लेख – मोपा विमानतळ – गोवा आणि सिंधुदुर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुरेंद्र मुळीक ([email protected])

मोपा विमानतळ सुरू झाल्यावर उत्तर गोव्याचा विकासाचा चेहरा बदलणार आहेच, पण त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिह्यालाही आपला आर्थिक विकास करण्याची संधी निर्माण झाली आहे. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिह्याच्या विकासाचे दरवाजे उघडले जाणार आहेत. कारण हे विमानतळ उत्तर गोवा आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर आहे. विमानतळावर सुरुवातीच्या काळात वर्षाला येणाऱ्या 40 ते 45 लाख पर्यटकांपैकी पाच टक्के पर्यटक म्हणजे दोन लाख जरी सिंधुदुर्ग जिह्यात वळले तर त्यांना योग्य ती सेवा पुरविण्याची तयारी तरुणांनी ठेवायला हवी.

गोव्यातील बहुचर्चित अशा ‘मोपा’ विमानतळावर अखेर विमान उतरविण्याची यशस्वी चाचणी पार पडली आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर गोवेकरांनी दीर्घ श्वास घेतला. दिवंगत पेंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुहूर्तमेढ केलेल्या या विमानतळाची आज पूर्तता झाली. ‘मोपा आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळ’ या नावाने हे विमानतळ ओळखले जाणार आहे. हे विमानतळ उत्तर गोव्यात होऊ नये यासाठी दक्षिण गोवेकरांनी,  हॉटेल्स लॉबीपासून स्थानिक जनतेपर्यंत साऱ्यांनीच विरोध केला होता आणि त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने हा विरोध साहजिकच होता, परंतु गोव्याचे खंबीर नेतृत्व असलेल्या पर्रिकर यांनी हा सर्व विरोध बाजूला सारत मोपा विमानतळाची मुहूर्तमेढ रोवलीच. नियोजित वेळेनुसार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी या विमानतळाचे उद्घाटन होणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. अखेर 5 सप्टेंबर रोजी विमान उतरविण्याची यशस्वी चाचणी पार पडली. असे असले तरी प्रवासी सेवेसाठी विमानतळ लगेच खुले होईल असेही नाही. डिसेंबरच्या सुरुवातीस हे विमानतळ प्रवासी वाहतुकीस खुले होईल.

शंभर वर्षे लागली

हिंदुस्थानात विमान वाहतुकीची सुरुवात 1920 साली झाली, तर 1927 साली नागरी विमान विभाग सुरू झाला आणि आज तब्बल शंभर वर्षांनी महाराष्ट्र – गोव्याच्या सीमेवर विमानतळ उभे राहत आहे. याचे  कारण म्हणजे प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये नागरी विमान वाहतुकीसाठी भरघोस अशी तरतूद झालीच नाही. पहिल्या योजनेत अवघे 7 कोटी, दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेत  16 आणि 26 कोटी. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या योजनेत अनुक्रमे 200, 295 व 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. म्हणजेच 30 वर्षांच्या कालावधीत  अवघे 1 हजार 244 कोटी रुपये मिळाले. जेव्हा सातव्या योजनेत 2450 कोटी रुपयांची आवश्यकता होती तेव्हा फक्त 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. येथेच सारे गणित बिघडले गेले. मागील चार दशकांत विमान वाहतुकीच्या सेवेत वेगाने वाढ होताना दिसून आली आहे. अगदी सामान्यातली सामान्य  व्यक्ती विमानाने प्रवास करताना दिसत आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विचार केला तर या विमानतळावरून वर्षाला 5 कोटी 91 लाख 57 हजार प्रवाशांनी प्रवास केला. यात 1 कोटी 34 लाख 52 हजार प्रवासी आंतरराष्ट्रीय होते.  ही आकडेवारी कोविडपूर्वीची 2018ची आहे. हे पाहता मोपा येथील विमानतळावरून किती प्रवासी  प्रवास करू शकतात याची कल्पना येईल. कारण  देशातील  आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये मोपाचा दुसरा क्रमांक आहे. इतकेच नव्हे तर जागतिक स्तरावरील पर्यटन पेंद्र गोव्यात आहे.  म्हणूनच सुरुवातीच्या काळात या विमानतळावरून तासाला एक हजार प्रवासी ये-जा करू शकतील या क्षमतेने वर्षाला 40 ते 45 लाख प्रवासी येणार असा अंदाज वर्तविला आहे. ज्यावेळी या विमानतळाचे काम पूर्ण होईल त्यावेळी ही प्रवासी क्षमता 1 कोटी 35 लाखांपर्यंत पोहोचेल. हे पाहता सध्या अस्तित्वात असलेले दक्षिण गोव्यातील दाभोलीम विमानतळाचे काय होईल? असा प्रश्न सर्वांना आहेच.

उत्तर गोवा आणि सिंधुदुर्गची कसोटी

मोपा विमानतळ सुरू झाल्यावर उत्तर गोव्याचा विकासाचा चेहरा बदलणार आहेच, पण त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिह्यालाही आपला आर्थिक विकास करण्याची संधी निर्माण झाली आहे. विमानतळाची नुसतीच उभारणी करून गोवा सरकार थांबणार नाही, तर येणाऱ्या पर्यटकांना उच्च सुविधा मिळाव्यात यासाठीही अनेक प्रकल्प उभे केले जाणार आहेत. यात मांडवी वॉटर फ्रंट, कोलवाल समुद्रकिनाऱ्याचा आधुनिक विकास, पाच लाख चौरस मीटरमध्ये भव्य आय.टी. पार्क, इथेनॉल प्रकल्प, देशातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिह्याच्या जवळच उत्तर गोव्यातील धारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य असे क्रिकेट स्टेडियम, ज्याची क्षमता 35 हजार प्रेक्षकांची असेल. येणारे हे सर्व प्रकल्प पाहता गोव्याचा विकास होणार यात शंकाच नाही, पण तेथील स्थानिक जनतेला हा विकास मानवेल का? असा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांसमोर उभा आहे. गोव्यातील स्थानिकांची सध्याची स्थिती फारच दयनीय आहे. परप्रांतीय व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गोव्याला घेरले आहे. दक्षिण गोव्यात ही स्थिती जरा जास्त आहे. तेथील स्थानिक जनतेचा पावलोपावली वाद सुरू असतो. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटत असतातच. आता उत्तर गोव्यातील स्थानिकांना या गोष्टीला सामोरे जावे लागेल. कारण हे सर्व प्रकल्प उभे राहिले की, त्याला अनुसरून अनेक जोडव्यवसायही उभे राहणार आहेत. येत्या पाच – दहा वर्षांत हे सर्व होणार आहे. त्यामुळे गोव्यातील लोकसंख्या दुपटीने वाढू शकेल. 2011 च्या जनगणनेप्रमाणे गोव्याची लोकसंख्या 15 लाख आहे. लोकसंख्या जरी कमी असली तरी गोव्याच्या भौगोलिक रचनेनुसार प्रति चौरस किमीमध्ये 394 लोक राहत आहेत. महाराष्ट्रात ही संख्या 363 आहे, तर कर्नाटकमध्ये 319 आहे. रस्ता वाहतुकीच्या बाबतही गोव्याची अवस्था दयनीय आहे.

गोव्यात सार्वजनिक वाहतुकीचा प्रचंड खेळखंडोबा झाल्याने खासगी वाहतुकीवर भर दिला गेला. त्यामुळे गोव्यात एक लाख लोकसंख्येमागे 58 हजार 633 वाहने वापरली जातात. वाहने वापरण्यामागे देशात गोव्याचा प्रथम क्रमांक आहे, तर 46 हजार 159 वाहने वापरणाऱ्या दिल्लीचा दुसरा क्रमांक आहे. म्हणूनच दिल्लीला प्रदूषणाने घेरले आहे. वरील सर्व स्थिती पाहता इवल्याशा गोव्याचा प्रदूषणाच्या विळख्याने श्वास कधी काsंडला जाईल हे स्थानिकांना कळणारदेखील नाही. गोवा हे सॉफ्ट राज्य आहे. ‘कुणीही यावे, टपली मारून जावे’ अशी गोव्याची अवस्था झाली आहे. मूळ गोवेकर अल्पसंख्याक कधी होतील हे त्यांनाच समजणार नाही. गोव्यातील या घडामोडींचा सिंधुदुर्ग जिह्यावर, विशेषतः दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ या तालुक्यांवर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होणार आहेत. कारण हे सर्व तालुके मोपा विमानतळाच्या 10 ते 45 मिनिटांच्या रेंजमध्ये आहेत. सुरुवातीपासून विमानतळावर वर्षाला येणाऱ्या 40 ते 45 लाख पर्यटकांपैकी पाच टक्के पर्यटक म्हणजे दोन लाख जरी सिंधुदुर्ग जिह्यात वळले तर त्यांना योग्य ती सेवा पुरविण्याची तयारी तरुणांनी ठेवायला हवी. विकासामुळे बदलत्या गोव्यात नोकरी मागण्यासाठी न जाता या विकासाचा फायदा करीत आपल्या सिंधुदुर्ग जिह्यात व्यवसाय कसा करता येईल याचा अभ्यास सिंधुदुर्ग जिह्यातील प्रत्येकाने करायला हवा. तर आणि तरच मोपा विमानतळ सार्थकी लागेल.