
>>दिलीप जोशी<<
नवे वर्ष सुरू झाले. प्रतिवर्षीचाच, गतवर्षाला निरोप देण्याचा आणि नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष ठिकठिकाणी झाला असणार. नव्या वर्षाचं स्वागत करताना नवी उमेद, नव्या आकांक्षा, नव्या अपेक्षा असं बरंच काही मनात येईल. नव्या वर्षात नवं काय करायचं याचे मनोरथ आधीच बांधलेले असतील. कित्येकांना शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसायात नव्या संधी शोधण्याची उमेद असेल. कोणी आपल्या आजारपणावर मात करण्याची अपेक्षा बाळगून असेल. कोणाची प्रापंचिक स्वप्ने साकार करण्याची इच्छा असेल. एक ना अनेक विचार मनामनात तरळत असतील.
पावसाळा ‘नेमेचि’ येतो तसं नववर्ष तर त्याहूनही अधिक नेमाने येतं. पृथ्वीचं भ्रमण सुरू आहे तोपर्यंत ‘वर्षामागून वर्षे जाती’ यात किमान काही अब्ज वर्षे तरी खंड पडणार नाही. आजचा दिवस कालच्यासारखाच उगवणार याची वैज्ञानिक कल्पना असली तरी त्याचं काव्यमय परिमाण हे माणसाच्या मानसिकतेवर आधारित आहे. ‘काल’पेक्षा ‘आज’ आणि ‘आज’पेक्षा ‘उद्या’ अधिक चांगला असावा अशी कोणाचीही अपेक्षा असणारच. त्यादृष्टीने प्रत्येकाच्या मनात काहीतरी संकल्प फुलत असेल.
‘संकल्प’ या विषयावर शाळेत आम्हाला निबंध लिहायला सांगत. मी या वर्षी खूप अभ्यास, व्यायाम करीन अशा आशयाचा संकल्प सर्वांच्याच निबंधात दिसत असे. त्यातले काही निबंध वाचून दाखवले जात. एका वर्षी एका मुलाने लिहिलं, ‘शाळेतला अभ्यास तर मी करणारच आहे, पण मला यंदा किमान पंचवीस किल्ले पाहायचेत. खूप चित्रे काढायचीत आणि माझं आवडतं वाद्य असलेली बासरी शिकायचीय.’ आमचे गुरुजी म्हणाले, ‘लिहिलंयस तर छानच. पण पुढच्या वर्षी याच तारखेला आपण तुम्हा सर्वांच्या यंदाच्या संकल्पांचा आढावा घेणार आहोत एवढं लक्षात ठेव. तुला आमच्या शुभेच्छा!’ आणि त्या पठ्ठय़ाने एका वर्षात सारे संकल्प सिद्धीस नेले. त्याच्या गिर्यारोहणाचे फोटो, त्याने तिथेच काढलेली निसर्गचित्रे त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे ‘स्लाईडस्’वर दाखवण्यात आली. त्याने शेवटी बासरीवर शाळेची प्रार्थना सादर करून वाहव्वा मिळवली.
त्याच्यापासून आम्ही अनेकांनी स्फूर्ती घेत संकल्प केले. कोणी सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचा, कोणी व्यायामशाळेत जाण्याचा तर कोणी आणखी कसला. परंतु तेरडय़ाचा रंग तीन दिवस या न्यायाने आमचे संकल्प लवकरच हवेत विरले. एकाने दैनंदिनी लिहिण्याचा केलेला संकल्प तर नंतर चेष्टेचा विषय झाला. कारण तो ती गोष्ट साफ विसरल्याने पुढच्या वर्षी त्याची दैनंदिनी चक्क कोरी होती.
थोडक्यात काय, संकल्प करणं सोपं, पण चिकाटीने पूर्णत्वाला नेणं कठीण. मात्र जगात काही माणसं उत्तमाचा ध्यास घेतात, मनाशी संकल्प करतात आणि तो पूर्णत्वाला नेतात. आमच्या खगोल संस्थेच्या वाचनालयात एक गरीब मुलगा दर आठवडय़ाला यायचा आणि मिळणाऱ्या दीड-दोन तासांच्या वेळात त्या पुस्तकातून नोटस् काढून घरी जाऊन त्यावर चिंतन करायचा. बाकीचे गप्पा मारत असले तरी त्याचं चित्त कधी विचलित झालेलं दिसलं नाही. दुसऱ्या एकाने चंद्र, पृथ्वी, सूर्य असं वर्किंग मॉडेल बनवण्याच्या संकल्पाची पूर्ती केली आणि कानपूरच्या आयआयटीत पहिलं बक्षीस पटकावलं.
संकल्प करताना या मुलांनी 1 जानेवारी किंवा असाच कुठला तरी मुहूर्त पाहिला नव्हता. सद्विचार मनात आला तोच क्षण त्यांच्या संकल्पाचा होता. तो तडीला नेण्याची त्यांची जिद्द होती. अशी अभ्यासू तरुणाई मला गेल्या चाळीस वर्षांत भेटली. आमची पिढी कशी शिस्तीची. हल्ली काय विचारू नका असे उद्गार माझ्या पिढीतले बरेचजण काढत असताना मला मात्र नव्या पिढीतल्या अनेक कर्तृत्ववान मनांचं दर्शन घडत होतं. माझ्या त्या चित्रकार मित्राच्या चित्रकार मुलानं उत्तम चित्रकार होण्यासाठी घेतलेले कष्ट मी पाहिलेत. आज तो विलक्षण ताकदीचा चित्रकार झालेला आहे. अशी विविध क्षेत्रांतली माणसं मला भेटली. त्यातले काहीजण तर माझ्या मागच्या पिढीतले आहेत. निवृत्तीनंतर शास्त्रीय संगीत शिकणारे किंवा गिर्यारोहणाची, लॉबवर सायकलिंगची हौस पूर्णत्वाला नेणारे आहेत. एका परिचित ताईंनी मोठय़ा पदावरून निवृत्त झाल्यावर गरीब मुलांसाठी विनाशुल्क विद्यादान वर्षानुवर्षे केलेलं मला माहीत आहे. ठराविक दिवशी संकल्प न करता त्यांनी काही संकल्पांना जीवनध्येय मानलं. त्यांच्यातल्या प्रत्येकावर एकेक लेख होऊ शकेल.
ही सर्व तशी सर्वसामान्य घरातलीच मंडळी आहेत. पैशाचं प्रचंड पाठबळ पाठीशी आहे असंही नाही. एका विद्यार्थ्याने स्वतःचं शिक्षण करत असताना मिळालेल्या पॉकेटमनीमधून एस.एस.सी.ला उत्तम गुण मिळालेल्या गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्याचं क्रत वर्षानुवर्षे चालवलं आहे. ही सारी माणसं खरोखरच प्रेरणादायी आहेत. संकल्प करण्याचा फायदा इतकाच की आपण कोणतं तरी सत्कार्य करण्याचा ध्यास घेतलाय याची जाणीव सतत मनात राहाते. सामान्य माणसातही असे स्वयंसिद्ध असतात. वर्षारंभी त्यांच्या कार्याचं स्मरण प्रेरणादायी वाटतं.






























































