
>> दिलीप जोशी
मुंबईत एके ठिकाणी एकदा एक इलेक्ट्रॉनिक फलक दिसला. तो देशाच्या लोकसंख्येसंबंधीचा होता. त्यातील आकडे सतत कमी जास्त होताना दिसत होते. मतमोजणीच्या वेळी चढउतार व्हावा तसे. अर्थात हा फरक काही अंकांचाच असायचा. देशातील लोकसंख्येची ‘अपडेट’ नोंदणी त्या बोर्डावर केली जात होती. अर्थात ही संगणकीय गणना देशभरातून क्षणोक्षणी येणाऱया माहितीच्या आधारेच असणार. गणितात माहिती जेवढी अचूक तेवढं उत्तरही योग्य असणार, पण एकूण त्यावरून देशात आपण सारे देशबांधव किती आहोत याचा अंदाज येत होता. येणाऱया-जाणाऱया, रस्त्यावरच्या ‘जनांच्या प्रवाहो’चं त्याकडे फारसं लक्ष नव्हतं, पण मी कुतूहलाने त्यावेळी त्याची, म्हणजे त्या क्षणाची नोंद केली होती. ती अब्जापार काही कोटींची होती. अशी जागतिक लोकसंख्येची नोंद ठेवणारे फलकही जगात अन्यत्र असतीलच. त्यावरून पृथ्वीवासीय माणसांना आपल्या वंशविस्ताराचा अंदाज येत असेल.
आपल्या देशाची लोकसंख्या सतराव्या शतकाच्या मध्याला सुमारे बारा कोटी होती असा कयास आहे. कारण त्या काळात शिरगणती वगैरे प्रकार नव्हते; परंतु पन्नास किंवा शंभर उंबरठय़ांचं गाव आहे असे उल्लेख व्हायचे. त्या काळानुसार एका घरात दहा माणसं असतील असं समजलं तर शंभर उंबरठय़ांची म्हणजे घरांच्या गावाची लोकसंख्या हजार झाली. काही पाडे, वस्त्या, वाडय़ा, खेडी तर पाच-दहा उंबरठय़ांचीच असायची. ही पंधरा कोटींच्या आतली लोकसंख्यासुद्धा संपूर्ण हिंदुस्थानी उपखंडाची होती. त्यानंतरच्या तीनशे वर्षांत म्हणजे विसाव्या शतकाच्या मध्याला तीस ते चाळीस कोटी झाली. तीन शतकांच्या काळात अठ्ठावीस किंवा अडतीस कोटींचीच भर पडली होती आणि नंतरच्या सत्तर वर्षांत आपण एकशेतीस कोटी आहोत. चीन दीडशे कोटींवर पोहोचलाय. जगाची लोकसंख्या आठ अब्जांकडे चाललीय.
साधारण एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरातील माणसं सुमारे एक अब्ज होती. पुढे दीड शतकात ती दोन अब्ज झाली. त्यानंतर अर्धशतकातच चार अब्जांवर पोहोचली आणि आता जगात लोकसंख्येचा विस्फोट वगैरे चर्चा होताना दिसतेय.
लोकसंख्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पृथ्वीवरच्या सुमारे ऐंशी लाख प्रजातींपैकी माणसाचाच विचार असतो. तशी दुर्मिळ प्राण्यांचीही गणना होते. पण ते दुर्मिळ होत चाललेत म्हणून माणसांची संख्या आटोक्यात कशी आणायची हा जगापुढचा प्रश्न आहे. काहींच्या मते अब्जावधी लोकांचं सहज भरणपोषण करू शकेल एवढी आपल्या समृद्ध ग्रहांची क्षमता आहे. त्यामुळे लोकसंख्यावाढीचा बागुलबुवा उभा करण्याचं कारण नाही. यावर भरपूर वाद आणि सांख्यिकी (स्टॅटिस्टिकल) चर्चा झाल्या आहेत.
माणसांची पृथ्वीवरची वस्ती वाढत चालण्याची कल्पना अठराव्या शतकात अर्थतज्ञ माल्थस यांना आली होती. तरी त्या काळात जगात अनेक ठिकाणी भयंकर दुष्काळ, लढाया, साथीचे रोग यामध्ये लाखो लोकांचा अब्जावधीत जीव जात होता. युद्धात तर मुख्यत्वे तरुणांचाच बळी जायचा. याशिवाय बालमृत्यूचं प्रमाण खूप होतं आणि भूकंप, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींचा तडाखाही माणसाला बसत होता.
मात्र, युरोपात यंत्रयुग अवतरण्याच्या काळातच वैद्यकीय अभ्यासानेही जोर धरला. लुई पाश्चरने देवीची लस शोधून काढल्यापासून साथीच्या रोगांवरचा उपाय सापडला. आजही कोविडसाठी जग त्याच मार्गाने जाताना दिसतं. अलेक्झांडर, फ्लेमिंग यांनी प्रतिजैविकाचा (ऑण्टिबायोटिक) शोध लावला. त्यांच्या ‘पेनिसिलीन’ने उपचारशास्त्र्ाात नवं दालन उघडलं. त्यात उत्तरोत्तर सुधारणा होत गेल्या. त्याचे काही तोटेही पुढे दिसू लागले. हा त्या एकूण प्रक्रियेचा भाग झाला. परंतु आधुनिक वैद्यकाच्या उदयानंतर जगातल्या माणसांचं जीवनमान (लॉन्जिव्हिटी) वाढली हे अमान्य करता येणार नाही. त्याशिवाय अन्नधान्याची समृद्धी करणारे शेतकी प्रयोग कुपोषितांना वाचवू लागले. वितरण व्यवस्थेतील गडबडीमुळे जगात अनेक ठिकाणी कुपोषित आहेत हे खरंच पण त्यांना देण्याइतपं धान्य जग पिकवतं. हिंदुस्थानात तर मुख्य धान्यांपैकी (स्टेपल फूड) गहू, तांदळाचं उत्पादन गेल्या काही वर्षांत शिलकी ठरत आहे. बालकांना देण्याच्या विविध लस-मात्रांमुळे बालमृत्यूही आटोक्यात आले. बीसीजी किंवा देवीची लस टोचून घेतल्याचे अनेकांना आठवत असेल. काही देशांच्या सीमा विस्तारून, छोटय़ा राज्यांमधली युद्धही थांबली. अशा कितीतरी गोष्टींमधून माणसांचं जीवनमान वाढलं. आपल्याकडे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात चाळिशी आली म्हणजे म्हातारपणाची चाहुल लागली आणि साठी म्हणजे दीर्घायुष्य असं वाटत होतं. कारण तेव्हा सरासरी वयच चाळीसपेक्षा कमी होतं. आता देशाचं सरासरी वयोमान सत्तरच्या आसपास आहे. किमान तीन पिढय़ा सक्षमतेने नांदताना अनेक ठिकाणी दिसतात.
साहजिकच मृत्यूदर कमी झाल्याने जननदर खूप असला आणि नसला तरी गुणाकारी पद्धतीने लोकसंख्येत भर पडते. एका जोडप्याला समजा दोन किंवा तीन मुले असतील तर त्यांच्या हयातीतच त्या मुलांचीही तेवढीच मुलं तरुण होताना दिसतात. पुढे त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांचे विवाह होईपर्यंत राहणाऱयांना पतवंडे पाहण्याचे भाग्यही लाभते. या चांगल्याच गोष्टी आहेत, पण मग लोकसंख्यावाढीचं काय? बाविसाव्या शतकात ती दहा अब्जांचा आकडा पार करेल. कदाचित तेव्हा ‘ग्रे वर्ल्ड’ म्हणजे वृद्धांची संख्या जास्त असेल. नंतर मात्र एका जोडप्याला बहुदा एकच अपत्य याप्रमाणे लोकसंख्या स्थिरावेल. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस असतो. यंदा त्याचं उद्दिष्ट ‘कुटुंबनियोजन आणि स्त्र्ााr-पुरुष समानतेचं सूत्र अंगिकारणे’ असे आहे. ‘मुलगाच हवा’ या मानसिकतेतून जग हळूहळू बाहेर पडतंय. विवाहाचं वयही वाढताना दिसतंय. याचा परिणाम पुढच्या लोकसंख्यावाढीला रोखू शकतो.




























































