शब्दचित्र – भावनांची समृद्ध ओंजळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चित्रा क्षीरसागर

ज्यांच्या कवितेने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली त्या ज्येष्ठ कवयित्री पै. इंदिरा संत यांचा 4 जानेवारीला जन्मदिवस आहे. या पार्श्वभूमीवर इंदिराबाईंच्या कवितेतून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न.  

आपला अनुभव, भावना व्यक्त करण्याचा कविता हा साधा, सरळ, प्रकार जरी असला तरी तो अवघडही तितकाच आहे. कारण आपल्या भावना कमीत कमी शब्दात मांडायच्या असतात आणि योग्य शब्दातून अर्थ ध्वनित झाला पाहिजे. लय असली पाहिजे आणि वाचणाऱयाच्या हृदयात ती विराजमान झाली पाहिजे. अशा कसोटय़ांतून कविता आली पाहिजे. कविता हा प्रांत मुक्त छंद, छंदोबद्ध या समीकरणात बसणारा नाही, तरीही तो आपल्याला त्यात बसवावा लागतो.

ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या कविता छंदोबद्ध आहेत. अल्पाक्षरी आहेत. कवितेतून आपल्याला पाहिजे तो अर्थ मिळत असतो. त्यामुळे त्यांचा अनुभव माझ्या अनुभवाशी साधर्म्य असल्यामुळे ती कविता इंदिरा बाईंची न राहता ती सार्वत्रिक होते. ज्याला त्याला आपलीशी वाटते. माझा अनुभवही हा असाच आहे असं वाटून जातं. इंदिराबाईंचा मेंदी कवितासंग्रह हल्लीच वाचण्यात आला. त्यातील काही कवितांवर भाष्य करेन, ज्या वेगळ्या वाटतात.

मेंदी भरल्या नखानखांचे

आले चालत पिवळे पाऊल

ओल्या मुरमी बांधावरल्या

बाळतणाला लागे चाहूल

मेंदीला शुभशपुन मानले आहे. मेंदी लग्नसमारंभात लावली जाते. नवरा-नवरी, घरातील सर्व सवाष्णींना मेंदी लावली जाते. नागपंचमी आली की मेंदी लावली जाते. काही राज्यांत विवाह सोहळ्यात मेंदीचा सोहळा असतो. एक दिवस-रात्र या मेंदीसाठी राखून ठेवला जातो. ती शुभशपुनांची प्रथा, परंपरा आहे. या मेंदीचे वर्णन इंदिराबाईंनी फार अप्रतिमरीत्या केले आहे. मेंदीचे झाड हे बांधावर आलेले आहे. त्याची पाने छोटी छोटी नखासारखी आहेत. पानांचा रंग पोपटी हिरवा आणि रुपेरी काठ असलेला आहे. आजूबाजूला जमिनीवर गवत आहे ते बाळरूपात आहे. या तृणपात्यांना मेंदीची चाहूल लागली आहे. इंदिराबाईंनी फार सूक्ष्मपणे वर्णन केले आहे.

इंदिराबाईंचे बालपण गावात म्हणजे खेडय़ात, ग्रामीण भागात गेल्या कारणाने त्यांना शेतीचा लळा खूप आहे. त्यांच्या कवितेत झाडे – वेली, पशु-पक्षी, नद्या, नद्यांचे वळण, आंबा, फणस, करवंदं, झाडांना बांधलेला झोका, त्याचा आवाज, या सर्वांचे वर्णन बारकाईने आले आहे.

‘अशीच येते कधी एकदा’ या कवितेत,

पाकपुशलता चटणीपासून

वस्त्रांमधली रंगसंगती,

बाजारातून सफर मजेने

आणि पुणाशी गप्पा गोष्टी

या कवितेत गृहिणीच्या मनाचा ठाव घेतला आहे. तिचा उत्साह तिने सजविलेले स्वप्न, संसाराचा आणि जीवनातील कलेचा अनुभव गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. मुलगी म्हटली की तिला प्रथम स्वयंपाक आला पाहिजे. अगदी, चटण्या, कोशिंबिरी, पोळ्या, पंचपक्वान्ने तिला तयार करता आलीच पाहिजेत. शिवणकाम, भरतकाम यातही निपुण असायला पाहिजे, याच अनुभवातून इंदिरा संताची कविता उतरते. पोरवयात भातुकली खेळलेल्या मुली संसारात प्रत्यक्ष उतरतात तेव्हा

तीन विटांच्या कष्टावरती

भातुकलीचे चढते लेणे

असे कवयित्री म्हणते, म्हणजे लग्नानंतर ती सासरी येते तेव्हा संसार म्हणजे काय हे तिला कळते. लग्नाआधीची स्वप्ने माहेरच्या उंबऱयावर सोडूनच सासरी यायचे. भातुकली खेळली असली तरी संसाराच्या आगीत ते बालपण, ते स्वप्न, तो अल्लडपणा या तीन विटांच्या चुलीत टाकायचा. बाजारातून सामान आणताना मैत्रिणींना भेटून मनमोकळ्या गप्पा कराव्यात, दूध, मिठाचे, तिखटाचे, भाज्यांचे हिशेब बथ्थडपणे ठेवावे लागतात. हे हिशेब नको. उगाचच वाटते फूल खुडावे, वाटते गाणे गावे, निवांत बसावे असे मनोरथ ती रचत असते. लहानपणी मन स्वच्छंदी असते. ते संसार अंगावर पडल्यावर तितकेच स्वच्छंदी राहात नाही. या कवितेतून आपला अनुभव रंगीन करण्याचा प्रयत्न कवयित्री करते.

इंदिरा संताच्या कवितेतून फुलांचा बहर भेटायला येतो. कर्दळी, निवडुंगांची फुले, गुलमोहर, रानफुले, सोनफुले, आंब्याचा मोहर, चाफा, मेंदीची फुले, बपुळ फुले अशा एक ना अनेक फुलांचे बहर कवितेत येतात.

इंदिरा संतांना शेतीचा खूप लळा. या अनुभवातून तवंग नावाची कविता आहे. त्यातून नाचणी या पिकाचे सुंदर चित्र रेखाटले आहे. इंदिरा संताच्या कविता वाचण्याच्या आणि समजून घेण्याच्या आपल्या पद्धती विकसित करते. वेगळा अनुभव देऊन जाते.

ही नाचणी गुज सांगते. शेती, रानवाटा, पाणंदी, गुरेढोरे, शेती, गोठा, पायवाटा, यांचे इंदिरा संतांना फार अप्रुप. शेतामध्ये नाचणी पायाभोवती बिलगते. नाजूक पाती थरथरते आणि गुजगोष्टी करते. नाचणी रोपे कारंज्यासारखी दिसतात. ज्यातून पाण्याच्या ऐवजी हिरव्या धारा दिसतात, या रंगाची भाषा हिरवी आहे. कवयित्री म्हणते, आपण अजाण आहोत. आपल्याला काहीच कळत नाही. तरीही या नाचणीच्या रंगाचा तवंग माझ्या मनोमनावर तरंगतो आहे.

माती आणि आपलं नातं युगानयुगे आहे. मातीतून येणे मातीतच जाणे अशा येण्याजाण्याच्या प्रवासात मातीला महत्त्व आहे. आपल्या रक्तातही मातीची ओढ असतेच. उन्हाळा संपून पावसाचे आगमन होते. तेव्हा तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब पडले की अत्तरापेक्षाही सुंदर सुवास या मृण्मयीचा येतो हे नातं आपलं. पाऊस अविरत पडत असताना आपल्यालाही वाटते पावसात चिंब ओले व्हावे. प्राजक्त जसा दव पिऊन तृप्त होतो आणि निथळत राहतो तसं ‘मृण्मयी’ कवितेत सर्व ऋतू भेटावयास येतात. वर्षा, हेमंत, वसंत, ग्रीष्म या ऋतूचे आणि मातीचे नातं सांगणारी कविता

हेमंताचा ओढून शेला

हळूच ओले अंग टिपावे

वसंतातले फुलाफुलांचे

नवीन उंची पातळ ल्यावे

हे ऋतू अंगावर शेला म्हणून ओढून घ्यावे. वसंत ऋतूत फुलांचे ताटवे बहरतात. त्याचे पातळ नेसावे. इंदिरा संत या नऊवारी पातळ नेसायच्या. गहुळी, अंगकाठी, सुक्ष्म शांतपणे बोलणे. त्यामुळे फुलाफुलांचे पातळ नेसावे, केवडय़ाला विजेची उपमा दिली आहे आणि तेही जर्द लख्ख केवडय़ाची पात वेणीवर खोवावी. तीही तिरकस. तुझ्या लाखलाख आठवणीचे काजवे पदरात घ्यावेत. गत ऋतूंशी, निसर्गाशी, फुलांशी… हे सांगण्याची रसिकता उत्तमरीत्या कवितेत आहे.

अशा अनेक कविता आहेत त्यातून आपली सुखदुःखं, आनंद, हषी, वेदना, काळजाला चटका लावून जाणारी, घटना, फुल, पशुपक्षी, प्राणी यात चतुर, गिधाडे, वाघूळ, काजवे, मृग, फळात बोरे, करवंदे, जांभळे एक ना अनेक विषय हाती घेऊन अनुभव कवितेतून मांडला आहे. आपण भोगलेले, अनुभवलेले विषय फार ताकदीने कवितेतून मांडले. या स्मृती केवळ विरंगुळा म्हणून लिहिलेल्या नाहीत. सहजता, सरलता, तरलता, उत्कटता, अर्थपूर्णता अनुभव, निष्ठता यामुळे मनाची पकड कविता घेते. जाणिवा समृद्ध करते. प्रेम हा मानवी मनाचा गुण आहे. इंदिरा संताच्या कविता पारंपरिक काव्यभाषेच्या अधिकाअधिक जवळची आहे. सामहिक जाणिवा हा काव्याचे वैशिष्टय़े आहेत.

अनेक कवितामधून स्त्रियांची दुःखे मांडली आहेत. इंदिराबाईंच्या कवितेतला अनुभव कविता वाचणाऱयाचा अनुभव तादात्म्य पावतो. म्हणून कविता आपली वाटते. इंदिरा संत यांचं लिखाण, साधं, सरळ, मनाची पकड घेणारं आहे. त्यांची कविता बरंच काही शिकवून जाते. भावभावनांची ओंजळ समृद्ध करून जाते.