वैश्विक – आभाळमाया – मंगळावरचा महापर्वत

>> [email protected]

आपल्या सौरकुलातील ग्रह विविध वैशिष्टय़ांनी भरलेले आहेत. त्यापैकी तिसऱया स्थानावरचा पृथ्वी हा आपल्या पायाखालचा ग्रह तर सर्वाधिक वैशिष्टय़पूर्ण. त्याचा विचार आपण ग्रहमालेचा एक भाग म्हणून क्वचितच करतो. डोक्यावरच्या ग्रहांचीच ग्रहमाला आपल्याला खुणावते आणि ते सहाजिकही आहे. कारण पृथ्वी एक ‘ग्रह’ म्हणून आपल्या सीमित नजरेत कधीच भरत नाही. याउलट दूरस्थ ग्रह रात्रीच्या आकाशात आपल्या वैशिष्टय़ांसह चमकतात. सूर्यप्रकाशाने परप्रकाशित असले तरी निरीक्षण आणि अभ्यासासाठी ते चांगलंच. अर्थात पृथ्वीविषयी सखोल माहिती केव्हातरी घेऊच.

आज थोडं लाल रंगी मंगळाबद्दल. हा ग्रहमालेतला पृथ्वीपलीकडचा पहिला बाहय़ग्रह. जवळपास आपल्या ग्रहासारखाच असल्याने तिथे जाऊन वस्ती करण्याची चित्रं रंगवली जातात. आपल्यापासून कधी पाच तर कधी सात कोटी किलोमीटरवर असलेल्या या ग्रहाचं पहिलं वैशिष्टय़ म्हणजे त्याला लोहमिश्रित पृष्ठभागामुळे लाभलेला लाल रंग. मंगळ पृथ्वीजवळ (उपभू) असताना त्याचं रक्तवर्णी रूप मनोहारी दिसतं. गेल्या डिसेंबर-जानेवारीपर्यंत ते बरेच दिवस न्याहाळता आलं. आता हा ग्रह कर्क राशीच्या पार्श्वभूमीवर दिसतोय. सध्या ढगाळ वातावरणामुळे त्याचं दर्शन अशक्यच, पण दिवाळीनंतर तो छान दिसेल.

मंगळावर कालवे आहेत म्हणजे पाणीही असणार अशी समजूत व्हायला कारण झालं ते दुर्बिणीतून गॅलिलिओने पहिल्यांदा हा ग्रह पाहिल्याचं. त्या काळात त्यावर काही घळी दिसल्या. इटालियन भाषेत घळ म्हणजे ‘कनाली’ आणि त्याचं इंग्लिश रूपांतर कॅनॉल होऊन ‘कालव्या’ची संकल्पना पुढे आली, पण तसं काहीच नव्हतं. कोरडाठाक पृष्ठभाग आणि विरळ वातावरण असलेल्या मंगळावर धो-धो वाहणारं पाणी नाही. निदान दृश्य स्वरूपात तरी नाही. मंगळपृष्ठाखाली बर्फ-पाणी सापडल्याची वृत्तं वारंवार येतात. त्याची तपासणी संशोधक करतच असतात.

मंगळाविषयीची विनाकारण ‘धास्ती’ मात्र त्याच्या लाल उग्र दर्शनाने विविध संस्कृतीमध्ये रुजली खरी. अमेरिकेत एच.जी. वेल्स यांनी ‘लिट्ल ग्रीन मेन’ ही कथा लिहिली. ‘मंगळपृष्ठाखाली ‘राहणारी ही अंगठय़ाएवढी’ माणसं पृथ्वीवर आक्रमण करतील असं कथेचं स्वरूप. त्या काल्पनिक कथेच्या प्रभावी रेडिओ प्रसारणाने त्यावेळी अनेक अमेरिकन घाबरले होते असं म्हणतात.

ते जाऊ द्या, मंगळावर एक महाकाय पर्वत मात्र नक्कीच आहे. पायथ्यापासून सुमारे 85 हजार फूट उंच असलेला हा ‘माऊण्ट ऑलिम्पस’ आपल्या एव्हरेस्टपेक्षा कितीतरी उंच आहे. एव्हरेस्ट 29 हजार फूट उंचीचं. आल्प्स, मौनाकी, काराकोरम वगैरे पर्वत आपल्या हिमालयापुढे खुजेच, पण त्याच्यापेक्षाही उंचावून आकाशस्पर्शी झालेला ‘ऑलिम्पस’ हा आपल्या ग्रहमालेतील सर्वोत्तम पर्वत! त्याच्या पायथ्याचा विस्तार इटली किंवा फिलिपाईन्स देशाएवढा प्रचंड आहे! मंगळाच्या उत्तर गोलार्धात, पश्चिमेला असलेला माऊण्ट ऑलिम्पस आकाशात तीस किलोमीटर झेपावला आहे. मंगळावर पृथ्वीसारख्या टॅक्नॉनिक प्लेट नसल्याने तिथे भूकंप वगैरे नसतात. प्राचीन निसर्गरचना तशीच राहते.

ऑलिम्पसच्या माथ्यावर बरीच सपाट जागा असली तरी तिथे पॅराशूटद्वारे उतरणं सोपं नाही. कारण मंगळावर वातावरणाचा दाब खूपच कमी आहे. ‘पास्कल’ परिमाणात तो एव्हरेस्टवर 32 हजार, तर ‘ऑलिम्पस’वर केवळ 72 पास्कल इतकाच आहे. कदाचित एखादं यान पुढेमागे तिथे उतरेल. कोणा अंतराळवीराने तेथे पाऊल ठेवण्याचा मान मिळवला तर ती ग्रहमालेतली ‘सर्वोच्च’ व्यक्ती ठरेल, पण या ‘जर-तर’च्या गोष्टी. 44 टक्के सिलिकेट, 17 टक्के लोह तसंच 88 टक्के ऍल्युमिनियम, मॅग्नेशियम असलेला हा महापर्वत उद्या आपल्याकडच्या उद्योजकांना मोहात पाडू शकतो. आपल्यासाठी तो केवळ विस्मयकारीच!

आपली प्रतिक्रिया द्या