आई अंबेचा उदो उदो!!

>> शिबानी जोशी

भोंडला, घागरी फुंकणे, गोंधळ, जागरण साऱयावर सध्या बंदी आहे. अजूनही मराठी मन या गोष्टींत रमते. पण आज काळाची गरज ओळखून प्रत्यक्ष देवीनेही या सामाजिक अंतरास सक्रीय पाठिंबा दिला आहे. मनामनातील जागर अखंड सुरू आहे.

नवरात्रीचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस, आसुरी विचारसरणीवर विजय मिळवण्याचे दिवस, तपश्चर्येचा महिमा आणि एकता याचे महत्त्व समजावणारे दिवस. या दिवसांत घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगीताने सर्व देशभरच भारून टाकले जातात.

संपूर्ण देशात नवरात्र विविध प्रकारे साजरी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सव असतो तर गुजरातमध्ये नऊ रात्री गरबा खेळून जागरण केले जाते. ज्या देवीने नऊ दिवस नऊ रात्र राक्षसाशी युद्ध केलं, जी आपल्यासाठी दिवस-रात्र जागली, तिच्या समवेत हे नऊ दिवस जागरण करावं असा यामागचा हेतू असतो. उत्तर प्रदेशमध्ये रामलीला नऊ दिवस केली जाते आणि दसऱयाच्या दिवशी रावणाचे दहन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये गुलाबाई या नऊ दिवसांत भोंडला खेळतात. पारंपरिक गाणी म्हटली जातात. नवरात्रीमध्ये ललिता पंचमी आणि अष्टमीला विशेष महत्त्व आहे. अष्टमीला पूर्वीच्या काळी कोकणामध्ये घागरी फुंकणे तसेच तांदळाच्या पिठापासून बनवलेला मुखवटा असलेली देवी घरात उभारून तिची पूजा करण्याची प्रथा होती. आजही ही प्रथा घरात नाही, पण काही सार्वजनिक संस्थांमध्ये सुरू आहे. एखाद्या महिलेच्या अंगात येणे हा चर्चेचा किंवा अंधश्रद्धेचा मुद्दा असला तरीसुद्धा या दिवशी सकाळी नवीन लग्न झालेल्या नववधू पहिली पाच वर्षे देवीची पूजा करण्यासाठी एकत्र जमतात आणि रात्री तांदळाच्या पिठाचा बनवलेला मुखवटा असलेली अतिशय तेजस्वी मूर्ती उभारली जाते आणि तिच्या समोर देवी अंगात आलेल्या महिला घागरी फुंकतात. आजही मुंबईत दादर, विलेपार्ले, बोरिवली, गोरेगाव, ठाणे अशा काही जुन्या मराठमोळ्या संस्थांमध्ये हा कार्यक्रम होतो, परंतु यंदा कोरोनाचे सावट सर्वच सणांवर आल्यामुळे भोंडल्याचे सार्वजनिक कार्यक्रम तसेच अष्टमीची पूजाही फारशी कुठे होणार नाही.

शेवटी सर्व धार्मिक कर्मे तसेच आपल्या रीतिपरंपरा आपण मानसिक समाधानासाठी आणि आनंदासाठी एकत्र येण्यासाठी पाळत असतो. आज जर कोरोनामुळे आपल्याला एकत्र येणे शक्य नसेल तर आपण आपले सण घरातच साजरे करावेत इतपत वैचारिक जाणीव हळूहळू निर्माण होऊ लागल्याचं दिसून येत आहे. नवरात्र आपण खरोखरच घरच्या घरी साजरी करू शकतो. घरच्या देवीची विधिवत पूजा करणे. घरातील महिलांना सन्मान देणे, महिलांनाही एक व्यक्ती म्हणून विकसित होण्याची संधी देणे महिलांच्या मेहनतीचा मान राखणे अशा गोष्टींतून आपण दुर्गेची उपासनाच करू शकतो. यंदा आपण गणेशोत्सवही अतिशय साध्या प्रमाणात साजरा केला तसेच नवरात्र आणि दसराही घरातल्या घरात घरच्या माणसांसोबत साजरा करायला काय हरकत आहे. आज देवळेही बंद आहेत तसंच अनेक सामाजिक संस्थाही भोंडला, अष्टमी, पंचमीसारख्या पूजा करणार नाहीत. या पूजा आपण घरातच करून देवीची आराधना करू शकतो. घरच्या देवीपुढे साग्रसंगीत आरती करणे, देवीचे नामस्मरण करणे, देवीची महत्त्वाची आराधना करणे हे आपण करू शकतो. अनादी काळापासून आसुरी वृत्ती, विचारावर मात करावी यासाठी देवीजवळ शक्ती मागितली जाते. सामर्थ्य मागितले जाते आणि आसुरी वृत्तीचा पराभव करण्यासाठी सद्विचार मागितले जातात. त्याचं रक्षण होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे. ही उपासना आपण घरच्या घरीच करूया. देवीच्या आशीर्वादामुळे पुढच्या वर्षी मोठय़ा उत्साहात आपल्यालाही नवरात्र साजरी करायला मिळू दे अशी इच्छाही बाळगूया.

 

आपली प्रतिक्रिया द्या