डॉ. ओ. पी. कपूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश चुरी

आपल्या पुराणांनुसार धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणून ओळखले जातात. पण ‘आधुनिक युगातील डॉक्टरांचे वैद्य’ अशी ख्याती असलेले जागतिक कीर्तीचे फिजिशियन डॉ. ओ. पी. कपूर यांचे 90 व्या वर्षी अलीकडेच निधन झाले. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. आता अत्याधुनिक वैद्यकीय चाचण्यांमुळे आजाराचे अचूक निदान होते. पण 50-60 वर्षांपूर्वी केवळ लक्षणांवरून अचूक निदान करण्यात त्यांचा हातखंडा होता. या आपल्या ज्ञानाचा फायदा त्यांनी नव्या पिढीतील किमान एक लाख डॉक्टरांना करून दिला. जे. जे. रुग्णालयाच्या शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी एक पैशाचाही मोबदला न घेता तरुण डॉक्टरांसाठी ज्ञानार्जनाचा महायज्ञ सुरू केला. अगदी अलीकडच्या काळापर्यंत विनामोबदला डॉक्टरांसाठी ते लेक्चर्स देत असत.

क्लिनिकल मेडिकलसारखा गहन विषय, वैद्यकीय परिभाषा, त्यातील क्लिष्ट शब्द आणि वैद्यकीय तंत्राचे अत्यंत सोप्या पद्धतीने सादरीकरण करीत. मेडिकल क्लासेसमध्ये लाखो रुपये फी आकारतात, पण मागील सहा-सात दशकांपासून त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना विनामूल्य ज्ञानदानाचे काम केले आहे. सलग सहा- सात तासांनंतरच्या लेक्चरनंतर प्रत्येक विद्यार्थी ऊर्जा घेऊन सभागृहातून बाहेर पडत असे. त्यांच्या व्याख्यानमालेची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. वैद्यकीय क्षेत्रासाठी त्यांनी विविध भाषांत बारा पुस्तकेही लिहिली. राज्य सरकारचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार, ‘डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार’, ‘मेडिकल हेल्थ केअर’, ‘बेस्ट टिचर ऑफ मिलेनियम’ अशा पुरस्कारांमुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा वाढला. वैद्यकीय क्षेत्रासोबत बॉलीवूडमध्येही त्यांच्या ‘ओपी’ या नावाला वलय होतो. जेव्हा एमआरआय, सीटी स्कॅनसारख्या सुविधा नव्हती तेव्हा केवळ लक्षणांवरून पृथ्वीराज कपूर यांचे अचूक रोग निदान त्यांनी केले होते. तेव्हापासून कपूर खानदानाची त्यांच्यावर श्रद्धा व त्यांच्या वैद्यकीय ज्ञानावरील विश्वास जडला आहे. अगदी आताच्या रणबीर कपूरपर्यंतची पिढीही डॉ. कपूर यांचा सल्ला घेत होती. चार पिढय़ांपासून कपूर खानदान व डॉ. ओ. पी. कपूर यांच्या कुटुंबीयांचा स्नेह एवढा जुळला की, डॉ. कपूर यांनी त्यांच्या मुलांची नावेही शशी व शम्मी अशी ठेवली आहेत. ही दोन्ही मुलेही डॉक्टर आहेत.