चरित्रकार म्हणून डॉ. अंजली कीर्तने यांची ओळख होती. लेखनाचा वारसा आपल्या मातोश्री मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका पद्मिनी बिनीवाले यांच्याकडून त्यांना लाभला होता. संगीत विश्वातदेखील त्या रमल्या. सतारवादनाचे शिक्षण घेतले. नाशिकच्या भोसला मिलटरी स्कूलमध्ये जाऊन त्यांनी घोडेस्वारी, बंदूक चालवण्याचेही शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात कला शाखेत मराठी विषय घेऊन त्या प्रथम आल्या होत्या. मराठी विषयात बी. ए. करताना त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला होता. विख्यात फ्रेंच नाटककार मोलियर यांचा मराठी नाटकांवरील प्रभाव या विषयावर संशोधन करून त्यांनी पीएचडी मिळवली होती.
त्यांनी म. वा. धोंड आणि प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या मराठी वाङ्मय कोशाच्या चौथ्या खंडात उपसंपादक म्हणून योगदान दिले. 1982 ते 1986 या काळात अंजली या पॉप्युलरच्या मराठी विभागाच्या संपादकीय विभागात कार्यरत होत्या. लेखन करत असतानाच या व्यक्तिमत्त्वांवर लघू चरित्रपट व्हायला हवेत या विचाराने त्या झपाटल्या आणि मग फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये रीतसर प्रशिक्षण घेऊन त्यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावर लघुपट तयार केला. या लघुपटाला 1992-93 सालचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. ‘आनंदीबाई जोशी ः काळ आणि कर्तृत्व’ तसेच ‘गानयोगी पं. दत्ता दिगंबर पलुस्कर’ अशा चरित्र ग्रंथाच्या लेखनासोबतच कथा, कविता, कादंबरी लेखन त्यांनी केले. त्याचबरोबर ‘दुर्गा भागवत ः एक शोध’, ‘संगीताचे सुवर्णयुग’ यांसारखे अनेक लघुपट त्यांनी निर्माण केले.
डॉ. अंजली यांची ‘पॅशन फ्लॉवर’, ‘माझ्या मनाची रोजनिशी’, ‘पॅलिडोस्कोप’, ‘हिरवी गाणी’, ‘मनस्विनी प्रवासिनी’ ही पुस्तके त्यांच्या बहुपैलू लेखणीतून सिद्ध झाली आहेत. ‘सोयरीक घराशी’, ‘षड्ज एकांताचा’, ‘आठवणींचा पायरव’ ही त्यांची या वर्षात प्रकाशित झालेली पुस्तके. राज्य शासनाच्या आणि अन्य संस्थांच्या विविध पुरस्कारांनी डॉ. अंजली कीर्तने यांच्या लेखनाचा गौरव झाला आहे. मॅजेस्टिकशी लेखिका म्हणून त्यांचा संबंध होताच, पण आत्मीय नातेही होते.
‘दीपावली’ आणि ‘ललित’मधून सातत्याने त्या लिहीत असत. मॅजेस्टिकच्या अनेक उपक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या निधनामुळे एक मनस्वी, व्यासंगी, बहुरूपी, साक्षेपी लेखिका काळाच्या पडद्याआड गेली आहे.