
>> दिलीप जोशी
2020 हे वर्ष कसं गेलं, असं कुणी विचारलं तर अगदी जगातील प्रत्येकाकडून उत्तर येईल ‘गेलं कसं तरी!’ त्याचं कोविड कारण सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या देशात याची गडद छाया दिवसेंदिवस कमी होत असून आरोग्याचा तेजस्वी सूर्य पृथ्वीवर पुन्हा तळपेल अशी चिन्हे नववर्षाच्या आरंभी दिसतायत. तिकडे युरोप, अमेरिकेत मात्र परिस्थिती अजूनही बिकट आहे. चिकट कोरोना त्यांची पाठ सोडायला काही तयार नाही; परंतु सभोवतीची सारी माणसं, सारा परिसर, अवघा देश आणि संपूर्ण जग जेव्हा सुखी असतं तेव्हाच आपण खऱया अर्थाने सुखी होऊ शकतो याचा साक्षात्कार सरत्या वर्षाने अकल्पितपणे करून दिला. तोपर्यंत जग ‘ग्लोबलायझेशन’ने आणलेल्या ऐहिक सुखांमध्ये मशगूल होते. मात्र कोविडच्या ‘ग्लोबलायझेशन’ने सारेच हबकले. त्याची वेदना आणि दुःख जागतिक झाले. आता यापुढच्या काळात जगातील प्रत्येक व्यक्ती सुखी होवो अशी इच्छा व्यक्त करूया. प्रसिद्ध कवयित्री अमृत प्रीतम यांनी एका कवितेत ‘बदनसीबीयों का मौसम बदल जाए।’ तो जीवघेणा मौसम बदलावा आणि जगाने आनंद ऋतूचा अनुभव घ्यावा यासाठी शुभचिंतन!
नव्या दुसऱया सहस्रकाची सांगता होऊन तिसरं ‘मिलेनियम सुरू झालं तेव्हा जन्मलेली पिढी आता तारुण्यात प्रवेश करतेय. त्यांच्या दृष्टीने नववर्षाचा हर्षोल्हास महत्त्वाचा असणारच. परंतु गेल्या वर्षीच्या मार्चपासून सारेच सण, सोहळे ‘जरा बेतानं बरं का’ अशा पद्धतीने साजरे करावे लागले. जल्लोषाचे पारंपरिक बेत मनातल्या मनातच विरले. एकूणच दैनंदिन व्यवहारावर अनेक बंधनं आली, पण जिवावर बेतण्यापेक्षा काही बेत काही काळापुरते रद्द करणे यातच सूज्ञपणा होता. आपल्या देशातल्या एकशेतीस कोटींच्या लोकसंख्येने ते नियम पाळले. मुंबईतला धारावीमधील गर्दीच्या वस्तीतून कोविडचं उच्चाटन ज्या नियोजनाने घडलं त्याचं जगभर कौतुक झालं. हळूहळू एकेक व्यवहार परस्परातील अंतर पाळून आणि मास्क वापरून सुरू झाले; पण कोविड वैऱयाची रात्र जोपर्यंत पूर्णतया विरून जात नाही तोपर्यंत सरकारी आणि प्रशासकीय सूचनांचं पालन करणं नागरिक म्हणून सर्वांचंच कर्तव्य आहे. कोविडचा अंदाज घेऊन कदाचित या वर्षारंभी मुंबईची लोकल ट्रेन सुरूही होऊ शकेल. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी पुन्हा पूर्वीची गती घेईल. तो क्षण लवकर अनुभवण्यासाठी शुभचिंतन!
गेल्या वर्षाने जगभरच्या अनेक हातांचं काम आकस्मिकपणे काढून घेतलं. संपन्न देशातले कोटय़वधी बेकारीच्या खाईत लोटले गेले. आपला देश तर विकसनशील. इथल्या रोजंदारीवर जगणाऱयांना या कठीण काळाने दिलेला तडाखा पाहिला की काळजात कालवाकालव होते. विविध क्षेत्रांत छोटी छोटी कामं करून आपला उदरनिर्वाह करत संसाराचा गाडा कसाबसा चालवणाऱयांची अक्षरशः दैना झाली. त्यातच जो देश आजही मोठय़ा प्रमाणवर शेतीप्रधान आहे, तिथल्या बळीराजावर निसर्गाने एकामागून एक संकटं आणली. कधी ‘निसर्ग’ वादळ तर कधी अवकाळी पावसाचा कहर आणि कुठे गारपीट… रुजवलेली उभी पिकं डोळय़ादेखत नष्ट होताना पाहावं लागणं हे सर्वस्व हिरावून घेण्यासारखं, पण निसर्गाच्या लहरीपुढे कोणाचे काय चालणार? मात्र नियोजनबद्ध प्रयत्नातून यावर मात करताना पुढच्या काळातील हवापाण्याचा विचार करूनच पुढे जावं लागेल. पुढच्या कृषी ऋतूमध्ये शेतकऱयाला सुगीचे दिवस दिसोत यासाठी शुभचिंतन!
हवामानाचा विषय निघाला की अमेरिकेत प्रतिवर्षी पेटणारं ऍमेझॉनचं जंगल, अनेक देशांत येणारे प्रलयंकारी महापूर आणि समुद्रात उसळणारी, आपल्याही देशाच्या मुख्यत्वे पूर्व किनाऱयावर धडकणारी वेगवेगळय़ा नावांची चक्रीवादळं याचं भयावह स्मरण होतं. या सर्व गोष्टींचे नैसर्गिक संकेत वेळीच लक्षात घेऊन प्लॅस्टिकबंदीसह अनेक पर्यावरणसंवर्धक उपक्रम आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले पाहिजेत. ‘सुखावह वाटणाऱया गोष्टी कालांतराने त्रासदायक ठरत असतील तर त्यांचा आधीच प्रयत्नपूर्वक त्याग करायला हवा. त्यातूनच रचनात्मक प्रगती साध्य करता येईल. त्यासाठी शुभचिंतन!
तसं पाहिलं तर आपलं मराठी नववर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं, पण गेल्या दोनशे वर्षांत युरोपीय कॅलेंडरचा जगात झालेला प्रसार आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यावहारिक रूढींमुळे आपण रोजच्या जीवनात ‘ग्रेगरियन’ कॅलेंडरच वापरतो. म्हणूनच 1 जानेवारीला नवे वर्ष साजरे करतो. गतवर्षाने काय दिले आणि आपण काय गमावले याचा ताळेबंद आता मनात ठेवावा लागेल. नव्या काळाला नव्या उमेदीने सामोरे जावे लागेल. ‘फिनिक्स’ पक्ष्यासारखी राखेतून भरारी घ्यावी लागेल. माणसाची ही विजिगिषु वृत्ती अजेय असल्याचं काळाच्या ओघात वारंवार सिद्ध झालंय. तीच जिद्द दाखवली तर ज्ञानेश्वरांच्या शब्दांत दुरितांचे तिमिर नष्ट होईल. त्यासाठीही शुभचिंतन!




























































