लेख : तेजरंगाचा उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी 

 ‘उजळले रत्नदीप नगरात, आता जागे व्हा यदुनाथ’ असं कविश्रेष्ठ गदिमांचं एक गाणं आहे. आज दिवाळीचा सण साजरा होतोय. राजप्रासादात कधीकाळी असतील तसे ‘रत्नदीप’ नाही तरी तेजाशी नातं सांगणाऱ्या ‘मिणमिणत्या शतपणत्या’ दारोदारी तेवत असतील. आपापल्या परिस्थितीनुसार तेजाची आणि रंगांची उधळण करणारा हा दीपोत्सव मनामनात आनंद निर्माण करत असेल. दिवाळी किंवा दीपावलीचं स्वरूप देशभर वेगवेगळ्या प्रकारे साजरं केलं जातं. महाराष्ट्रात आपण धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत दिवाळीचं पर्व मानतो. दिवाळीतली अमावस्या, दारोदारी सजलेल्या दिव्यांच्या आराशीमुळे लखलखती होते. पावसाळा संपल्यानंतरच्या निरभ्र आकाशात ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ खुणावत असतानाच इकडे घर-अंगणातही दिव्यांची माळ आसमंत उजळत असते.

एकेकाळी हे दिवे फक्त मातीचे असायचे. तेल-वातीच्या या दिव्यांचा स्निग्ध प्रकाश सभोवतालचं वातावरणही मंगलमय करायचा. दीडशे वर्षांपूर्वी विजेच्या दिव्यांच्या शोध लागला आणि तोरणासारख्या घरादारावर माळता येणाऱ्या दिव्यांच्या माळा सहज उपलब्ध होऊ लागल्या. त्यापूर्वीच्या काळात उंच दीपमाळ पाहायची तर देवळाच्या प्रांगणात असलेल्या दीपमाळेचं दर्शन घ्यावं लागायचं. आजही त्या दगडी, उत्तुंग दीपमाळा तितक्याच मनोहारी वाटतात.

सण साजरा करण्याचा हेतूच मुळी मनातल्या मरगळीचा अंधार दूर करून तिथे उत्साहाचे दिवे उजळण्याचा असतो. त्या दृष्टीने दिवाळी हा जगातला एकमेवाद्वितीय सण म्हणावा लागेल. जगातल्या अनेक सणांच्या सोहळ्यात दिवे लावले जातात, पण केवळ दीप-स्मरण करणारा, दीप-पूजन करणारा असा सण अन्यत्र क्वचितच असेल. जमिनीवर छोटय़ा पणत्या आणि आढ्याला टांगलेला आकाशदीप किंवा आकाशकंदील. आता विविध रंगरूपांच्या पणत्या आणि आकाराचा आकाशकंदील. आता विविध रंगरूपांच्या पणत्या आणि आकाशदिवे मिळत असले तरी बांबूच्या काडय़ांचा घरी बनवलेला पारंपरिक आकाराचा आकाशकंदील काही वेगळाच. घराघरातल्या कलासक्त माणसाला त्यांचा कलाविष्कार मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी असे सण देतात. या साध्या साध्या गोष्टीतून मनातला उत्साह शतगुणित होत असतो.

महाराष्ट्राचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रांगोळी. दिवाळी हे जसं ‘दीपावली’चं बोलीभाषेतलं गोड रूप तसंच रंगावलीचं रांगोळी!

एकेकाळी रांगोळी प्रत्येक घराच्या अंगणात रोज रेखाटली जायची. तुळशी वृंदावनापाशी सारवलेल्या जागेवर छोटीशी रांगोळी सकाळ अधिक प्रसन्न करायची.  आताच्या अपार्टमेण्ट संस्कृतीत तसं रोज घडणं कठीणच. पण दिवाळीचा अगदी चाळीतल्या चिंचोळ्या गॅलरीत आणि मोठ्या फ्लॅटबाहेरच्या ‘पॅसेज’मधेही रांगोळ्या रंगतात. मनाजोगतं चित्र चितारून त्यात रंग भरण्यात तासन्तास कसे जातात कळत नाही. ही परंपरा आदिवासींच्या संस्कृतीतही प्रकर्षाने दिसते. वारली चित्रकलेत तर अंगणाबरोबरच घराच्या भिंतीही सुबक चित्रांनी सजवल्या जातात. त्यासाठी सणाचीही आवश्यकता नसते.

काही रांगोळ्या ठिपक्यांच्या. पूर्वी त्यासाठी छिद्रांकित कागद मिळत. मग समान अंतरावर रांगोळीने ठिपके मांडून ते रांगोळीच्या पुस्तकात दाखवल्यानुसार जोडण्याचा कार्यक्रम दारोदारी दिसायचा. नाजूक ठिपके आणि रांगोळीची नाजूक रेषा जमणे ही त्या कलेची पावती असायची. मग तयार झालेल्या भौमितिक आकृतीमध्ये रंग भरतानाही रंगसंगतीच्या ज्ञानाचा कस लागायचा. रांगोळी उठावदार दिसेल, पण बटबटीत दिसणार नाही याची काळजी घ्यावी लागायची.

रांगोळ्यांचे प्रकार अनेक. कुणी प्रसिद्ध व्यक्तींची चित्रं रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याची कला सादर करायचे तर कुणी नैसर्गिक देखाव्यांची रांगोळी चितारायचे. आमच्याकडे एका देवळातला कलाकार भक्त श्रीकृष्णाची रासलीला रांगोळीतून दाखवत असे. प्रत्येक गोपीबरोबर टिपऱ्या खेळणाऱ्या श्रीकृष्णाचा चेहऱ्यावरच्या भावछटा वेगवेगळ्या असायच्या. गोपिकांच्या चेहऱ्यावरचे भावही निरनिराळे. बालकृष्ण आणि गोपसख्यांची ती फेर धरलेली आकृती गतिमान वाटावी इतकी जिवंत भासायची. शिवाय हे सारं रांगोळीच्या माध्यमातून! कुणी पाण्यावर लाकडी कोळशाची भुकटी पसरून त्यावर अलगद रांगोळी काढत. शंखजिऱ्याच्या दगडापासून बनलेली जड रांगोळी पाण्यात बुडणार नाही अशाच बेताने चित्र साकार करणं हे आव्हान असायचं. कोणी पाण्यावरची फुलांची रांगोळी साकारायचं. आता तर महारांगोळ्यांच्या स्पर्धाही होतात. दिवाळीच्या सणानिमित्त होणाऱ्या अशा अनेक कार्यक्रमांतून तेजरंगाचे, नृत्याभिनयाचे, वस्र्रप्रावरणांचे असंख्य आविष्कार पाहायला मिळतात. रोजच्या जीवनातल्या विवंचना विसरून मन उत्सवी करण्याचा हा काळ, पण त्याच वेळी ज्यांना या साऱ्यापासून परिस्थितीने वंचित ठेवलंय त्यांचा विसर होऊ नये. ती जाणीव उदात्ततेकडे घेऊन जाईल. ती मनाची दिवाळी असेल. जाणिवेच्या प्रकाशाने भारलेली.

 [email protected]