लेख – ईशान्य हिंदुस्थानच्या विकासाचा जलमार्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

ईशान्य हिंदुस्थानातून ब्रह्मपुत्रा नदी आणि उर्वरित हिंदुस्थानातून गंगानदी ही बांगलादेशात प्रवेश करते. या नद्यांचा वापर जर व्यापारासाठी करण्यात आला तर ईशान्य हिंदुस्थानला खूपच आर्थिक फायदा होऊ शकतो. दुर्दैवाने ईशान्य हिंदुस्थान हा चीन, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश या देशांनी वेढलेला असल्याने इथून समुद्र फारच दूर आहे. तसे बघितले तर त्रिपुराची राजधानी आगरतळा ही समुद्रापासून 200 किलोमीटर केवळ लांब आहे. परंतु मधे बांगलादेशचे असल्याने त्यांचे समुद्री बंदर आपल्याला वापरता येत नव्हते.

ईशान्य हिंदुस्थानातील राज्ये ही उर्वरित देशाशी एका अरुंद अशा सिलिगुडी कोरिडॉरने जोडलेली आहेत. दरवर्षी 100 दशलक्ष टन एवढे सामान या अरुंद जागेतून ईशान्य हिंदुस्थानात रस्तेमार्गाने जाते किंवा येते. स्वातंत्र्य मिळण्याआधी ईशान्य हिंदुस्थानचा पुष्कळसा व्यापार हा आताच्या बांगलादेशात असलेल्या समुद्री चितगाव बंदरातून होत असे. परंतु 1947 नंतर तो बंद झाला. कारण हे बंदर बांगलादेशात आहे. त्यामुळे ईशान्य हिंदुस्थानला समुद्राला जोडण्यासाठी मार्ग फक्त कोलकाताजवळील हल्दिया बंदरातून होतो. हे अंतर ईशान्य हिंदुस्थानातील वेगवेगळ्या राज्यांकरता 1000 किलोमीटर ते 2 हजार किलोमीटर एवढे आहे. जर आपल्याला बांगलादेशतील बंदरे किंवा बांगलादेशमधून वाहणाऱया नद्यांचा वापर करून जर सामानाची ने-आण करता आली तर हा खर्च खूपच कमी होऊ शकतो. हिंदुस्थान सरकारने गेल्या दोन वर्षांपासून याविषयी प्रयत्न सुरू केले आहेत. मागच्या महिन्यात एम. व्ही. महेश्वरी बोट, बोटीवर प्रत्येक कंटेनरमध्ये 10 टन सामान असे 53 कंटेनर ठेवून हिंदुस्थानच्या हल्दिया बंदरातून निघून ते गुवाहाटीमध्ये असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवरच्या मांडू या बंदरामध्ये 15 दिवसात पोहोचली. हे अंतर 1500 किलोमीटर एवढे होते. त्यातील जास्त अंतर हे बांगलादेशातून वाहणाऱया नद्यांतून होते.

गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये सत्ता पालट होऊन शेख हसीना वाजेद यांचे सरकार आल्यानंतर हिंदुस्थान सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे चित्र पालटले आहे. आता बांगलादेशातील चितगाव आणि इतर बंदरे आता हिंदुस्थानसाठी खुली करण्यात आली आहे. चितगाव बंदरापासून हिंदुस्थानातील त्रिपुराची राजधानी आगरतळापर्यंत 200 किलोमीटरचा रस्ताही तयार करण्यात आला आहे. जे अंतर पूर्वी कलकत्ता बंदरातून 1800 ते 1900 किलोमीटर होत असे ते आता केवळ 200 किलोमीटर एवढेच असणार आहे. कोलकात्यापासून ढाक्यापर्यंत (नारायणगंज या नदीतील बंदरापर्यंत) नदीने आपण प्रवास करणार आहोत. हाच नदीचा प्रवास आसाममध्ये सिलघट आणि करीनगंजपर्यंत कुश्यारी नदीच्या माध्यमातून होणार आहे.

आज बांगलादेशची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. आज हिंदुस्थान आणि बांगलादेशचा व्यापार हा 10 अब्ज डॉलर एवढा होता. तो अजून वाढणार आहे आहे. तिथे वेगवेगळी बांधकामे व घरांची बांधकामे वेगाने सुरू आहेत, त्यासाठी लागणाऱया सिमेंटमध्ये वापरली जाणारी फ्लाय ऍश ही हिंदुस्थानातून पाठवली जाते. आपण ज्या वेळी कोळशापासून वीजनिर्मिती करतो, तेव्हा जी राख निर्माण होते त्याला फ्लाय ऍश म्हणतात. ती हिंदुस्थानकडे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. ही राख हिंदुस्थानातून बांगलादेशला निर्यात होते. नदीच्या माध्यमातून त्यांना लागणारा कोळसा, त्यांना लागणारी फ्लाय ऍश बांगलादेशकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळे हिंदुस्थान- बंगलादेश व्यापार समुद्र व नदी मार्गातून वाढणारच आहे.

अनेक नद्या आणि नद्यांवरील अनेक बंदरे जशी वृक्षा नदी, भैरव बंद हे कोलकात्यापासून 520 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 2018 मध्ये 3.2 दशलक्ष टन इतके आयात-निर्यातीचे सामान नद्यांच्या मार्गानेच बांगलादेश मध्ये पाठवण्यात आले. हिंदुस्थान सरकारला वाटते की, पुढील 2 वर्षांत ते 4 ते 5 दशलक्ष टन होऊ शकते. ते वाहून जाण्यासाठी 4 हजाराहून अधिक जहाजांच्या फेऱया या मार्गावरून कराव्या लागतील. रस्तेमार्गाचा वापर करून आयात-निर्यात करणे यापेक्षा नदी किंवा समुद्र मार्गाने आयात-निर्यात करणे हे अतिशय स्वस्त असते.

अर्थात या वाहतुकीसाठी गरज असते ती नद्यांमधील या पाण्याची खोली अडीच ते 3 मीटर असली पाहिजे. नद्यांमधील पाण्याच्या प्रवाहाची रुंदी ही 45 ते 50 मीटर असावी. या नद्यांना पूर आल्यास मोठय़ा प्रमाणात गाळ वाहून येतो, त्यामुळे नद्या उथळ होतात. म्हणून जर 365 दिवस या नद्यांचा वापर करायचा असेल तर ड्रेजर जहाजाच्या मदतीने इथला गाळ काढून 3 मीटर पाण्याची खोली आणि 50 मीटर रुंदी तयार करावी लागेल. सध्या 12 ड्रेजर नदीचा गाळ काढण्याचे काम करत आहेत. त्यावर 300 ते 400 कोटी रुपये खर्च होणार आहे. एका कंपनीला 5 वर्षे अशाप्रकारे नदी गाळमुक्त ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. नॅशनल वॉटर वे-एक म्हणजे गंगा, भागिरथी, हुबळी आणि नॅशनल वॉटर वे-दोन म्हणजे ब्रह्मपुत्रा आणि नॅशनल वॉटर वे-सोळा म्हणजे बराक नदीतून बांगलादेशमध्ये प्रवेश हे मार्ग तयार होत आहेत. थोडक्यात, 1720 किलोमीटर लांब नद्या अशा प्रकारच्या दळणवळणासाठी तयार होत आहेत. कोलकात्यापासून करीमगंज हा 1400 किलोमीटर प्रवास आहे आणि इतर नद्यांवरची असलेली बंदरे जसे धुबरी, बंडू, सिलघाट, करीमगंज ही आसाममध्ये आहेत. त्या ठिकाणी नदीतून व्यापार सुरू होणार आहे. एका बोटीमध्ये 80 ते 100 ट्रक्समधून वाहतूक केले जाईल एवढे सामान टाकता येते. या बोटीचा वेग 12 ते 15 किलोमीटर प्रति तास असतो. या नदीमार्गामुळे ईशान्य हिंदुस्थानची नक्कीच भरभराट होणार आहे. एवढेच नव्हे तर येत्या काळात म्यानमारमधील सिटवे बंदरही आपण ईशान्य हिंदुस्थानची भरभराट करण्याकरता वापरणार आहोत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे हिंदुस्थानातून ईशान्य हिंदुस्थानात जाणारा 100 दशलक्ष टन माल आपणास नद्या आणि समुद्राच्या मार्गाने पाठवता येईल. सध्या फक्त चार ते पाच दशलक्ष टन एवढाच माल नद्या, समुद्र मार्गाने पाठवत आहोत. येत्या काळामध्ये हे मोठय़ा प्रमाणात वाढवता येईल. यामुळे वाहतुकीची किंमत अतिशय कमी होईल. ज्याचा फायदा मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय यांसारख्या राज्यांना होईल.

त्याशिवाय याच नद्यांचा वापर करण्याची परवानगी भूतान आणि नेपाळ या देशांनासुद्धा आपण देत आहोत. जर या देशांना बांगलादेशच्या नद्यांचा आणि बांगलादेशच्या बंदरांचा वापर करून जर आयात-निर्यात करायची असेल तर त्यांनासुद्धा या नद्या आणि बांगलादेशची बंदरे वापरता येतील. कारण ही बंदरे भूतान आणि नेपाळपासून जवळ आहे. त्यामुळे या देशांच्या आर्थिक भरभराटसुद्धा होइल. सर्वात महत्त्वाचा सामरिक फायदा असा की, युद्धकाळात सिलिगुडी कॉरिडॉर बंद पडला तर आपल्याला बांगलादेशमधून येणाऱया नद्यांचा आणि रस्त्यांचा वापर करता येईल. बांगलादेशातील नद्यांचा वापर करून आपण ईशान्य हिंदुस्थानात एक आर्थिक क्रांतीच करत आहोत. सामारिकदृष्टय़ा ईशान्य हिंदुस्थानात प्रवेश करण्यासाठी हिंदुस्थानकरिता अनेक मार्ग खुले होतील.