नाचणाऱ्या बाहुल्यांच्या जगात!

>>आसावरी जोशी

21 मार्च. जागतिक कळसूत्री बाहुली दिन. अस्सल हिंदुस्थानी असलेल्या या लोककलेला खुद्द शिवरायांनी, शंभूराजांनी राजाश्रय देऊन ती वाढवली. कोकणच्या मातीत रुजवली. मग ही कला जोपासण्यासाठी आपलेही कर्तव्यच आहेच की!

बाहुलीशी आपलं आगळं नातं असतं. नकळत्या वयातील ही आपली सखी किती साध्या रुपात आपल्या समोर येते. लाकडाचा एक ठोकळा. त्याला लाल, काळ्या रंगात नाक-डोळे. पुढे या ठकीची चिंधीची बाहुली झाली. ही बाहुली. निदान सुरुवातीच्या काळात तरी खूप देखणी…सुबक कधी नव्हतीच. पण ती सगळ्या लहानांची अगदी खास मैत्रीण होती, अजूनही असते. कालची सगळ्यांची ठकी आज डॉली झाली असली तरी तिचे भावबंध तेच आणि तसेच आहेत.

काय करत नाही ही ठकी. बाहुला-बाहुलीच्या लग्नात नवरी म्हणून मिरवणं…मित्रमैत्रिणींची उणीव तर ही ठकी…डॉली कधीच जाणवू देत नाही. प्रत्येक सुख-दुःखात अश्रु टिपून घ्यायला नेहमीच हिचे हात पुढे येतात. हे झाले तिचे घरातील रूप.

प्रथमपासून ती मानवी भावभावनांशी एकरूप झालेली. त्यामुळे मानवी संवेदनांतूनच आकारल्या गेलेल्या लोककलेलाही ही ठकी आपलीशी वाटली तर त्यात नवल ते काय? आदिम काळात मनोरंजनाची साधनं मुळातच कमी. लोकगीतं, लोकनृत्य यातून भावभावना व्यक्त व्हायच्या. लोकनाटय़ही पुरुष कलावंतांच्या अभिनयातून साकार व्हायची. या मर्यादेलाच जोड मिळाली ठकीच्या अव्यक्त अभिव्यक्तिची. ठकीला बोलता नक्कीच येत नव्हतं. पण विविध करामतींनी ती नाचू लागली. हात-पाय हलवू लागली. अर्थात मानवी इशाऱ्यावरती गरीब, गोजिरी ठकी कळसूत्री बाहुली म्हणून मिरवू लागली.

moving-puppets-1

मूळ हिंदूस्थानीच
या कळसूत्री बाहुलीचे मूळ 400 वर्षांपूर्वीच्या लोककलेत सापडते. या बाहुल्यांची जन्मभूमी हिंदुस्थान असून हिंदुस्थानी नाटय़ाचे मूळ कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात सापडते. या कलेचा प्रसार महाभारत काळापासून होता. पुढे ही कला राजस्थान, केरळ, ओडिशा आणि महाराष्ट्रात रुजली.

400 वर्षांपूर्वीची कला
आपल्या महाराष्ट्रात 400 वर्षांपूर्वी हुकाऱ्या-कुकाऱ्यावर चालणारी भाषा महत्त्वाची होती. यातूनच बोटांची भाषा आपल्या ठाकर समाजाने जोपासली. बाहुल्यांसोबत चित्रकथीही जोपासली गेली. हा प्राचीन, पारंपरिक ठेवा कोकणातील सिंधुदुर्गात पिंगुळी गावातील ठाकर समाज आटोकाट जपत आहेत. आजही कळसूत्री बाहुल्यांची ही कला जिवंत ठेवण्यासाठी ठाकर समाजातील परशुराम गंगावणे अतिशय प्रयत्न करीत आहेत. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे आदिवासी कला आंगण या विभागात अनेक देशीविदेशी पर्यटकांची वर्दळ सुरू असते. हजारो वर्षांपूर्वीचे चित्र आणि साहित्य येथे पाहायला मिळते. या मंडळींकडे लिखित दस्तावेज नाही, मात्र रामायण-महाभारतातील कथा कळसूत्री बाहुल्यांच्या साथीने ऐकायला व पाहायला मिळणे हा एक अपूर्व अनुभव असतो. कपडय़ांचा रंगमंच, रंगीबेरंगी कपडय़ांच्या बाहुल्या. कथा, थोडीबहुत वाद्यं आणि सूत्रधाराच्या बोटांच्या तालावर या बाहुल्या जिवंत होतात.

मासे आणि कळसूत्री बाहुलीकार
ज्या गावात कळसूत्री बाहुल्या नाचवायच्या आहेत तेथे ठाकर मंडळी लवाजम्यासहीत पोहोचतात. पूर्वी ही ठाकर मंडळी त्या गावातील नदीवर जात. मासे पकडायचे आणि हे मासे घराघरांत पोहोचते केले जात. बाहुलेकारांकडून मासे आले की, आपसुकच कार्यक्रमाची दवंडी प्रत्येकाला मिळायची. या खेळाला हजेरी लावताना प्रेक्षक कलावंतांना तांदूळ, कोकम, मसाल्याचे पदार्थ भेट म्हणून देत. या देवाणघेवाणीतूनच कळसूत्री बाहुल्यांची ही लोककला महाराष्ट्रात फोफावली.

moving-puppets-2

शिवरायांचा राजाश्रय
शिवरायांच्या स्वराज्यात या लोककलेला राजाश्रय मिळाला. तेव्हा हा आदिम समाज पानांच्या , फुलांच्या रसापासून आकर्षक रंग तयार करीत, चित्रे रेखाटत, बाहुल्या तयार करत. महाराजांनी आपल्या गुप्तहेर खात्यात या कलेला स्थान दिले होते. पुढे संभाजीराजांनीही या लोककलेला आश्रय दिला. त्यांनी प्रथम या आदिवासींना चांगले कपडे दिले. कलेच्या सादरीकरणासाठी ठराविक मंदिरात जागा उपलब्ध करून दिली. कुडाळ येथील केळबाई, साळगाव येथील वेताळ, झारापमधील भावई मंदिर येथे कळसूत्री बाहुल्यांची कला सादर होत असे.

ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायातील ‘वल्ली’ हा शब्द ठाकर समाजाशी निगडीत आहे. म्हणजे ही कला माऊलींच्या काळातही प्रचलीत होती. वडिलोपार्जित मिळालेला हा वारसा जपण्यासाठी परशुराम गंगावणे यांनी आपली गुरे आणि गोठा विकून त्या जागी छोटेसे आर्ट गॅलरी संग्रहालय बनवले आहे. आपल्या महाराष्ट्राखेरीज राजस्थान, उत्तर प्रदेश, माळवा, केरळ या भागांतही कळसूत्री बाहुल्यांची परंपरा टिकून आहे. त्यांची कठपुतली लाकूड आणि कापडांचा वापर करून सजते. तिचे आकारमान कथानकावरून सजते.

रचनेच्या दृष्टिने कळसूत्री बाहुल्यांचे चार प्रकार आहेत.
छाया बाहुली – रंगीत कागद, पातळ कातडे यापासून तयार केलेल्या बाहुल्या दक्षिण भारतात प्रचलित आहेत.
हात बाहुली – हातमोज्याप्रमाणे हातात ही बाहुली घट्ट बसवली जाते व रंगमंचामागे उभी राहून हालचाल करता येते.
काठीबाहुली – हा प्रकार जपानमध्ये जास्त प्रचलित आहे.
सूत्रबाहुली – ही खरी कळसूत्री. मऊ कपडय़ांच्या आणि पातळ लाकडाच्या आधारे तिचा प्रत्येक अवयव साधला जातो. तिला सजवण्यासाठी हौस अपुरी पडते.

येत्या गुरुवारी जागतिक कळसूत्री बाहुली दिन आहे. मनोरंजन आपल्या हाताच्या बोटावर फिरते. ही आपली जिवलग बाहुलीही हाताच्या बोटांवरच नाचते, डोलते. अत्याधुनिक समाजमाध्यमातून ही अस्तंगत होत जाणारी कला जिवंत ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे, कारण काळ कितीही बदलला तरी अजूनही आपली नकळत्या वयातली सखी ही बाहुलीच असते. मग तिच्यासाठी एवढे करायलाच हवे.

ajasavari@gmail.com