लेख – येरे येरे पावसा, थेंबे थेंबे साठवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अजित कवटकर 

केवळ गरजेपुरती, मनोरंजनासाठी जर ‘येरे येरे पावसा’ची आळवणी होणार असेल तर मग तो कितीही निःस्वार्थपणे बरसला तरी माणसाचा स्वार्थ त्याला पुरून उरेल आणि त्यातून होणारी पाण्याची वणवण ही नित्याचीच समस्या होणार. तेव्हा जर तो आपल्यासाठी थेंबाथेंबाने सागर निर्माण करत असेल तर आपणदेखील तेवढय़ाच जबाबदारीने प्रत्येक थेंब अडवला, जिरवला, साठवला आणि कार्यक्षमतेने वापरला पाहिजे. तेव्हा ‘येरे येरे पावसा थेंबे थेंबे साठवा’ असे केले नाही, तर येणाऱ्या काही दशकांमध्ये पाणी हे पृथ्वीवरील सर्वात मोठी मागणी असणारे सर्वात दुर्मिळ व सर्वाधिक महागडे नैसर्गिक संसाधन झालेलं असेल. इतके की, जर का ते दुर्दैवाने तिसरे महायुद्ध होण्यामागचे प्रमुख कारण ठरले तर त्यात आश्चर्यचकित होण्याचे कारण नसावे.

पावसाच्या प्रतीक्षेत आसुसलेली धरणी त्याच्या आगमनाने, स्पर्शाने इतकी रोमांचित, हर्षभरित होते की, तो अत्यानंद अगदी काही दिवसांतच सर्वत्र पसरलेल्या गर्द हिरवळीतून प्रकट होतो. हा हर्षोल्हास केवळ या मातीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जीवसृष्टी यात न्हाऊन निघते. पृथ्वी जरी 71 टक्के पाण्याने व्यापली असली तरी त्यावरील 97 टक्के पाणी हे क्षारयुक्त म्हणजेच महासागरांत आहे. तेव्हा शुद्ध पाण्याकरिता या ग्रहाला पावसाची अत्यावश्यकताही निरंतर अनिवार्यच! पर्जन्य व हिमवृष्टी हे या जीवनग्रहावरील शुद्ध पाण्याचे एकमेव स्त्रोत होय. त्यामुळे वर्षा ऋतू म्हणजे ‘जीवनाची बरसात’ असे म्हणणे अधिक समर्पक ठरेल. पावसामुळे उमलणारे, फुलणारे, बहरणारे, पुनरुज्जीवित होणारे जीवन पाहता पाऊस हा आपल्या पृथ्वीला दिला  जाणारा देवाचा आशीर्वाद आहे, असे म्हणणे योग्य असेल. कधी एखाद्या वेळेस तो जणू प्रलयकारी स्वरूपात निरंतर कोसळत राहिल्याने जरी काही प्रमाणात वित्त व जीवितहानीसाठी कारणीभूत ठरत असला तरी त्याने दरवर्षी यावे व भरपूर पडावे अशीच मनोकामना प्रत्येक जण बाळगतो, यातच त्याचे माहात्म्य दिसून येते.

मनुष्यनिर्मित प्रदूषणाने घडविलेल्या ‘हवामान बदलामुळे’ गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जरी वाढले असले तरी आपल्या येथील पावसाळा हा हंगामी स्वरूपाचाच होय. कधीतरी एखाद-दुसऱ्या वर्षाचा अपवाद सोडल्यास येथील पावसाळा हा आपली कालमर्यादा ओलांडण्याचा अतिरेक शक्यतो करत नाही. त्यामुळे येथील सुनिश्चित ऋतुचक्र हे जीवनाला पोषक ठरते, पण त्याचबरोबर केवळ तीन-चार महिने पडणाऱ्या पावसावर आपल्याला आपली वर्षभराची पाण्याची गरज भागवणे अपरिहार्य ठरते. पावसाचे असमान वितरण जरी काही भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करत असले तरी सर्वांना वर्षभर पर्याप्त प्रमाणात पाणी पुरेल एवढी पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी आजपर्यंत तरी आपल्या देशात दरवर्षी नक्कीच होत आली आहे. आजचे जल दुर्भिक्ष हे निसर्गाच्या कमी औदार्यामुळे नव्हे, तर मनुष्याच्या अपव्ययामुळे, प्रदूषणामुळे, गैरप्रबंधांमुळे होत आहे. पावसाचे अधिकाधिक पाणी जर कार्यक्षम व आरोग्यदायी पद्धतीने अडवले, जिरवले, साठवले आणि योग्य प्रकारे वितरित केले तर बहुतांश समस्या या आपसूकच समाप्त होतील.

देशातील जवळ जवळ 55 टक्के जिराईत जमीन ही आजही पावसावर निर्भर आहे. खरीप हंगाम हा पावसाच्या कृपावर्षावामुळे निर्धास्त असला तरी रब्बी हंगाम मात्र जलसिंचनाद्वारे साठवलेल्या पाण्यावरच विशेष अवलंबून असतो. नदी, तलाव, धरणं, विहिरी, भूजल जलाशय इत्यादी भरून आपली तहान भागविण्याची तरतूद करणाऱ्या पावसाची त्यामुळेच आतुरतेने वाट बघितली जाते. उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी, उष्णतेच्या प्रखरतेने हैराण झालेल्यांना जेव्हा मान्सूनचे काळवंडलेले ढग आकाशात गर्दी करताना दिसतात, तेव्हा पावसाची ती चाहूल मनावर सुखद सावली पांघरते. आकाशाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांना जेव्हा ती आभाळातली घाईगडबड दिसते तेव्हा त्याला होणारा तो आनंद गगनात मावेनासा असतो. कारण पाऊस हा त्यावर जगण्याची, समृद्धीची उमेद वर्षावतो. विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट हे तर जणू त्याच्या आगमनाची आनंददायी ललकारीच होय. मान्सूनच्या पहिल्या पावसाचा शिडकावा अंगावर घेण्यासाठी आतुर असलेल्या बच्चे मंडळींच्या त्या अत्यानंदाचा ठाव घेणे तर महासागरातील मोती शोधण्याएवढे कठीण. पावसाच्या प्रेमळ स्पर्शाने मातीचा, पानाफुलांचा दरवळणारा सुगंध हा विशेषकरून वडीलधाऱ्यांचे मन मोहून टाकतो, भूतकाळात त्यांनी साजरा केलेल्या पावसाळ्याच्या स्मृतींना उजाळा देतो. पावसाळी हवेतल्या आर्द्रतेतून जाणवणारा गारवा, ओलावा याहून अधिक आल्हाददायक, रोमांचित करणारा स्पर्श तो इतर कोणता!

पावसाळा आला की, भाजलेला मका, भजी-पकोडे, समोसा-कचोरी, गरमागरम चहा, तिखट-गरम सूप इत्यादींचा स्वाद चमत्कारिकरीत्या जिभेवर स्वार होतो. रानावनांतील गर्द हिरवळीतून खळखळून वाहणारे वहाळ व डोंगरांवरून झेप घेणारे धबधबे हे तरुणाईच्या जल्लोषाला आकर्षित करतात. पावसाळा हा पशु-पक्ष्यांसाठी ताजा रसरशीत चारा निर्माण करतो. त्यामुळे त्यांच्या आनंदालादेखील पारावार उरत नाही. अनेक महिन्यांच्या उन्हाळ्यामुळे सुकून गेलेली झाडं, उघडेबोडके झालेले डोंगर, ओसाड पडलेली जमीन, सुकलेले ओढे, झरे, नद्या व इतर हे या पावसामुळे पुन्हा जिवंत होतात व इतरांना जीवन देतात, निसर्ग सुंदर बनवतात. त्यामुळेच पर्यावरणातील प्रत्येक सजीव हा या जलवर्षावाच्या प्रतीक्षेत असतो आणि त्याच्या येण्याने मनोमन सुखावतो. आभाळातून बसणाऱ्या या जलधारांवरच त्यांच्या जीवनाला गती व ऊर्जा लाभणार असते. बाष्पीभवनाने निर्माण झालेली खोली / पोकळी भरून काढणारा हा पर्जन्य म्हणजे जलचरांना लाभणारे वार्षिक जीवनदानच म्हणावा.

जीवनचक्र शाश्वत ठेवण्यासाठी हा जीवनदायी वर्षा ऋतू आपले कर्तव्य बजावण्यासाठी, जबाबदारी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी वेळेवर हजर होतो आणि ऋतुचक्राने नेमून दिलेल्या संपूर्ण कालावधीत तो स्वतःला या जगाकरिता अर्पण करत असतो, वाहून घेत असतो. कोणीही पाण्याविना कष्टी होऊ नये एवढे जलदान करावे या निश्चयाने उद्दिष्टाने तो आपली ओंजळ सगळी रिकामी करत असतो, पण आपण त्यातले किती जपतो, संवर्धन करतो, सुयोग्य वापर करतो, शुद्ध ठेवतो हे प्रत्येकाने स्वतःला विचारणे गरजेचे आहे. कारण सध्या होत आहे ते याच्या अगदी उलट. अविचारीपणातून, अनवधानाने पाण्याचा अपव्यय होणे तर स्वाभाविक बाब झाली आहे. असे नसते तर उन्हाळा उजाडताच पडणाऱ्या पाणी कमतरतेच्या भीतीतून लोकांना पावसाचे वेध लागायला सुरुवात झाली नसती. केवळ गरजेपुरती, मनोरंजनासाठी जर ‘येरे येरे पावसा’ची आळवणी होणार असेल तर मग तो कितीही निःस्वार्थपणे बरसला तरी माणसाचा स्वार्थ त्याला पुरून उरेल आणि त्यातून होणारी पाण्याची वणवण ही नित्याचीच समस्या होणार. तेव्हा जर तो आपल्यासाठी थेंबाथेंबाने सागर निर्माण करत असेल तर आपणदेखील तेवढय़ाच जबाबदारीने प्रत्येक थेंब अडवला, जिरवला, साठवला आणि कार्यक्षमतेने वापरला पाहिजे. तेव्हा ‘येरे येरे पावसा थेंबे थेंबे साठवा’ असे केले नाही, तर येणाऱ्या काही दशकांमध्ये पाणी हे पृथ्वीवरील सर्वात मोठी मागणी असणारे सर्वात दुर्मिळ व सर्वाधिक महागडे नैसर्गिक संसाधन झालेलं असेल. इतके की, जर का ते दुर्दैवाने तिसरे महायुद्ध होण्यामागचे प्रमुख कारण ठरले तर त्यात आश्चर्यचकित होण्याचे कारण नसावे.

[email protected]