
>>दिलीप जोशी<<
नव्याची नवलाई चार दिवस टिकते म्हणतात, परंतु ते ‘नवं’ ‘जुनं’ होता होता आणखी काहीतरी ‘नवं’ नवलाई घेऊन अवतरतच असतं. अनेक बाबतींत हे लक्षात येईल. आपल्या काळाच्या आधीची वस्त्रप्रावरणं, आपल्या काळातला ‘ऐटबाज’ पोशाख आणि आताच्या काळाची फॅशन… कितीतरी बदल दिसतील. कधी पायघोळ तर कधी तोकडे अशा कपडय़ांच्या ‘फॅशनी’ सारख्या येत राहतात. पूर्वी जे ‘जुनं’ वाटलं होतं त्यातच नवी पिढी वेगळी कलात्मकता आणते आणि हळूहळू तेही इतिहासजमा होतं, पण नव्याची ओढ काही संपत नाही. खाणंपिणं, कपडे यात बदल ते किती करणार? त्यातूनच नित्य नवी डिझाइन आकार घेत असतात. काही मात्र ‘ऑण्टिक’ होतात. यंत्रयुगातल्या गोष्टींचं ‘ऑण्टिक’ होणं त्यामानाने वेगात घडतं. गतिमान संशोधन रोज नवं काही घेऊन येतं. जगात मोटार, ट्रेन किंवा विमानंच नव्हती तो फार मोठा काळ ठरावीक वाहनांच्या शतकानुशतकात गेला, पण स्वयंचलित यंत्रांची घरघर सुरू झाली तेव्हापासून बदलत गेलेलं याच वाहनांचं रूप बघा ना. जुन्या मोटारींचं, रेल्वे इंजिनांचं आणि विमानांचं ‘व्हिण्टेज’ प्रदर्शन भरवावं लागतं. त्याचं कौतुक होतं, पण उत्पादन नाही. थॉमस अल्वा एडिसन हा पेटण्टचा बादशहाच होता. अनेक शोध लावून त्याचे स्वामित्व हक्क (पेटण्ट) त्याने स्वतःकडे घेतले. त्यातली तेजस्वी गोष्ट म्हणजे विजेचा दिवा आणि आणखी विलक्षण गोष्ट म्हणजे आवाज टिपून घेणारा फोनोग्राम. आमच्या घरी आजोबांच्या काळी 1910 मध्ये घेतलेला फोनो चालत नाही, पण तो आम्ही टाकतही नाही. कारण त्याला ‘ऑण्टिक व्हॅल्यू’ प्राप्त झालेली आहे. त्याच काळात घेतलेलं ठोक्यांचं घडय़ाळ आजही भिंतीवर दिमाखात कार्यरत आहे. आमच्याकडे पन्नास वर्षांपूर्वी खास ‘फोनो’वरच्या तबकडय़ा (रेकॉर्ड) ऐकायला मंडळी येत. ‘प्रेमवीर’, ‘धर्मवीर’ किंवा ‘नाटक सिंहगड’ अशा आता विस्मरणात गेलेल्या आणि त्या काळी ‘नव्या’ असणाऱया ‘प्रभात’च्या चित्रपट गीतांच्या सर्व रेकॉर्डस् घरी होत्या. दादा (वडील) दिवाळीच्या पहाटे चार-साडेचार वाजता फोनोवर सनई लावून आम्हाला जागं करत. त्या आठवणींनी आजही मोहरायला होतं.
पुढे रेडिओ आला तो व्हॉल्व्ह असलेला. त्याचं स्टेशन अचूक पकडून क्रिकेट कॉमेंटरी लावणं हा एक आवडता उद्योग. या आकाशवाणीने आम्हाला भरभरून दिलं. घरबसल्या दिग्गज कलाकारांची गाणी, भाषणं, नभोनाटय़, श्रुतिका आणि विविध विषयांवरच्या आवाजी प्रक्षेपणाने कानाबरोबर नकळत मनही समृद्ध केलं (मी आजही रेडिओ ऐकतो). तेव्हा शाळेत येता-जाता, काम करता करता किंवा अगदी अभ्यास करतानाही रेडिओवरून येणारे लताचे स्वर सुखावून जायचे. कारण कुणाचा तरी रेडिओ इतरांना त्रास होणार नाही अशा बेताने सुरू असायचा. एकूणच वातावरणात त्यावेळी आजच्या इतका ध्वनिकल्लोळ नसल्याने दूरवरून येणारी गाण्याची गोड तान मोहरणारी वाटायची. काळ पुढे सरकला. आम्ही कॉलेजला असताना टेपरेकॉर्डर, कॅसेट आल्या. हवी ती गाणी हवी तेव्हा ऐकण्यासाठी आणि घरच्या घरीच ध्वनिमुद्रित करण्याचीही सोय झाली. शाळकरी वयात आत्याकडच्या ‘स्पूल’च्या म्हणजे ‘आनंद’ सिनेमात आहे तशा टेपरेकॉर्डरवर माझ्या आवाजात नोंदवलेली ‘श्रावणमासी’ ही बालकवींची कविता कुठे गेली कोणास ठाऊक, पण नंतर छोटय़ा स्पूलची चपटी कॅसेट आली आणि त्यावर विविध क्षेत्रांतल्या नामवंतांच्या मुलाखती ‘रेकॉर्ड’ करण्याची संधी मिळाली. गाण्यांच्या तर शेकडो कॅसेटस् झाल्या आणि काळ पुन्हा बदलला. कॉम्प्युटर युग अवतरलं. आधी फ्लॉपी, मग सीडी, मग व्हीसीडी, नंतर पेन ड्राइव्ह किंवा पोर्टेबल हार्ड डिस्कवर सारं नोंदवता येऊ लागलं. त्यापुढची पायरी म्हणजे रेकॉर्डर, कॅमेरे सगळंच मागे पडून जग मुठीत आणणारा नेटयुक्त सेलफोनच (मोबाइल) सर्व हौस पुरवू लागला.
एके दिवशी कोणीतरी म्हणालं, ‘‘अरे, तुझ्याकडे ‘एसेम’ची (एसेम जोशी) मुलाखत आहे ना, ती ऐकायचीय…’’ तर टेप ‘जाम’ झालेली आणि टेपरेकॉर्डर नादुरुस्त. मग लक्षात आलं की, या गोष्टीला आता पस्तीस वर्षे उलटलीयत. ते जतन करण्याचा मार्ग तरुण मित्रांच्या सहाय्याने शोधला. सगळं ‘डिजिटाइज’ केलं.
त्यावरून आठवलं, फार पूर्वी मुंबईतल्या प्रभाकर दातार यांची एक मुलाखत ‘श्री’ साप्ताहिकासाठी घेतली होती. शेकडो जुन्या रेकॉर्डस्चा संग्रह त्यांच्याकडे होता. आता नव्वदीच्या घरात असलेले दातार तो संग्रह आपुलकीने दाखवत होते. मोठय़ा कष्टाने मिळवलेल्या त्या दुर्मिळ गाण्यांचा, भाषणांचा त्यांना अभिमान आणि अप्रूप होतं. ‘रेकॉर्डब्रेक’ दातार अशा शीर्षकाने आलेला तो लेख खूप गाजला. त्यानंतर याच क्षेत्रात सुरेश चांदवणकरांसारख्यांनी प्रचंड काम केलं. संशोधक असलेल्या चांदवणकरांनी त्या संग्रहाला आधुनिक तंत्रात आणलं. आज असा ठेवा कुठे कुठे उपलब्ध आहे ते त्यांच्या व्याख्यानातून समजतं. हे सर्व आठवलं कारण नुकतंच एक व्हिण्टेज कारचं प्रदर्शन पाहिलं. 1900च्या आसपास बनलेल्या कारचा वृद्ध पारशी मालक आपल्या अपत्याचं कौतुक करावं तसं त्या कारविषयी भरभरून सांगत होता. रोज आपण सारे जगतो नव्याच जगात. कारण भूतकाळात जगताच येत नाही, पण मन तिथे रुंजी घालू शकतं. पत्ते, गंजिफा, पोस्टल स्टॅम्प अशा अनेक संग्राहकांना भेटलो तेव्हा त्यांच्या आनंदात आपणही हरवून जातो हे लक्षात आलं. जुन्यातलं उत्तम संचित जतन करण्यासाठीच ‘म्युझियम’ची कल्पना रुजली. जगात अशी संग्रह आणि ‘जतनालये’ निगुतीने राखली जातात. इतिहासाच्या या पटाशीच आपल्या वर्तमानाचा धागा जोडलेला असतो. काल, आज, उद्या हे केवळ त्याचं त्याचं गणिती मापन.






























































