साय-फाय – क्वाँटम टेक्नॉलॉजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

सध्याच्या काळात तंत्रज्ञानाने मानवी आयुष्य प्रचंड सुकर आणि सुखकर बनवलेले आहे. हातातल्या मोबाईलपासून ते गाडी, फ्रीज अगदी घरातल्या कुलुपांपर्यंत सगळे काही तंत्रज्ञानावरती आधारलेले आहे. सतत बदलत जाणारे हे तंत्रज्ञान अनेक स्वप्नवत गोष्टी प्रत्यक्षात उतरवत आहे. ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’ला या बदलत्या तंत्रज्ञानाचे भविष्य म्हणून बघितले जाते आहे. सध्या तंत्रज्ञानात सर्वोच्च मानले जात असलेल्या सुपर कॉम्प्युटर आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स यांनादेखील ही ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’ सहजपणे मागे टाकेल असे ठाम मत जगभरातील संगणक तज्ञ व्यक्त करत आहेत. हिंदुस्थानात आधी या ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’ची फारशी चर्चा नव्हती. मात्र गेल्या बजेटमध्ये अर्थ मंत्र्यांनी या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी तब्बल 8000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आणि या तंत्रज्ञानाची चर्चा व्हायला सुरुवात झाली.

ही ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’ नक्की आहे तरी काय?

मोबाईल असो, संगणक असो वा इतर कोणतेही उपकरण असो, या उपकरणाला व त्यातील तंत्रज्ञानाला काळाबरोबर सुसंगत राहायचे असेल तर बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर स्वतःला सतत अपडेट करत राहावे लागते. ‘डाटा व इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग’ हे सध्याच्या अनेक उपकरणांचे महत्त्वाचे कार्य आहे. या कार्याला अधिक वेगाने चालना देण्याच्या दृष्टीने सध्याच्या ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’ची निर्मिती झालेली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही उपकरणापेक्षा कित्येक पट कमी वेळात या क्वॉंटम तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘डाटा व इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग’ करणे शक्य झाले आहे.

सध्या जगातील सर्वोत्तम मानल्या जात असलेल्या ‘सुपर कॉम्प्युटर’ला जी गणिती आकडेमोड पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. अशी आकडेमोड ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’ अगदी काही मिनिटांतच पूर्ण करू शकते. यावरून या तंत्रज्ञानाचा थोडाफार अंदाज लावायला हरकत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानालादेखील ही ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’ सहज मागे टाकणारी आहे. या ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’च्या मदतीने डाटा आणि इन्फॉर्मेशन या दोन्ही गोष्टी प्रचंड वेगाने प्रोसेस करणे शक्य होते. सध्या या तंत्रज्ञानावर आधारित जे प्रोसेसर बनवण्यात आलेले आहेत ते क्वॉंटम बिट्स अथवा क्युबिट्सच्या मदतीने कार्य करतात.

पूर्णपणे ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’वरती आधारित असलेला ‘क्वॉंटम कॉम्प्युटर’ बनवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. हा ‘क्वॉंटम कॉम्प्युटर’ सध्याच्या सुपर कॉम्प्युटरपेक्षा अनेक पट वेगवान असणार आहे. शिक्षण, वैद्यक, वाहतूक, उत्पादन अशा अनेक क्षेत्रांत या नव्या तंत्रज्ञानामुळे एक क्रांती येणार आहे असे म्हणायला हरकत नाही.

हे चित्र सुखदायी असले, तरी या ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’चे काही धोकेदेखील असणार आहेत हे नक्की. तज्ञांनी प्रामुख्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यातील धोके समोर आणले आहेत. आज आपण वापरत असलेले संगणक हे प्रामुख्याने कोणतीही माहिती बिट्सच्या स्वरूपात एन्कोड करतात. या बिट्सची किंमत (व्हॅल्यू) 1 (वन) अथवा शून्य (झिरो) असते. या शून्य आणि एकच्या भाषेतच संगणक सर्व आज्ञा समजून घेतो आणि त्याप्रमाणे कार्य पार पाडत असतो. मात्र ‘क्वॉंटम टेक्नॉलॉजी’च्या आधारे एकाच वेळी एक आणि शून्य या दोन्ही व्हॅल्यू एकाच क्वॉंटम बिटमध्ये साठवणे शक्य होते. याचाच अर्थ दोन क्वॉंटम बिट्समध्ये (क्युबिट्स) चार व्हॅल्यू साठवणे सहजशक्य होते आणि हिच या तंत्रज्ञानाची खरी खासियत आहे. या वैशिष्टय़ामुळे सध्याच्या संगणकापेक्षाही त्याच्या कामाचा वेग प्रचंड प्रमाणात जास्ती असतो. परंतु याचाच दुसरा अर्थ असा की, एकदा हा परिपूर्ण असा ‘क्वॉंटम संगणक’ तयार झाला की, तो सध्याच्या सर्व पारंपरिक संगणकांत जिथे माहितीचा साठा सुरक्षित ठेवलेला असतो त्या सर्व एनक्रिप्शनला तोडण्यास सक्षम असणार आहे, याकडे संगणक तज्ञ प्रामुख्याने लक्ष वेधत आहेत. या तंत्रज्ञानाचा सुरक्षेच्या दृष्टीने असलेला अमूल्य उपयोग बघता सध्या अनेक प्रमुख देश यात प्रचंड गुंतवणूक करत आहेत. चीनने ‘हेफई’मध्ये 10 अब्ज डॉलर्स (73 हजार करोड रुपये) खर्च करून यासाठी एक प्रयोगशाळा उभारली आहे. चीनचीच कंपनी असलेली ‘अलीबाबा’देखील या तंत्रज्ञानावर सध्या स्वतंत्रपणे काम करते आहे तर युरोपियन युनियनने चक्क 2016 मध्येच यासाठी 1.2 अब्ज डॉलर्स (8880  कोटी रुपये) गुंतवलेले आहेत.

[email protected]