ताल गवसलाय…!

268

>> मिलिंद शिंदे

गणेश पंडित. नाटक, चित्रपटांच्या मोहमयी दुनियेत अनेकांना नशीब आजमावायचे असते. गणेशही त्याच प्रयत्नांत… लेखणीने हात दिला आणि आता त्याच्या संघर्षाचे रंग खुलु लागले आहेत…

“मी ऍक्टर काही बरा नव्हतो आणि यात माझं काही होईल असं मला वाटत नव्हतं’’ असं निखळपणे, स्वच्छ हसत गणेश पंडित कबूल करतो. गणेशच्या घरात नाटक-सिनेमाचं काही बॅकग्राऊंड नाही, पण आईला थोडी जाण होती. ती गणेशला शाळेतल्या कार्यक्रमासाठी भाषणं लिहून देत असे. तेवढंच काय ते वातावरण. गणेश कुठे शिकला नाही, पण त्याला जवळपास सगळी तालवाद्यं येतात. त्यांच्यात तो रमतो.

‘किलबिल’ या दूरदर्शनवर गाजलेल्या मालिकेत काम करण्यापासून गणेशची सुरुवात. अशोक पावसकरांनी त्याला त्या मांडवात नेलं आणि त्याच्यावर बालनाटय़ांच्या माध्यमातून प्राथमिक रंगसंस्कार केले.

भाईंदरच्या कॉलेजात काही मन रमेना. मग गोखले कॉलेज गाठलं. तिथे मित्र भेटले. आजचा आघाडीचा गायक, संगीतकार अवधूत गुप्ते आणि गायक, नट अमोल बावडेकर. महाविद्यालयाच्या नाटय़वर्तुळात गणेश रमला. त्याला ते विश्व जवळचे वाटू लागले.

केदार शिंदेचे त्या महाविद्यालयात एकांकिका बसवण्याच्या निमित्ताने आगमन झाले. ‘बॉम्बे मेरी जान’ या एकांकिकेने त्यावर्षी सर्व स्पर्धांमध्ये धुमाकूळ घातला. अगदी आयएनटीपासून ते चतुरंगपर्यंत सगळीकडे बाजी मारली. महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धांमध्येही पारितोषिकं मिळवली. आपण काहीतरी नवीन करतोय, हेच आपल्याला हवं आहे, हेच करायचं आहे, असं मन सांगू लागलं, पण ‘‘नोकरी कर’’ असे घरचे तगादा करू लागले. ‘‘शाळा, कॉलेजपर्यंत नाटकबिटक ठीक आहे. आता काहीतरी पोटापाण्यासाठी करायला बघ.’’ घरच्यांचा सतत लकडा पाठीशी होताच आणि स्वतःला जे करावंसं वाटतंय त्या आघाडीवरही तसं उत्पादक काही घडत नव्हतं. मग काय धरली नोकरी. खरं तर नोकऱया. अनेक नोकऱया केल्या. काही बँकांमधून, काही खासगी कार्यालयांतून. मन काही रमत नव्हतं. हे माझं काम नाही हे सांगत होतं, पण घरच्यांच्या आग्रहाखातर नोकरी करावीच लागत होती. शरीरानं मी फक्त कार्यालयात असे. मनाने कुठेतरी पुस्तकात, नाटकात फिरत असे. त्या कामात लक्ष लागण्याचा प्रश्नच नव्हता. मनातला कोलाहल धक्के देतच होता आणि एक दिवस संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं अरिष्ट कोसळलं. अर्थव्यवस्था गडगडल्या. औद्योगिक धंद्यावर परिणाम झाला तशा काही खासगी संस्थाही हादरल्या. त्यांनी कामगार कपात सुरू केली. त्या कपातीमध्ये अनेक कामगार कामावरून कमी करण्यात आले. त्यात गणश पंडित हाही एक होता. बाकी कामगारांना, कर्मचाऱयांना त्यांची नोकरी गेल्याचं दुःख झालं होतं, पण गणेश पंडितला आपली नोकरी गेल्याचा आनंद झाला होता. खूपच! बाहेर आर्थिक मंदी होती, पण गणेशच्या मनात तेजी रुंजी घालत होती. याचाच फायदा घेऊन गणेशनं घरी एकदाचं, निर्वाणीचं सांगून टाकलं की, ‘‘मी आता नोकरी करणार नाही. मला नाटक-सिनेमा आवडतो. मी तेच करणार.’’ शेवटी घरच्यांनीही ‘‘बघ बाबा!’’ म्हणून परवानगी दिली (की गणेशनं मिळवली) आणि गणेश मोकळा झाला. आता त्याला त्याचं काम करायचं होतं, मनसोक्त जगायचं होतं. चौखूर उधळायचं होतं. त्याचं पहिलं नाटक आलं, ‘पांडुरंग फुलवाले’. मग दुसरं आलं परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’. तुफान गाजलं हे नाटक. गणेशच्या दोन्ही कामांचं (हिटलर आणि बबन) कौतुक झालं. घेतलेला निर्णय सार्थकी लागेल असं वाटू लागलं. आपल्या मनासारखं घडेलच असं कलाक्षेत्रात आरंभीच्या काळात सांगता येत नाही. झालं तसंच, नाटक थांबलं. पुन्हा एक अंतराय…

गणेशनं आधी म्हटल्याप्रमाणे तंत्रात जास्त रस. ते त्याला नीरज व्होरांकडे घेऊन गेलं आणि तो शब्दांमध्ये रमू लागला. त्याला ‘पटकथा’ हा शब्द माहीत होता, पण तो नीरज व्होरांच्या सहवासात त्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेत होता. त्याला एखाद्या वाक्याच्या असण्याचं आणि नसण्याचं प्रयोजन कळू लागलं, बारकावे कळू लागले. आपण थोडे श्रीमंत होतोय हे त्याला उमगू लागलं.

पण आर्थिक आघाडीवर तशी श्रीमंती येत नव्हती. जवळचे मित्र तोपर्यंत कुठल्या कुठे पोहोचले होते.

‘‘तुझं काय?’’ असा प्रश्न लोक विचारत होते आणि तोच प्रश्न मलाही पडत होता. आपलं काय?

मित्रांकडे कामे मागितली, शिफारस मागितली, पण फार काही फरक पडला नाही. काहीच आश्वासक हाती लागलं नाही. अर्थात गणेश त्यांना दोष देत बसत नाही. वर म्हणतो की, त्यांचीही त्यावेळी मदत, शिफारस करण्याची परिस्थिती नसेल, मग पुन्हा झगडा सुरू होतो. स्वतःशीच.

‘मुन्नाभाई एस.एस.सी.’ नावाचा सिनेमा लिहिला, पण यश यथातथाच. नाहीच म्हणूया.

अंबर हडप भेटला मग. गट्टी जमली. दोघेही लेखनात उत्तम. दोघांचं जमलं. कल्पना शेअर करणं सुरू झालं. काही मालिका लिहिल्या, पण फार काही सृजन हाती लागेना. अंबर हडपच्या मनात बरेच दिवस एक गोष्ट रुंजी घालत होती. ती त्याने गणेशला सांगितली. पौगंडाकडे झुकणाऱया किंवा पौगंडावस्थेतील मुलांचं आणि पालकांचं मनोविश्व यावर मंथन करणारं हलकं, पण प्रभावी प्रहसन. त्यातून घेतला जन्म ‘बीपी’ या एकांकिकेनं. अतिशय ऊर्जावान एकांकिका. खूप गाजली. अंबर-गणेश जोडी चर्चेत आली. त्यावरूनच रवी जाधवनं नंतर ‘बालक पालक’ (बीपी) असा सिनेमा केला. तोही खूप गाजला.

लग्न झालं होतं. आर्थिक ताणाताण होत होतीच. पत्नी समिधानं गणेशसाठी खूप कष्ट उपसले. घरातले सुट्टे पैसे गोळा करून, जमवून, वाचवून कधी काही बस स्टॉप पायी जाऊन तेवढेच पैसे वाचतील म्हणून खूप आधार दिला, पण ती हटली नाही. गणेशसोबत उभी राहिली खंबीरपणे. या सगळय़ा कालावधीत गणेशनं एक सिनेमा हातावेगळा केला होता. ते कथानक घेऊन तो निर्मात्यांच्या दारोदारी फिरत होता, पण हाती काही लागत नव्हतं. एका ठिकाणी कथानकाचं जमलं. मग दिग्दर्शक कोण? पुन्हा थांबलं. मग तूच का करत नाहीस? असं निर्मात्याने विचारलं, तर गणेश नम्रपणे ‘‘नाही’’ म्हणाला. ‘‘तुम्ही इतके पैसे लावणार, मी काही फेमस दिग्दर्शक नाही. मोठा/ प्रसिद्ध दिग्दर्शक घ्या. आपल्याला फायदाच होईल.’’ गणेश प्रामाणिकपणे म्हणाला, पण नाहीच. ‘‘तूच कर’’. त्यांनी शेवटी गणेशला तयार केलं. गणेशचा सिनेमा येतोय ‘मेकअप’. रिंकू राजगुरू यात प्रमुख भूमिकेत आहे. गणेश म्हणतो, ‘‘आता घरच्यांना कळतंय कशासाठी माझी एवढी धडपड चालली होती.’’ तरीही गणेश स्वतः जे स्ट्रगल केलं त्याचं फार गाणं गात बसत नाही. हो, जे काही स्ट्रगल केलं ते माझ्यासाठीच केलंय ना? इतक्यातच तो ती कथा संपवतो. गणेश पंडित आता ‘मेकअप’ करून/ घेऊन तयार आहे विंगेत.

लवकरच तो समोर येईल.

z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या