
>> डॉ. दत्ता देशकर
आजकाल नक्षत्रांनी व पावसाने एकमेकांशी फारकत घेतली आहे की काय न कळे. थोडासा पाऊस झाला की शेतकरी पेरणी करायला सुरुवात करतो. पण त्याच वेळी नेमका पाऊस दडी मारून बसतो. परिणामी, दुबार पेरणीचे संकट येते. त्यासाठी अवाच्या सवा दराने पैसे कर्जावर घेऊन त्याला पैसे उभारावे लागतात. याउलट काही ठिकाणी तर पेरणी झाल्यावर इतका पाऊस पडतो की पूर्ण पेरणी वाया जाते. ही संकटे आळीपाळीने येत असतात आणि शेतकऱयाला त्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन बसते.
आजकाल दरवर्षी पावसाळा आला म्हणजे भीती वाटायला लागली आहे. सुरुवातीला मान्सून कधी येणार याची चिंता सतावते. मान्सून केरळमध्ये कधी येणार, पुढे तो कधी व किती सरकणार याचे रोज हवामान खात्यातर्फे येणारे अंदाज येत असतात. हे अंदाज इतके बेभरवशाचे असतात की त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडायला सुरुवात होते. शेवटी तो रडतखडत महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचतो. शेतकरी तर त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. त्याने शेतीवर केलेली मेहेनत आता फळाला येणार असते. त्यासाठी त्याने प्राथमिक खर्च केलेला असतो. तोही कर्ज काढून. आम्ही लहान असताना एक म्हण बरेचदा ऐकत होतो. ती म्हणजे पडतील रोहण्या, तर लांबतील पेरण्या. आजकाल नक्षत्रांनी व पावसाने एकमेकाशी फारकत घेतली आहे की काय न कळे. थोडासा पाऊस झाला की शेतकरी पेरणी करायला सुरुवात करतो. रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सवर इतक्यात पेरणी करू नका असे घसा खरवडून तज्ञ सांगत असतात. पण शेतकऱयांकडून बाण निघून गेलेला असतो. नेमका आता पाऊस दडी मारून बसतो. म्हणजे पहिली पेरणी वाया गेली हे शेतकऱयाच्या लक्षात येते. म्हणजे आता येणार दुबार पेरणीचे संकट. त्यासाठी पैशाची काहीच तरतूद नसते. अवाच्या सवा दराने पैसे कर्जावर घेऊन त्याला पैसे उभारावे लागतात. संरक्षित सिंचनाची काहीच सोय त्याने तयार केलेली नसते. म्हणून हे दुबार पेरणीचे संकट येऊन उभे ठाकते. पाऊस आलाच नाही तर वेगळे संकट उभे राहाते. ते म्हणजे आतापर्यंत केलेला खर्च वाया जाणार असतो. काही ठिकाणी तर पेरणी झाल्यावर इतका पाऊस पडतो की पूर्ण पेरणी वाया जाते.
ही तीनही संकटे आळीपाळीने येत असतात आणि शेतकऱयाला त्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन बसते. एवढी सर्व संकटे पार करून पीक उभे करणे ही एक तारेवरची कसरत असते. कधी अतिवृष्टीचे संकट, कधी रोगराईचे संकट, कधी पुढे पावसाने कायमची दांडी मारण्याने आलेले संकट यांचा ससेमिरा चालूच असतो. शेती ही एक अडथळ्याचा खेळ होऊन बसली आहे. एक अडथळा पार केला तर दुसरा सामोरी उभा ठाकलेलाच असतो. प्रत्येक शेतकरी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडतोच आणि शेवटी हाती काहीच येत नाही. आधीच त्याची स्थिती चांगली नव्हती. आता तर हवामान बदलाचे नवीन संकट आवासून उभे राहिले आहे.
वाढती अतिवृष्टी, वाढते महापूर, वाढते दुष्काळ हे आता नवीन संकट सामोरे आले आहे. यातून हाती काही आलेच तर बाजारातील दलाल त्यांना लुटून खातात. आमच्या पाहण्यात अशा काही पावत्या आल्या आहेत जिथे दलालांकडून आकारले गेलेले सर्व प्रकारचे कमिशन वजा जाता एक जुजबी रक्कम शेतकऱयांच्या हातात पडते. बरेचदा तर बाजारात माल नेण्यासाठी जो खर्च येणार असतो तोही वसूल होत नाही. म्हणजे वर्षभर केलेली मेहेनत पूर्णपणे वाया गेलेली असते. आणि हेची फल काय मम तपाला असे म्हणण्याची पाळी शेतकऱयावर येते. घरखर्च कसा चालवायचा, शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, पुढील हंगामासाठी काय तरतूद करायची हे सर्व प्रश्न शेतकऱयासमोर उभे राहतात.
हे एक दुष्टचक्र बनले आहे. दरवर्षी याच चक्रात शेतकरी गटांगळ्या खात राहतो. या चक्रव्यूहाला भेदायचे कसे हेच त्याला समजणे कठीण बनते. कधी कधी सरकारी मदत मिळते, पण बैल गेला आणि खोपा केला अशी ती मदत असते. आणि प्रश्न पडतो की अशा मदतीवर किती दिवस जगायचे.
यातून एक मार्ग दिसतो आहे. तो हा कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगाराला लावायचे. त्यामुळे घरात दर महिन्याला पैसा येणे सुरू राहते. हा रोजगार खरे पाहिले तर शेतीतच असतो, पण तेवढी कल्पकता नसल्यामुळे शेतकऱयांच्या लक्षात तो येत नाही. पहिला प्रकार म्हणजे शेतमालाचे मूल्य वाढविणे. यालाच इंग्रजी भाषेत व्हॅल्यू ऍडिशन म्हणतात. या व्यवसायातून दररोज, दर आठवडय़ाला, दर महिन्याला हातात पैसा खेळला पाहिजे.
आमचे एक मित्र शेतकरी आहेत ते काय करतात हे थोडक्यात समजून घेऊया. त्यांनी बहुविध पीक पद्धतीचा अंगीकार केला आहे. एक गाय आणि बकऱया आणि कोंबडय़ा पाळलेल्या आहेत. थोडय़ा जागेत ते भाजीपाला लावतात. भाजी विकतात, धान्य विकतात, फळे विकतात, दूध विकतात, अंडी विकतात, गोवऱया विकतात, गोमूत्र विकतात. यामुळे सतत घरात रोख रक्कम येत राहते. घरखर्चही चालू राहतो आणि शेतीचा खर्चही चालू राहतो. या सर्वाचे व्यवस्थापन असे केले आहे की वर्षभर उत्पन्नाचा स्रोत अखंड चालू राहतो. याला म्हणतात कल्पकता. हे एकदम जमणे कठीण आहे, पण विचार केला तर शक्यही आहे. आत्महत्या करण्यापेक्षा तर चांगले आहे. विचार करा, मार्ग सापडतो. स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक बना आणि चांगले जीवन जगा हाच खरा यापासून बोध घेता येतो.





























































