लेख – दोन पिढय़ांचं नातं

>>दिलीप जोशी  

काही दिवसांपूर्वी जागतिक पितृदिन म्हणजे ‘फादर्स डे’ साजरा झाला. आपल्याकडे ‘मातृदिना’ची संकल्पना आहेच. थोडक्यात, आपले मातापिता किंवा घरातील, समाजातील ज्येष्ठ व्यक्तींविषयी आदराची भावना व्यक्त करण्यासाठी असे दिवस असतात, अर्थात सततच अशी कृतज्ञतेची भावना पुढच्या पिढीत असायला हवी.

प्रत्येक दोन पिढय़ांमध्ये थोडंफार वैचारिक अंतर असतंच. तसं ते असायलाही हवं. अन्यथा काळाबरोबर चालणं पुढच्या पिढीला शक्य होणार नाही. आपणही तरुण असताना असेच वैचारिक बंडखोर होतो. याचा विसर वय वाढल्यावर पडू शकतो. पण त्या काळाच्या मानाने ‘पुढचा’ विचार करताना मागच्या पिढीशी अगदी संघर्ष नव्हे, पण झालेले वादविवाद अनेकांना आठवत असतील. मला तरी आठवतात. घरापासूनच त्याची सुरुवात होते. याचा अर्थ पुढच्या पिढीने अनादराने आणि मागच्या पिढीने संतापानेच वागावं असा होत नाही.

आमच्याकडे होणाऱया वादांना ‘ऍकॅडेमिक’ स्वरूप असायचं. त्यातून मागच्या पिढीला मुलांबद्दल कौतुक आणि पुढच्या पिढीला ज्येष्ठांबद्दल अधिकच आदर वाटायचा. कारण ‘संवाद’ व्हायचा हे महत्त्वाचं. नव्या पिढीचे ‘दोष’ मागची पिढी सहज दाखवू शकते. कारण त्यांच्याकडे जीवनाचा अनुभव असतो, तर पुढची पिढी चुकतमाकत का होईना काहीतरी प्रयत्नपूर्वक नवं करू पाहते. कारण काळानुसार त्यांना लाभलेला ‘स्कोप’ जास्त असतो. 1970च्या आधीच्या ज्येष्ठांना ‘कॉम्प्युटर’ची माहिती असण्याची शक्यताच नव्हती. कारण असं काही करताना मोठय़ा प्रमाणावर विकसित होण्याच्या अवस्थेत होतं. साहजिकच पुढच्या पिढय़ांच्या विचारधारा ‘टेक्नो सॅव्ही’ होणं हे अपरिहार्य होतं.

अशावेळी ‘जुने तेच सोनं’ किंवा ‘जुनं सगळंच टाकाऊ’ असे टोकाचे विचार करून चालत नाही. खरंतर कोणताही वैचारिक अतिरेक एकांगी बनवतो. सर्वसमावेशक विचारात सौहार्द असतं. ‘जुन्यातलं सोनं’ घेत नव्या काळाची पावलं ओळखून आवश्यक आधुनिकता वेळोवेळी स्वीकारणं गरजेचं असतं. असं झालं तर दोन पिढय़ांतली मतभेदांची दरी कमीत कमी होऊ शकते. मागच्यांचा अनुभव (एक्सपिरिअन्स) आणि पुढच्यांचं अभिनव गोष्टींचं ज्ञान (एक्स्पोजर) याची सांगड घातली तर वाद संपतो आणि नातेसंबंधात सहजता येते.

आमच्याकडे आईवडिलांनी आम्हाला समजून घेतलं आणि व्यक्तिगत प्रगतीसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्याचबरोबर आम्हालाही त्यांचा आमच्यावर विश्वास ठेवण्याच्या गोष्टीचा नेहमीच विलक्षण आदर वाटत राहिला. ‘जे कराल ते विचारपूर्वक करा’ असं आमचे वडील सांगायचे. यात आमच्यावरच अधिक जबाबदारी यायची. मात्र त्यांच्या वडिलांच्या काळात ही परिस्थिती नव्हती. वडील सांगत की, ते आणि त्यांच्या भावंडांना वडिलांसमोर बोलायचीही धास्ती वाटायची. ही दहशत नव्हती, तर आजोबांचा दरारा होता. परंतु त्यामुळे त्यांच्यात तसा ‘संवाद’ मात्र नव्हता. त्या काळात आपल्या देशात घरोघर अशीच परिस्थिती होती. त्यातली काही कुटुंबं मीही पाहिली आहेत.

काळ बदलतच असतो. त्याचा बदलण्याचा वेग मग तो यांत्रिक असो की वैचारिक, गेल्या काही वर्षांत खूप वाढला. पुढची पिढी अधिक स्वतंत्र विचारांची होऊ लागली. कधी कधी मागच्या पिढीला संकोच वाटावा इतकी प्रगती करू लागली. पण त्यात संकोच वाटण्याऐवजी अभिमानच आहे असं ज्यांना पटलं ते पिता-पुत्र (किंवा पिता-पुत्री) मित्र झाले. हेही आता खूप ठिकाणी दिसतं. ‘प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रम् मित्रवद् आचरेत’ म्हणजे सोळा वर्षांच्या मुलाला मित्र मानावं असं आपली संस्कृती सांगते. आता त्यात ‘पुत्रीम् मित्रवद् आचरेत’ असंही म्हणायला हवं, इतकी प्रगती मुली करत आहेत. पूर्वी त्यांना संधीच नव्हती. आता त्या संधीचं सोने करताना आपण पाहतो. त्यामुळे मुलगा वा मुलगी वयात आल्यावर ‘मित्रवत्’ होणे यात मागच्या पिढीची  जबाबदारी थोडी जास्त आणि आपल्याशी मित्रत्वाने वागणाऱया मातापित्यांविषयी कृतज्ञ असणं ही जबाबदारी किंवा दायित्व पुढच्या पिढीचं. असं असलं तर मातृ-पितृदिन सौहार्द दिवस होतील.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या