>> हर्षवर्धन दातार
एखाद्या चालीला सुरेल करण्याचे कसब बासरीतून उमटणाऱ्या सुरात आहे. व्हायोलिननंतर गाण्यांतून मुबलक उपयोग केला गेला तो बासरी किंवा फ्लूटचाच. साध्या, पण अतिशय गोड आणि चित्तवृत्ती गुंगवून टाकणारे बासरीचे सूर आणि गाणी यांची ही सफर.
वृंदावन, मथुरा, द्वारका हे शब्द म्हटले की, आठवतो तो श्रीकृष्ण आणि त्याच अनुषंगाने आठवते ती बासरी. ‘पावा’, ‘फ्लूट’, ‘वेणू’, ‘मुरली’, ‘हुलू’, ‘सेफंग’ अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे व अनेक शतकांपासून वाजत आलेले वाद्य! आधीच्या काळात कदाचित व्हायोलिननंतर ज्या वाद्याचा गाण्यांतून मुबलक उपयोग जर झाला असेल तर ते म्हणजे बासरी किंवा फ्लूट. अलीकडच्या काळात गिटारचा असाच प्रचुर वापर दिसतो. साध्या, पण अतिशय गोड आणि चित्तवृत्ती गुंगवून टाकणारे सूर आळवणाऱ्या या वाद्याचा भरपूर उपयोग सर्वच संगीतकारांनी त्यांच्या संयोजनातून केला आहे.
एखाद्या चालीला सुरेल करण्याचं कसब बासरीतून उमटणाऱ्या सुरात आहे. खालच्या किंवा वरच्या पट्टीतील तसेच विस्तारित सप्तकातील सूर साधण्याकरिता विविध लांबीच्या बासऱ्या संगीतकार वापरतात. बांबूशिवाय धातूपासून सिल्व्हर आणि मेटल फ्लूट असतात. या प्रकारात स्केलप्रमाणे वरच्या पट्टीतील सुरात वाजणाऱ्या मेटल फ्लूटला ‘पिकोलो’, ‘अल्टो’, ‘सोप्रनो’ अशी नावे असतात. बासरी वादन अधिक सुरेल होण्याकरिता वादकांनी त्याच्या लांबीत आणि छिद्रांमधील अंतरात अनेक बदलही केले. वेगळेपण आणण्याकरिता बासरीचा वापर संतूर किंवा सतारसारख्या वाद्यांबरोबरही केला गेला.
नौशादनी ‘मेला’मधील (1948) गाडीवान दिलीप कुमारवर चित्रित, मुकेशनी गायलेल्या ‘गाये जा गीत मीलन के’ आणि ‘दिल्लगी’मध्ये (1949) सुरैया-श्याम यांच्या ‘तू मेरा चांद मैं चांदनी’ युगुल गीतात बासरीचा व्यापक वापर केला. गीता दत्तने नौशादबरोबरच्या पदार्पणात हेच गाणं सोलो पण गायलं आहे. या दोन्ही गीतांचे गीतकार आहेत शकील बदायुनी.
संगीतकार रोशनने ‘सुरत और सिरत’मध्ये (1962) मुकेश यांच्या आवाजात ‘बहोत दिया देनेवाले ने तुझको’ या फकिरी गाण्यात बासरीचा व्यापक उपयोग केला. आहे ते आपलं नाही व मिळेल ते स्वीकार करत पुढे जायचं हा आशय मुकेश यांनी त्यांच्या सच्च्या आवाजात साकार केला. सचिन देव बर्मन संगीत दिग्दर्शित ‘टॅक्सी ड्राईवर’(1954) चित्रपटात तलत मेहमूद यांच्या तलम आवाजातील ‘जाये तो जाये कहाँ’ गाण्यात व्यापक बासरीचे सूर यथार्थ दुःखी वातावरण निर्माण करतात. बासरीचे असेच व्यापक शोधक परिणाम साधणारे सूर ‘चंपाकली’मधील (1957) ‘छुप गया कोई रे’ या गाण्यात आपल्याला लताजींच्या आवाजाबरोबर ऐकू येतात. संगीतकार हेमंत कुमार. चित्रपटातील सिच्युएशनच्या गरजेनुसार त्या प्रसंगाची आर्तता वृद्धिंगत करण्यासाठी बासरीचा वापर केला.
हिमाच्छादित शिखरे, हिरव्यागार गालिचांसारखा निसर्ग, खळखळत वाहणारे झरे, पडणारा पाऊस यांचं संतूर आणि बासरीच्या सुरांबरोबर एक अतूट सुरेल असं नातं असावं. नेमका हाच परिणाम संगीतकार रवी साधतात ‘हमराज’मधील (1967) ‘नीले गगन के तले’ आणि ‘तुम अगर साथ देने का वादा करो’ या लोकप्रिय गीतांतून. पार्श्वभूमीला हिरवागार निसर्ग, क्षितिजाला टेकलेले निरभ्र आकाश, साहिरचे चपखल शब्द आणि महेंद्र कपूरचा आवाज. ‘नीले गगन के तले’ गाण्याचा कोडा (शेवटचं संगीत) अंगावर काटा आणणारी हुरहूर निर्माण करतो. ‘बसंत बहार’ (1956) या गाजलेल्या संगीतप्रधान चित्रपटातील ‘मैं पिया तेरी’ हे गाणं म्हणजे बासरी आणि लताजींची जुगलबंदीच जणू. भारत भूषण आणि निम्मीवर चित्रित गाणं ऐकताना आपली मती गुंग होते. त्याला मुख्य कारण संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांची धून आणि प्रख्यात बासरी वादक पं. पन्नालाल घोष यांच्या बासरीची करामत. शब्दाची जादूगारी गीतकार हसरत जयपुरींची.
कल्याणजी-आनंदजीनी संगीत दिलेल्या ‘गीत’ (1970) या रामानंद सागर चित्रपटातला नायक बासरी वादक आहे. साहजिकच डोंगरदऱ्या आणि झऱ्यांच्या सान्निध्यात बासरीचे सूर चित्रपटातील गाण्यात प्रामुख्याने ऐकायला मिळतात. ‘मेरे मितवा मेरे मीत रे’ आणि ‘जिसके सपने हमे रोज आते रहे’ ही गाणी बासरीच्या व्यापक सुरांनी अतिशय श्रवणीय झाली आहेत. बासरीच्या सुरामुळे नायिकेला शोधणारी नायकाची हाक अधिकच हळवी जाणवते.
सचिन देव बर्मन यांचे सहायक जयदेव हे त्यांच्या गाण्यातील माधुर्याकरिता ओळखले जातात. ‘ये दिल और उनकी निगाहो के साये’ हे ‘प्रेमपर्बत’ (1973) यातील बासरीच्या सुरावटींच्या विविधतेने नटलेले गाणे ऐकतच राहावेसे वाटते. सचिन देव बर्मन आणि देव आनंद या जोडीचे बरेच चित्रपट संगीतप्रधान होते आणि गाजलेही. प्रेक्षणीय पार्श्वभूमीवर चित्रित रफी-लता यांचं ‘दिल पुकारे’(‘ज्वेल थीफ’) आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशात रफींनी गायलेले ‘तू कहां ये बता’ (‘तेरे घर के सामने’) या दोन्ही गाण्यांत प्रेमाची अनुभूती प्रदान केली बासरीच्या सुरांनी.
काही सृजनशील संगीतकारांनी सुरांची ओळख आणि सांगीतिक कौशल्याच्या मदतीने आपल्या संगीत रचनांमध्ये फ्लूटचा वापर केला. जिथे कदाचित बासरीच्या सुरांची गरज नव्हती. सलील चौधरी हे स्वत उत्तम फ्लूट वाजवत आणि त्यामुळे त्यांच्या अनेक संगीत रचनांमध्ये आपल्याला फ्लूट ऐकू येते. ‘माया’मध्ये (1961) ‘जा रे उड जा रे पंछी’ या करुणरस गाण्यात सुरुवातीला मेटल फ्लूट (पिकोलो) वाजवला आहे प्रख्यात सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांनी. त्या सुरांतून आपण माला सिन्हाच्या अवस्थेशी आपसूक जोडले जातो.
त्या वर्षीच्या ‘बिनाका गीतमाला’मध्ये सर्वोत्तम ठरलेल्या ‘सहेली’ (1965) मधलं मुकेश-लता यांच्या ‘जिस दिल मे बसा था प्यार तेरा’ या गाण्यात संगीतकार कल्याणजी-आनंदजींनी फ्लूटचा कल्पक वापर मधल्या संगीतात केला. त्यामुळे प्रसंगाला एक उदास किनार येते. नेमका असाच मधल्या संगीतात फ्लूटचा वापर या संगीतकार जोडीने ‘सफर’मध्ये (1970) ‘जो तुमको हो पसंद’ या गाण्यात केला. अशा अनवट अनोख्या सुरावटीमुळे हे गाणे श्रोत्यांच्या मनात कायमचे घर करतात. फ्लूट बासरीचे इतर अनेक उपयोग, विविध वादकांनी त्याचा कसा वापर केला, शास्त्राrय संगीतात बासरीचे स्थान अशा अनेक बाबींवर पुढील भागात.
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)