छोट्या पडद्याची एकसष्टी!

>> दिलीप जोशी

कोरोनाचा काळ संपता संपत नाहीये. तो लवकरच संपावा अशी आस धरून जग घरी बसलंय. या काळात अनेक चॅनलवरचे कार्यक्रम आणि नेटद्वारे जुन्या कार्यक्रमांचाही आस्वाद अनेकांनी घरबसल्या घेतला असेल. नेटमुळे ‘टीव्ही’ आता मोबाईलपर्यंत येऊन पोचलाय. पण सहा दशकांपूर्वी अशी स्थिती नव्हती. तो जमाना होता रेडिओचा. त्यावरचे ‘आवाजी’ कार्यक्रम कधीकाळी दृश्य स्वरूपात पाहायला मिळावे अशी स्वप्नं पाहिली जात होती. अशा स्वप्नांतूनच कोणा संशोधकाला त्याचं ध्येय गवसतं आणि त्याचा ध्यास पूर्णत्वाला गेला की जनसामान्यांसाठी ते वरदान होऊन येतं. एडिसनने विजेच्या दिव्याचा ध्यास घेतला आणि जग रात्रीही उजळलं. तसंच दृश्य लहरींचं सार्वत्रिक प्रसारण करण्याचा ध्यास घेऊन एकोणिसाव्या शतकाच्या अखेरी प्रयत्न सुरू झाले. 1920 पर्यंत या प्रयत्नांना अक्षरशः ‘दृश्य’ स्वरूप येऊ लागलं आणि 25 मार्च 1925 रोजी स्कॉटिश संशोधक जॉन बेअर्ड यांनी लंडनच्या ‘सेल्फरिज डिपार्टमेंटल स्टोअर्स’मध्ये लोकांसाठी टीव्ही प्रक्षेपण केलं आणि 1928 पर्यंत टीव्हीचे सिग्नल लंडनहून न्यूयॉर्कपर्यंत पोहोचले.

आपल्याकडे तो काळ पारतंत्र्याचा होता. युरोप, अमेरिकेतलं नवं संशोधन इंग्रज राज्यकर्त्यांच्या सोयीनुसारच इकडे येत होतं. रेल्वे, वीज, तार, टपाल, फोन या गोष्टी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आल्या तरी रेडिओ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आला. टीव्हीचं प्रक्षेपण तिकडे दुसऱया महायुद्धाच्या काळात मर्यादित स्वरूपात होत होतं, पण आपण स्वतंत्र झाल्यावरही दशकभर ‘टीव्ही’च्या ‘दर्शना’पासूनच ‘दूर’च होतो. आपल्याकडे ‘दूरदर्शन’ आलं 15 सप्टेंबर 1959 रोजी. आज त्याचीच एकसष्टी.

त्या वेळी अगदी छोटा ट्रान्समीटर वापरून दिल्लीमध्ये दूरदर्शनचा आरंभ झाला. त्या काळात आपले विख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे तिथे कार्यक्रमांचे निर्माता म्हणून काम करत होते. त्यासाठी त्यांनी लंडनला जाऊन ‘बीबीसी’मध्ये या तंत्राचं विशेष प्रशिक्षणही घेतलं होतं. त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या तत्कालीन प्रधानमंत्री नेहरू यांच्या थेट प्रसारित झालेल्या कार्यक्रमाविषयी त्यांनीच सांगितलं आहे. त्या वेळचा त्यांचा नेहरूंबरोबरचा फोटो फिल्म डिव्हिजनच्या त्यांच्यावरील माहितीपटातील आहे. त्यावेळी कार्यक्रम ‘रेकॉर्ड’ करायची सोय नव्हती. नंतर ‘मास्टर टेप’वर अनेक कार्यक्रम नोंदले गेले.
दिल्लीहून मुंबईला यायलाही दूरदर्शनला तेरा वर्षं लागली. 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई आणि अमृतसर ही दोन केंद्रे सुरू झाली. 1959 मध्ये प्रायोजित पद्धतीने आरंभ झालेल्या दूरदर्शनचं रोजचं प्रसारण नंतरच्या चार-पाच वर्षांत सुरू झालं, पण ते फारच मर्यादित वेळेपुरतं होतं. मुंबईतलं ‘दूरदर्शन’चं पहिलं प्रक्षेपण मी कॉलेजच्या हॉलमध्ये पाहिलं. आम्हा विद्यार्थ्यांमध्ये त्यावेळी या माध्यमाबद्दल कमालीची उत्सुकता होती. तसे ‘केबल’ टीव्हीचे प्रयोग काही प्रदर्शनात झाले होते, पण ते त्या कार्यक्रमापुरतेच. त्यातून ‘टीव्ही’ हे यंत्र कसं चालतं हे दाखवण्याचा उद्देश असायचा. ‘दूरदर्शन’ आल्यावर त्याला व्यापक रूप आलं.

बघता बघता छोटा पडदा देशव्यापी झाला. 1975 मध्ये सात केंद्रे असलेल्या दूरदर्शनचा विस्तार होतच गेला. 1982च्या नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानात ‘एशियाड’ या आशियाई खेळांच्या स्पर्धा दिल्लीत होण्याआधी त्यानिमित्ताने आपल्याकडे रंगीत टीव्ही यावा असा ध्यास तत्कालीन माहिती-प्रसारण मंत्री वसंत साठे यांनी घेतला. इंदिरा गांधींनी अनुकूलता दर्शवली आणि ज्यांच्याकडे ‘रंगीत’ टीव्ही संच होते त्यांना हे खेळ सप्तरंगात दिसले. आता ‘ऍप’वरून व्हिडीओ संभाषण करणाऱया पिढीला ते ‘रंगीत’ आहे याचा विचारही शिवणार नाही, मग आश्चर्य कसलं! पण त्या काळात आमच्या राजावाडीतल्या दोन-तीन रंगीत टीव्हींपुढे प्रचंड झुंबड उडाली होती! ‘छायागीत’ला अशीच गर्दी व्हायची.

1984 मध्ये ‘हम लोग’नंतर ‘ये जो है जिंदगी’, ‘बुनियाद’, ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ अशा एकामागून एक सरस मालिका ‘दूरदर्शन’ने दिल्या. 1987 मधल्या ‘रामायण’ मालिकेने तर रविवारी सकाळी रस्ते ओस पडू लागले. सगळेजण घरात टीव्हीपुढे जमू लागले. घरचेच नव्हे, तर शेजारच्या चार घरांतली मंडळीही येऊ लागली. तो अनुभव 1989 मध्ये ‘महाभारत’ने दिला. आताही कोरोना काळातलं या मालिकांचं पुनर्प्रसारण गर्दी खेचत होतं. मराठीतले ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, ‘चिमणराव’ तसेच अनेक कार्यक्रम गाजले. त्याशिवाय ‘मालगुडी डेज’, ‘तेनाली रामा’ अशा कार्यक्रमांना भरपूर प्रेक्षक लाभले. पुढे 1990 च्या दशकात ‘मल्टी चॅनल’चा जमाना सुरू झाला. चोवीस तास प्रक्षेपण होऊ लागलं हे आपण पाहतोच. पण ‘दूरदर्शन’च्या आरंभ काळातल्या अनेक ‘दृश्य’ स्मृती त्यांच्या ‘अर्काइव्हज्’मध्ये असतीलच, पण प्रेक्षकांच्या मनातही त्या कायमच्या ताज्या आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या