मुद्दा – लॉक डाऊन आणि वजनवाढ!

>> पर्णिता शेडगे-तांदूळवाडकर

‘या लॉक डाऊनमध्ये माझं खूप वजन वाढलं’ असं रोज एकतरी व्यक्ती आपल्याला सांगते. नाही तर आपण स्वतःला एकदा तरी आठवण करून देतो की लॉक डाऊनमुळे आपलं वजन वाढत आहे. सर्वप्रथम लॉक डाऊन आणि वजनवाढीचा काय संबंध? लॉक डाऊनमध्ये आपण घरात अडकलो आहोत, वर्क फ्रॉम होम चालू आहे, हालचाल हवी तेवढी होत नाही, वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात, इमोशनल इटिंग होते वगैरे….

बऱयाच महिलांना असे वाटते, मी तर रोज घरकाम करत आहे (फरशी पुसणे, कपडे धुणे) मग तेवढा व्यायाम पुरेसा का नाही होत? सर्वात मूलभूत नियम सांगते तुम्हाला, आपण जेवढय़ा कॅलरीज खातो तेवढय़ा आपण वापरल्या तर आपलं वजन वाढणार नाही आपण जे काही अनावश्यक खातो ते आपल्या शरीरात चरबी (फॅट्)च्या स्वरूपात जमा होते. मग जेव्हा आपण ओव्हरइटिंग करतो आणि व्यायाम करत नाही तेव्हा वजन वाढणे हे नैसर्गिक आहे.

मग सध्याच्या लॉक डाऊनच्या स्थितीत आपण काय करू शकतो? सर्वप्रथम आपण स्वतःच्या जीवनशैलीचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात. उदा. इमोशनल इटिंग होत आहे का? वेळेवर खाल्ले जात नाही का? हालचाल पुरेशी होत नाही का? का आपण लॉक डाऊनचं कारण देऊन फक्त आळशीपणा करत आहोत?

एकदा आपण स्वमूल्यांकन केलं की त्यावर उपाय निघू शकतात. मी स्वतः सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे. स्वतःचे 27 किलो वजन कमी करून ते पाच वर्ष मेंटेन केले आहे. बरेचजण मला विचारतात, ‘तुझ्याकडे लॉक डाऊन नव्हतं का? लॉक डाऊनमध्येही वजन कसं वाढलं नाही.’ या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

जर तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नसेल तर घरातल्या घरात मी काय व्यायाम करू शकते – तुम्ही अगदी 5 सूर्यनमस्कारांपासून व्यायामाला सुरुवात करा आणि रोज 2 वाढवत जा. ‘Some thing is better than nothing’ हे विचारात घेऊन रोज काही ना काही व्यायाम होईल एवढं लक्ष द्या. सोसायटीत जागा असेल तर चालणे हा एक विकल्प आहे. एवढे लक्षात ठेवा की जो काही वेळ व्यायामाला द्याल तो फार गांभीर्याने द्या. मग ती 30 मिनिटे का असेनात.

आता येऊया आहाराकडे. 24 तास घरात असल्यामुळे कामाच्या तणावामुळे किंवा कधी कधी तर फक्त सोशल मीडिया फॅड्समुळे अनावश्यक कॅलरीज खाल्ल्या जातात. जर असे होत असेल तर जाणीवपूर्वक हे कसं टाळता येईल हे पाहणे.

एक महत्त्वाचा नियम/उपाय तुम्हाला सांगते. तुम्हाला दिवसभरात जे काही खायचंय ते जर तुम्ही आधीच नियोजित करून ठेवलं तरच हे शक्य आहे. जेव्हा नियोजन नसते आणि आपल्याला भूक लागल्यावर आपण शोधायला गेलो, काय खायचं तर नैसर्गिकरीत्या आपण जे समोर उपलब्ध असेल ते खातो. तर नियोजन ही पहिली पायरी. सतत घरात असल्यामुळे जर अधूनमधून खायची इच्छा होत असेल तर काही सात्त्विक विकल्प घरात असणे महत्त्वाचं. उदा. फळे, खाकरा, चुरमुरे, जे पचायलाही सोपे असतील आणि वजनही वाढणार नाही. जेव्हा हे सगळे विकल्प समोर दिसत असतात तेव्हा आपण जाणूनबुजून क्वचितच काही अनहेल्दी खाऊ असं नाही.

मग नेहमी मन मारूनच राहायचं का? तर असं नाही. आठवडय़ातून एक दिवस ठरवून तुम्ही त्या दिवशी पाहिजे ते खा. अर्थातच जर बाकीचे सहा दिवस क्लिन इटिंग केले तर आणि हे पण जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य साध्य करत नाही तोपर्यंत. माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगते, या सगळ्या प्रोसेसमध्ये जोपर्यंत तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचता. क्लिन (सात्त्विक) खाणे आणि व्यायाम करणे ही तुमची जीवनशैली बनून जाते. आणखी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराशी इतके परिचित होऊन जाता की, काय खाल्ल्यावर, किती खाल्ल्यावर तुमचं शरीर कसं प्रतिसाद देईल हेही तुम्हाला कळतं आणि तुम्हीच तुमचे पर्सनल डायटिशियन आणि ट्रेनर होऊन जाता.

कोरोनाच्या या महामारीमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे स्वास्थ्य आणि प्रतिकारशक्ती. त्यामुळे मी आग्रहाने सांगते की आपल्या स्वास्थ्याला प्रभुत्व द्या आणि सकारात्मक दृष्टिकोनाने काही बदल आपल्या जीवनशैलीत करा.

आपली प्रतिक्रिया द्या