मनतरंग – ‘मूव्ह ऑन’ करायला शिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

निर्णय घेण्याचं आणि जबाबदारी स्वीकारण्याचं धारिष्टय़ असलं की प्रत्येक अडचणीतून मार्ग काढता येतो. मात्र निर्णय घेण्याची सवयच नसेल तर… अर्थातच प्रत्येक पायरीवर तुमची अस्थिरता वाढत जाणार. म्हणूनच निर्णय आणि जबाबदारी यांचं संतुलन पेलण्याएवढं स्वतःला सक्षम करा आणि मूव्ह ऑन करायला शिका.

त्यादिवशी अरुणने (नाव बदलले आहे) पुन्हा एकदा रीनाला (नाव बदलले आहे) फोन लावला आणि त्यांच्या नेहमीच्या जागी तिला भेटायला बोलावलं. रीनाला आणि तिच्या घरच्यांना हे असं त्याचं तिला तडकाफडकी बोलवणं काही नवीन नव्हतं. तिच्या घरचे ‘‘आता ही काही 3-4 तास घरी येणार नाही’’ हे गृहीतच धरून होते. रीनाही अरुणला म्हणजेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला गेली. अरुण तिच्या आधी पोहोचला होताच. ती येण्याची वाट बघत अस्वस्थपणे येराझारा घालत होता. रीना येताच अरुणने तिला घट्ट मिठी मारून त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. रीना काय समजायचं ते समजली होती.

असाच थोडा वेळ गेला. नंतर हळूहळू अरुण शांत होत गेला. त्याचा भावनांचा आवेग ओसरल्यानंतर रीनाने त्याला विचारलं ‘‘हासुद्धा बिझनेस तुला जमणार नाही का?’’ अरुणने उद्विग्नपणे ‘‘नाही’’ अशी मान हलवली. ‘‘रीना, मला लोकांना ‘नाही’ असं म्हणणं खरोखरच जमत नाही. काही गोष्टी मला जमण्यासारख्या नव्हत्या, पण तरीही मी माझ्या क्लाएंट्सना शब्द देऊन बसलो. का, तर त्यांना नाही म्हटलं तर मला ते पुन्हा काम देणार नाहीत आणि माझा बिझनेस सुरू होण्यापूर्वीच तोटय़ात जाईल. तुला माहीत आहेच की, मी पैशांची भरपूर गुंतवणूक केली होती, पण नाही जमली मला डेडलाइन!  आता क्लाएंट्सचा मी विश्वास गमावून बसलो आहे. काय करू यार?’’ अरुणच्या भावनांचा बांध आता पूर्णपणे तुटला होता.

‘‘काय करू?’’ यापेक्षाही त्याला जास्त टेन्शन त्याच्या वडिलांचे आले होते ते ‘‘बाबा कसे आणि किती ओरडतील?’’ याचे. तसं बघायला गेलं तर अरुण आणि त्याच्या वडिलांच्या छत्तीसचा आकडा होता. त्याच्या लहानपणापासूनच त्या दोघांमध्ये खटके उडायचे. त्याचे वडील कमालीचे शिस्तप्रिय असल्याने त्याचं घर हे घडय़ाळाच्या काटय़ावर चालायचं. खाणं, पिणं, बोलणं, झोपणं हे सगळं काही नियमांमध्ये बांधलं गेलेलं होतं. जर का नियम मोडला गेला तर त्या घरच्या माणसाला अरुणच्या वडिलांची बरीच बोलणी ऐकावी लागत. त्यामुळे घरातील इतर लोकांनाही त्याच्या वडिलांचं ऐकायची सवय लागलेली होती.

अरुण त्याच्या वडिलांना जास्त सलत असे. त्याच्यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. ‘मुलाने कायम शिस्त पाळावी’ अशा काहीशा कडक विचारांचे वडील असल्यामुळे त्यांच्या शिस्तीचा बडगा त्याच्यावरच असायचा. लहानपणापासूनच त्याने प्रत्येक बाबतीत बोल खाल्ला होता. आता तर या सगळ्याला तो चांगलाच सरावलेला होता. त्याला कळायला लागल्यापासून घरी तो हेच नियम, अटी बघत असल्यामुळे ‘हे असंच जगायचं असतं’ अशी त्याची  सरधोपट विचारसरणी झालेली होती. ‘कुठली गोष्ट जर होत नसेल तर इतर मार्ग पडताळून बघायचे असतात’ हे त्याला माहीतच नव्हतं. वाट वाकडी करून जाणं हे त्याच्या गावीही नव्हतं. म्हणूनच जरा काही परिस्थिती प्रतिकूल असेल तर तो कमालीचा घाबरून जात असे.  त्याला वडिलांचं दडपण यायचं कारण त्याने आयुष्यात काय करावं आणि महत्त्वाचं म्हणजे ‘नोकरीच करावी’ असा त्याच्या वडिलांचा आग्रह होता.

मात्र, वयाची पंचविशी उलटल्यानंतर अरुणला काही गोष्टींची जाणीव व्हायला लागली. त्याच्या वयाच्या इतर मुलांना असं स्वतंत्रपणे वागताना पाहिल्यावर तर ‘आपल्या आयुष्याबद्दल आपणही निर्णय घेऊ शकतो तर एक निर्णय घेऊ’ म्हणत घाबरत का होईना, त्याने स्वतःचा बिझनेस करायचे ठरवले होते. अर्थात, घरी थोडी कुरबूर झालीच, पण रीनाचाही पाठिंबा असल्यामुळे त्याने कामाला सुरुवात केली होती. वडील पूर्णपणे त्याच्यावर लक्ष ठेवून असायचेच. ‘प्रत्येक महिन्याला एक ठरावीक रक्कम कमव’ ही अट त्यांनी अरुणला घातली होती. म्हणूनच त्याने सुरुवातीलाच भरपूर कामं अंगावर घेतली, पण नियोजनाअभावी सगळंच फसलं. शेवटी त्याने आकारास येत असलेला बिझनेस निराश होऊन सोडला. नंतर मात्र त्याला आणि रीनाला योग्य मार्गदर्शनाची गरज भासली.

हे असं काहीसं चित्र काही कुटुंबांमध्ये सर्रास आढळतं. घरातील एखादी व्यक्ती जर तिची मतं किंवा निर्णय दुसऱयांवर लादणारी असेल तर त्याचा सगळ्यात वाईट आणि नकारात्मक परिणाम हा लहान मुलांवर होत असतो, जो त्यांच्या पुढील आयुष्यावर खोलवर परिणाम करतो. अशी मुलं ही मग कोडगी किंवा अतिसंवेदनशील बनतात. असंही पाहिलं गेलं आहे की, ही मुलं कुठलेही छोटे-मोठे निर्णय हे स्वतः घेऊ शकत नाहीतच आणि त्यांनी समजा ते घेतले असतील तर बऱ्याचदा त्या व्यक्तीचा प्रभाव त्यांच्या निर्णयावर असतो. ही मुलं जसजशी वयानं मोठी होत जातात तसतसा त्यांचा आत्मसन्मान कमी होत जातो. कारण कुठेही कसंही ऐकून घेण्याची सवय यांना झालेली असते. मग त्यांची अवस्था अरुणसारखी होते.

अरुण सारखा ‘स्वतःला शोधत होता’. त्याला ‘बाबा म्हणतात तसं इतके का आपण ढ आहोत?’ या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. कारण  सारखा अपमान आणि टोमण्यांना तो कंटाळला होता आणि त्यामुळेच हा निर्णय त्याने  घाईघाईत घेतला होता.

अशी तरुण मुलं जेव्हा मार्गदर्शनासाठी येतात तेव्हा त्यांना त्यांच्या  वैयक्तिक आयुष्यासाठी प्रोत्साहन देणं हे जिकरीचं काम होऊन जातं. कारण त्यांना स्वतःचं कौतुक ऐकण्याची  सवय नसते. त्यामुळे समुपदेशकावर विश्वास ठेवायला त्यांना वेळ लागतो. दुसरा अडथळा असतो तो ज्या व्यक्तीशी त्यांचा विसंवाद असतो ती व्यक्ती सहसा समुपदेशनासाठी येत नाही.

अरुणबरोबर रीनाचं असणं हे त्याच्यासाठी आणि समुपदेशनासाठी म्हणूनच महत्त्वाचं ठरलं. कारण रीनाच त्याला तो जसा आहे तसा स्वीकारत होती. त्याला सतत प्रोत्साहन देत कामामध्ये बिझी ठेवत होती. त्याच्या बारीक सारीक गोष्टी समुपदेशनाला येताना लक्षात ठेवत होती.

खूप कठीण असतं जेव्हा आपण सतत टीकेचा आणि अपमानाचा सामना करत असतो. हे सर्व जर लहानपणापासून असेल तर आयुष्य एकदम निरुत्साही बनते, पण त्यातून बाहेर पडायचं असेल तर खूप प्रयत्न करावे लागतात. जेव्हा आपण स्वतःला ‘‘खरंच असं आहे हे?’’ असं विचारतो तेव्हा आपल्याला बऱ्याचदा खरं उत्तर मिळतं. मनातील विचार आणि भावना म्हणूनच वेळोवेळी विश्वासू तसंच आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीला सांगणं हे महत्त्वाचं त्यामुळेच ठरतं. अरुणने या गोष्टी करायला सुरुवात केली होती. विचार व भावना व्यक्त करायची त्याला सवय लागत चालली होती. यामुळेच तो त्याच्या वडिलांशीही बोलताना एक प्रौढ आणि जबाबदार व्यक्ती म्हणून बोलायला लागला. महत्त्वाचं म्हणजे ‘नाही’ म्हणायलाही शिकला.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

[email protected]