
>> भगवान परळीकर
शासनाच्या सिंचन सेवेत असताना केलेल्या सेवेतून आणि आलेल्या अनुभवातून अभ्यासपूर्ण लिखाण करणारे संभाजीनगर येथील सेवानिवृत्त अधीक्षक अभियंते मधुकर महिपतराव दिघे यांचा नुकताच परिचय झाला. मात्र त्यांनी केलेल्या कामाची ओळख त्यांच्या पुस्तकरूपाने वाचायला मिळाली. ‘तहानलेला भारत’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक दिशादर्शक ठरणारे असून राज्यातील आणि देशातील पाणीपुरवठा स्थिती, वाढती लोकसंख्या आणि त्यावरील उपाय महत्त्वाचे आहेत. जलसमृद्धी जीवन योजना एक अभिनव व प्रभावी अशी पाणीपुरवठय़ाची पद्धत असून वर्तमान पाणीपुरवठा पद्धतीत उद्भवणाऱया त्रुटी दूर करणारी तसेच वर्तमान पद्धतीत पूरक व सहज अमलात आणण्याजोगी आहे. देशात किंवा राज्यात ज्या भागात ही योजना राबवली जाईल त्या भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी संपुष्टात येईल तसेच भूजल पातळीत लक्षणीय वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .
खरं तर ग्रामीण भागासाठी भूजल हे एकमेव पाण्याचे स्त्र्ााsत आहे. समृद्धी जीवन योजनेत लोकसहभागाला मोठय़ा प्रमाणात वाव असल्याने पाणीटंचाईग्रस्त भागातील लोकांनी एकत्र येऊन सार्वजनिक संस्था स्थापन करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योजना राबविणे शक्य आहे. प्रत्येक जिह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून एक किलोमीटर क्षेत्रासाठी अशा लहान योजना केल्यास त्या व्यवहार्य ठरू शकतील असाही सल्ला त्यांनी दिला आहे. जलसमृद्धी जीवन योजनेसाठी लागणारा निधी हा लोकसहभागातून उभा केला जावा. सर्वेक्षण, नियोजन, रचना, आराखडे, बांधकाम ही योजना उभारणीसंबंधीची तांत्रिक कामे शासनाच्या संबंधित विभागाकडून केली जावीत असे त्यांनी सुचवले आहे. शासनाच्या खासदारांकडून करावयाच्या आदर्श ग्राम योजनेकरिता पाण्याची उपलब्धता महत्त्वाची असते. अशावेळी जलसमृद्धी जीवन योजना उपयुक्त ठरेल असा विश्वास मधुकर दिघे यांनी आजवर केलेल्या कामातून आणि अनुभवातून व्यक्त केला आहे. मधुकर दिघे यांनी पावसाच्या पाण्याचा वापर आणि त्याचे संवर्धन या विषयाचा केलेला अभ्यास केवळ एका जिह्यापुरता मर्यादित नसून राज्याला नव्हे, तर संपूर्ण देशाला उपयुक्त ठरणार आहे. आजचे वाढते शहरीकरण, त्यामुळे निर्माण होणारी पाणी समस्या यावर आगामी काळात उपायोजना करण्यासाठी जलसमृद्धी जीवन योजना महत्त्वाची ठरणारी आहे. शहरी भागात नगरपालिका, महापालिका यांच्या माध्यमातून तर ग्रामीण भागात जीवन प्राधिकरण मंडळाच्या मार्फत योजना कार्यान्वित केल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर निश्चितच मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लाखो तहानलेल्या लोकांची तहान भागविण्यातही निश्चित यश मिळेल असे त्यांना वाटते. सेवानिवृत्त अधीक्षक अभियंते मधुकर दिघे यांनी सर विश्वेश्वरय्या विभागीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी संपादन केल्यानंतर नाशिक, जळगाव, धुळे, मराठवाडा भागात विविध ठिकाणी 30 वर्षे सलग सेवा केली. आपल्या कार्यकुशलतेमुळे ते अधीक्षक अभियंता या उच्च पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते या कामात सक्रिय असून सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. विविध मशिनरीचे मूल्यांकन, सर्वेक्षणाचे त्यांचे काम चालू आहे. मधुकर दिघे यांनी आपल्या तीस वर्षांच्या सेवेच्या काळात अनेक धरणांवर काम केले. त्यात अब्जावधी लिटर पाणी अडवले गेले. असे असले तरी आज पाण्याचे दुर्भिक्ष कायम आहे. सामान्य माणसाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वर्षभर वाहणाऱया नद्यांचे प्रवाह थांबले आहेत. त्याचा परिणाम निसर्ग व पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरत असून अशावेळी पाणीटंचाईच्या समस्येवर सोपी आणि कायमस्वरूपी योजना मधुकर दिघे यांनी जलसमृद्धी जीवन योजनेच्या माध्यमातून मांडली आहे. त्यांनी सुचवलेल्या योजनेस पेटंट कायद्यानुसार मान्यताही प्राप्त झाली आहे. ‘तहानलेला भारत’ हा त्यांच्या ‘द थर्स्टी इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. मधुकर दिघे यांच्यासारख्या अभ्यासपूर्ण लेखन करणाऱया आणि पाणीटंचाईविषयी मार्गदर्शन करणाऱया या पुस्तकाची दखल निश्चितच घेतली जाईल असा विश्वास आहे. त्यांनी केलेले हे काम निश्चितच भूषणावह असून प्रेरणादायी ठरणारे आहे.






























































