लेख – चमत्कारशरण मानसिकता बदलायला हवी!

>> संजय बनसोडे

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार चमत्काराच्या पूर्ण विरोधी असतो हे समजून घ्यायला नको का? जादूगार अनेक छान प्रयोग करतात, पण ते सांगत असतात, मी जे काही करतो ते दैवी शक्तीचे नसून या प्रयोगाच्या मागे विज्ञान, तंत्र, हातचलाखी आहे. अशा जादूगारांना आपण कोणीही शरण जात नाही. मात्र भोंदूबाबांनी आपल्याकडे चमत्काराची शक्ती आहे असे म्हटले की आपली शरणवृत्ती वाढते. ही वृत्ती आपण बदलायला हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाचे कर्तव्य आहे. वैज्ञानिक मूल्यनिर्मितीमध्ये हे चमत्कार अडथळा ठरतात.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर या काळात ‘चमत्कारामागील विज्ञान’ ही मोहीम राबवली गेली. राज्यस्तरीय ‘चमत्कार सादरीकरणाची स्पर्धा’ही यानिमित्ताने आयोजित केली आहे. काही व्याख्यानांचेही आयोजन केले गेले. तसेच आज, म्हणजे 21 सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावरील एक वेबिनार आयोजित केला आहे. देशभरातील विवेकवादी चळवळीतील अनेक मान्यवर या वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. आधुनिक माणूस म्हणून आपण चमत्कार आणि चमत्काराचे दावे करणाऱया लोकांना समाजजीवनातून हद्दपार करायला हवे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने चमत्कारविरोधी भूमिका घेऊन लोकांचे व्यापक प्रबोधन करीत आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कटिबद्ध आहे.

गेली 25 वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 21 सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय चमत्कार सत्यशोधन दिन’ म्हणून साजरा करत आहे. यानिमित्ताने चमत्काराला विरोध व आव्हान, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्याचे काम सुरू आहे. 21 सप्टेंबर 1995 रोजी गणपती दूध प्यायला ही अफवा सकाळी पसरली. देशभर, जगभर या अफवेची बातमी पसरली. गणरायाला दूध पाजण्यासाठी रांगा लागल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेबाबत वास्तव मांडायचा प्रयत्न केला.

प्राचीन काळापासून भोंदू मंडळी करत असलेल्या चमत्कारांवर सर्वसामान्य लोक लगेच विश्वास ठेवत आले आहेत. चमत्कारशरण अशी मानसिकता समाजात वारंवार उफाळून येते. एखादा चमत्कार घडावा, अशी बहुसंख्य लोकांची अंतरीची सुप्त इच्छा असते. चमत्कार करणाऱया व्यक्तीबद्दल लोकांना प्रचंड आदर आणि श्रेष्ठत्वाची भावना असते. लोकांची ही मानसिकता हेरूनच कथित चमत्काराचे मायाजाल पसरवले जाते. भोंदू मंडळींची शोषणव्यवस्था उभी राहते. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठे काम उभे केले आहे. सामाजिक-आर्थिक व्यवस्था, धर्माचा प्रभाव आणि इतर विविध कारणांनी लोक चमत्काराला बळी पडत आले आहेत. चमत्कार होत नसतात याबद्दलची व्यापक भूमिका घेऊन समितीने सातत्याने प्रबोधन केले आहे. राज्यभर कार्यकर्ते चमत्कार सादरीकरणाचे कार्यक्रम करून लोकांची जागृती करण्याला प्राधान्य देत आहे. चमत्कार हे भोंदू बाबांचे एक हत्यारच आहे. म्हणूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्काराला आणि चमत्कार करून लोकांची फसवणूक करणाऱया भोंदूंच्या विरोधात उघड मोहीम उघडली. ती आता यशस्वी झाली आहे. 1995 मध्ये समितीने ‘चमत्कार सत्यशोधन यात्रा’ काढली. 2003 मध्ये ‘चमत्कार घडवा, यात्रा आडवा आणि समितीचे बक्षीस मिळवा’ अशी राज्यव्यापी मोहीम केली. आजही समितीने 21 लाख रुपयांचे बक्षीस ठेवलेले आहे. हे चमत्काराचे आव्हान अद्याप महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातल्या कोणीही स्वीकारलेले नाही.

अनेक भोंदू बाबा आणि मांत्रिक मंडळी दैवी सामर्थ्याच्या आधारे निपुत्रिक जोडप्यांना संततीसुख प्राप्त करून दिल्याचा दावा करतात. ‘नवसे कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती’ हा संत तुकोबांनी सांगितलेला विचार समाजाने समजून घेतला तर अशा पद्धतीचे भ्रम आपोआपच होणार नाहीत किंवा झालेच तर दूर होतील. खरं म्हणजे एक साधी गोष्ट आहे. हातातून सोन्याची चेन, अंगठी, उदी, हिऱयाचे हार काढणारे भोंदूबाबा लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करतात. या भोंदूंना विचारलं पाहिजे की सोन्याची चेन, अंगठी आम्हास नको. एखादा भोपळा द्या, सायकल द्या, नांगर काढून दाखवा. या गोष्टी ते कदापि देणार नाहीत. आपण देवाचा अवतार आहोत, असे सांगून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करणारे शेकडो भोंदू बुवा, बाबा, मांत्रिक यांची उदाहरणे सांगता येतील. एवढेच काय, समुद्राचे पाणी गोड झालं, देवळातील झुंबर आपोआप हलू लागलं, चर्चमधील फोटोतून पाणी येऊ लागले, कबर जमिनीतून वर आली, झाडातून तीर्थ वाहू लागले, सोनं दुप्पट होऊ शकते, पैशाचा पाऊस पाडला जातो, अशा असंख्य चमत्कारिक घटनांची अफवा पसरविली जाते. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नेहमीच ठाम भूमिका घेऊन थेट संघर्ष केला आहे. अशा अनेक स्वरूपाच्या अंधश्रद्धांचे, भोंदू लोकांचे खरे स्वरूप समोर आणण्यात समितीला यश आले आहे. आपल्या देशातील अनेक संत सुधारकांनी चमत्काराला, अशा ढोंगी वृत्तीला नेहमीच विरोध केला आहे.

संत तुकडोजी महाराज याबाबत म्हणतात,
‘चमत्काराच्या भरी भरोनी
झाल्या या अनेकांच्या धूळधानी,
संत चमत्कार यापुढे कोणी
नका वर्णू सज्जन हो,
लोकांचिया ओळखून भावा, अनेक दांभिक येती गावा,
लुटती जनास ढोंगी बाबा, मागे लागूनिया.
प्रयत्नांचा मार्ग सोडती, अल्पयासे लाभ इच्छिती,
चमत्काराच्या थापेत जाती, गारुडी यांच्या..’
चमत्काराबाबत स्वामी विवेकानंद म्हणतात,

‘ज्या शुद्ध हिंदू धर्माचा मी पुरस्कार करतो, तो चमत्कारावर आधारित नाही. चमत्कार व गूढ गोष्टीच्या मागे लागू नका. चमत्कार हे सत्य प्राप्तीच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत. चमत्काराचे वेड आपल्याला खुळे व दुबळे बनवीत असते.’ आपण हे समजून घेतले तर आपण चमत्काराच्या मानसिक गुलामीतून मुक्त होऊ.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलखोल केलेली बुवाबाजीची प्रकरणे पाहता समितीने सर्वच धर्मांतील बुवाबाजीला विरोध केलेला दिसेल. समितीच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्यामुळे अशा बुवाबाजीला रोखणे शक्य झाले आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू झाल्यापासून साडेतीनशेपेक्षा जास्त गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल करून त्यातल्या काहींना शिक्षाही झालेली आहे.

चमत्कार आणि विज्ञानाचं नातं अंधार आणि प्रकाश यासारखे आहे.विश्वातील प्रत्येक घटनेमागे कारण असते आणि हे कारण शोधता येते. आतापर्यंत अनेक घटनांची कारणे माणसाला सापडली आहेत. अजून काहींची कारणे शोधणे चालू आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार चमत्काराच्या पूर्ण विरोधी असतो हे समजून घ्यायला नको का? जादूगार अनेक छान प्रयोग करतात, पण ते सांगत असतात मी जे काही करतो ते दैवी शक्तीचे नसून या प्रयोगाला मागे विज्ञान, तंत्र, हातचलाखी आहे. अशा जादूगारांना आपण कोणीही शरण जात नाही. मात्र भोंदूबाबांनी आपल्याकडे चमत्काराची शक्ती आहे हे असे म्हटले की, आपली शरणवृत्ती वाढते. ही वृत्ती आपण बदलायला हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाचे कर्तव्य आहे. वैज्ञानिक मूल्यनिर्मितीमध्ये हे चमत्कार अडथळा ठरतात.

आपली प्रतिक्रिया द्या