
>> अवधूत सहस्रबुद्धे
माणसाचा मेंदू ही एक मज्जातंतूपासून बनविलेली संक्रमित आणि सुनियोजित जाळी आहे. माणसाचे सर्व अवयव या जाळ्याशी जोडलेले असतात आणि त्यातसुद्धा ऐच्छिक कार्ये आणि अनैच्छिक कार्ये अशा प्रकारची संरचना असते. मेंदूमधील या अत्यंत क्लिष्ट संरचनेला जर काही धक्का लागला किंवा इजा झाली तर माणसाची शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता थांबू शकते अथवा कमी होऊ शकते.
मतिमंदत्व ही मेंदूची अशीच एक अवस्था आहे, ज्यात माणसाचा मेंदू सक्षम होत नाही आणि त्याची शरीरानुसार वाढ होत नाही. याची अनेक करणे असू शकतात जसे की
– अनुवांशिक कमतरता
– जन्माला येताना मेंदूला झालेली इजा किंवा आजार
– मातेचे गर्भारपणात झालेले कुपोषण आणि त्रास
– बालपणात (अर्भक अवस्था) डोक्याला झालेली इजा किंवा संबंधित आजार इत्यादी…
मतिमंद व्यक्तीमध्ये हालचाल, आकलन, सामाजिक आणि भाषा यापैकी काही किंवा सगळ्या प्रकारात लक्षवर्धक कमतरता दिसून येते. प्रत्येक मतिमंद व्यक्तीमध्ये ही कमतरता अनेक वेगळ्या स्तरांची असते आणि वैद्यकीयदृष्टय़ा या अवस्थेला कुठलाही सिद्ध झालेला उपाय नाही. औषधे आणि भौतिक चिकित्सेने ही कमतरता पूर्णपणे घालवता येत नाही.
मतिमंदत्वाची पातळी ठरवणे ही सोपी प्रक्रिया नसून त्याबद्दल अनेक ठोकताळे वापरले जातात, परंतु जगभरात मतिमंदत्व आहे की नाही आणि ते किती तीव्र आहे हे ठरविण्यासाठी बुद्धय़ांक मोजणी ही एक सर्वमान्य प्रणाली वापरली जाते. बुद्धय़ांकानुसार मतिमंदत्व खालील प्रकारात मोडते आणि त्या प्रकारच्या अवस्थेत असणारी क्षमता दर्शवते.
सामान्यतः पालकांना आपले मूल मतिमंद असावे असा संशय त्याच्या १ ते २ वर्षांच्या मध्ये येतो. कारण ते मूल नैसर्गिकरीत्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या करू शकत नाही. बोलणे, लक्ष देणे, शारीरिक हालचाली, हावभाव, भावना व्यक्त करणे इत्यादी गोष्टींमध्ये ही मुले मागे पडली आहेत याची जाणीव होते. सुरुवातीला पालक स्वतःची समजूत करून घेतात की, कदाचित आपल्या मुलाची जडणघडण थोडी उशिराने आहे, परंतु जेव्हा त्यांना हे जाणवते की, आपले मूल इतरांपेक्षा खूपच वेगळे वागत आहे, तेव्हा मग ते त्यावर उपाय शोधायला लागतात. नशिबाला दोष देत हे पालक मग सर्व प्रकारचे वैद्यकीय आणि अवैद्यकीय उपचार करून घेतात. शेवटी सगळे उपाय संपल्यावर त्यांना या अस्तित्वाची जाणीव होते की, आपले मूल हे मतिमंद आहे आणि आता आपल्याला त्याचा आयुष्यभर संपूर्ण सांभाळ करावा लागणार आहे.
मतिमंद मूल घरात असणे ही पालकांसाठी एक अगतिक अवस्था असते आणि या जाणिवेच्या सुरुवातीच्या काळात या पालकांना समुपदेशन आणि सहानुभूतीची फार गरज असते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि प्रशिक्षकांचा त्यात खूप मोठा सहभाग आवश्यक असतो. पालकांना आपल्या पाल्याच्या पुढील आयुष्यामधील सांभाळ आणि संगोपन यासाठी शारीरिक आणि मानसिकरीत्या सक्षम करणे ही सगळ्यात मोठी जबाबदारी त्या पालकांच्या परिवाराने आणि एकंदरीत सर्व समाजानेच पार पाडायची गरज असते.
मतिमंदत्व हे एक विलक्षण अपंगत्व आहे, ज्यात त्या व्यक्तीला आपल्या अपंगत्वाची जराही जाणीव नसते आणि त्यामुळे अशा व्यक्ती आयुष्यभर परावलंबी राहतात, परंतु एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट अशी की, जरी अशा व्यक्ती मानसिकदृष्टय़ा विकसित होत नसल्या तरी त्या सतत मनाने ‘खऱया’ असतात.




























































