
>> वैश्विक
साधारण 16 ते 25 एप्रिल या काळात दरवर्षी स्वरमंडल (लायरा) या तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर उल्का वर्षाव होतो. उल्का वर्षावांच्या तारखा निश्चित असतात. कारण मुळात तो कुठल्या तरी धूमकेतूने त्याच्या भ्रमणकाळात मागे सोडलेल्या द्रव्यामुळे होत असतो. कोणत्या धूमकेतूच्या शेपटीतील द्रव्य म्हणजे धूळ, दगड वगैरे अवकाशात कुठे आहेत हे समजल्यावर उल्का वर्षाव कुठून व कधी होणार याचे अनिश्चित गणित मांडता येते. अशा उल्का वर्षावांना तो ज्या तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर होतो त्याचे नाव दिले जाते.
मिथुन, सिंह या राशींच्या पार्श्वभूमीवर होणाऱया उल्का वर्षावांना त्या ‘राशीतील’ उल्का वर्षाव म्हणतात. त्यात सिंह राशीतला नोव्हेंबर महिन्यातला उल्का वर्षाव नयनरम्य असतो. 1998 मध्ये त्याची सर्वोत्तम प्रेक्षणीय वेळ असताना आम्हाला नियोजित कार्यक्रमाच्या आधीच्या रात्रीच ताशी दोनशे ते अडीचशे उल्कांचा ‘पाऊस’ आणि काही तेजस्वी अग्निलोलक (फायरबॉल) रात्रीचं काळोखं आकाश तेजाळताना दिसले होते. मुंबईजवळच्या वांगणी येथे हा वर्षाव पाहण्याच्या कार्यक्रमाला सुमारे दहा हजार लोक आले आणि अचानक आकाश ढगाळून ‘धो-धो’ पावसाने सगळय़ा आनंदावर अक्षरशः पाणी ओतलं. ही 1998 मधली घटना.
त्यानंतर अनेकदा अनेक उल्का वर्षावांचा अनुभव घेतला. तसं रोज रात्रीच काय, पण दिवसासुद्धा पृथ्वीवर उल्का वर्षाव होतच असतो. अवकाशात फिरणारे छोटे दगड, धूलिकण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने सतत खेचले जातात. वातावरणाशी घर्षण होऊन ते क्षणकाळ चमकतात आणि उल्का पडली असं आपण म्हणतो. मात्र तो ‘तारा’ नव्हे हे लक्षात ठेवायचं. इंग्लिशमध्ये ‘शूटिंग स्टार’ असं म्हटलं जातं, पण तारा आपल्या सूर्यासारखा असतो. तेव्हा असे वाप्रचार शब्दशः घेता येत नाहीत. एखादी उल्का प्रचंड आकाराची असेल तर तिला ‘अशनी’ म्हणतात आणि त्यातून लोणारसारखे विवर अथवा तुंगुस्कासारखा उत्पात घडू शकतो.
रात्रीच्या वेळी पडणाऱया उल्काच दिसणार हे उघडच आहे. त्यातही त्याच्या आसपास अमावस्या असेल तर आकाश अधिक काळोखं असताना उल्का वर्षावाचं दृश्य अधिक चांगलं दिसेल. यावेळी बाहेर पडून समूहाने उल्का वर्षाव पाहणं शक्य नाही आणि आकाशात चंद्र असल्याने तो फारसा प्रभावी दिसणारही नाही. मात्र ‘स्वरमंडला’तून रात्री 16 ते 25 एप्रिलच्या दरम्यान होणाऱया उल्का वर्षावाच्या निमित्ताने या छोटय़ाशा, पण महत्त्वाच्या स्वरमंडलाची माहिती घेऊया. ‘लायरा’ या इंग्रजी नावाला ‘स्वरमंडल’ हे हिंदुस्थानी नाव दिलं बाळशास्त्री जांभेकर यांनी. त्यांच्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वर्तमानपत्रात 1832 मध्ये त्यांनी खगोलशास्त्राचा वैज्ञानिक विचार मांडला हे महत्त्वाचे.
स्वरमंडलातून होणाऱया ‘लायरिड्स’ उल्का वर्षावाचे कारण अर्थातच एक धूमकेतू आहे. 415 वर्षांच्या काळाने त्याचा फेरा आपल्या सूर्यमालेत होतो. 1861 मध्ये या ‘थॅचर’ धूमकेतूचे निरीक्षण केले गेले होते. आता तो 2276 मध्ये दिसेल. पुढच्या वर्षी अवकाश स्थिती अनुकूल असली आणि पृथ्वीवरची स्थिती कोविडमुक्त आरोग्यदायी असली तर ‘लायरिड्स’चा अनुभव घेता येईल.
या स्वरमंडल तारकासमूहात एक महत्त्वाचा तारा आहे. आपल्याला रात्री दिसणाऱया ठळक ताऱयांपैकी पाचव्या क्रमांकाच्या या ताऱयाचे नाव अभिजित. त्याचे वस्तुमान तीन सूर्यांएवढे असून तो आपल्यापासून 26 प्रकाशवर्षे अंतरावर आहे.
अभिजित ताऱयाचे वैशिष्टय़ म्हणजे आणखी 10 हजार वर्षांनी म्हणजे इसवी सन 12000 मध्ये तो आपला धुव्रतारा असेल. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या भोवऱयासारख्या परांचन गतीमुळे भौगोलिक ध्रुवाचेही एक वर्तुळ तयार होते. त्यावर येणारे तारे क्रमाक्रमाने ‘ध्रुव’ तारे ठरतात. या वर्तुळाचा काळ सुमारे 26 हजार वर्षांचा असतो. पूर्वी सप्तर्षी आणि ध्रुवमत्स्य तारकासमूहांच्या दरम्यान असलेला ‘ठुवान’ हा तारा ध्रुवतारा होता. आता 10 हजार वर्षांनी अभिजित असेल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वातील एकूणच गतिमानतेचा परिणाम आपल्या सूर्यमालेवरही झालेला आहे. आपली सूर्यमाला अभिजित या नियोजित ध्रुवताऱयाच्या व अगदी गणिती भाषेत हंस (सिग्नस) तारकासमूहातील चौथ्या क्रमांकाच्या दिशेने सेकंदाला 19 किलोमीटर वेगाने जात आहे. या लेखात ‘स्वरमंडला’तील प्रसिद्ध ‘रिंग नेब्युला’ (तेजोमेघ)चा ‘हबल’ने घेतलेला फोटो दिला आहे. अशा या वैश्विक घटना आणि त्यांच्या काही काल्पनिक तर काही वैज्ञानिक गोष्टी. यापैकी काल्पनिक कथा तारकासमूह लक्षात ठेवायला व मनोरंजनासाठी उपयुक्त ठरतात, तर वैज्ञानिक सत्य जाणून घेतल्याने अभ्यासाचे समाधान लाभते. सध्याच्या कठीण कोविड काळात घरच्या घरी ‘तारांगण’सारखी सोपी, परंतु माहितीप्रद पुस्तके वाचून अवकाशाची ओळख करून घेतली तर मोकळेपणाने वावर पुन्हा सुरू होईल तेव्हा मुक्तपणे आकाशदर्शन करणे सोपे होईल.






























































