खाऊच्या गोष्टी – डोसा मत्तू चटणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

दाक्षिणात्य पदार्थांनी दक्षिणेपलीकडे संपूर्ण देशभरात स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आहे. इडली, मेदुवडा, सांबार, उत्तप्पा देशाबाहेरही प्रसिद्ध आहेत. याच शृंखलेतील दमदार नाव म्हणजे डोसा. याच डोशांशी जोडलेली ही खमंग गोष्ट.

आंबवलेल्या पदार्थांना  प्राचीन परंपरा आहे. ‘मानसोल्लास’ या प्राचीन ग्रंथात सोमेश्वर डोसकांचा उल्लेख करतो. तामीळ संगम साहित्यात ‘डोसाई’ हा पदार्थ नमूद केला जातो. एकूण काय तर डोसे प्राचीन आहेत. उडुपी प्रांताशी डोशांशी विशेष नाळ दिसते. तामीळ डोसाई मऊ आणि अधिक जाड असतात, तर कर्नाटकात तेच डोसे पातळ आणि कुरकुरीत होतात.

डोशांचा जन्म कसा झाला आणि हे नाव पदार्थाला कसं मिळालं याची एक कथा दक्षिणेकडे प्रचलित आहे. ही कथा उडुपी प्रांतात घडते. एक ब्राह्मण अडिगा अर्थात आचारी मद्यप्राशन करण्यासाठी उत्सुक असतो, पण गरिबी आणि बाहेरील लोकांस कळले तर होणारी नाचक्की याला घाबरून तो घरच्या घरी तांदूळ आंबवून मदिरा बनवण्याचा प्रयत्न करतो, जो अर्थातच फसतो. वैतागाच्या भरात किंवा प्रयोग करण्यासाठी ते मिश्रण तो तव्यावर टाकतो. त्यातून हा पदार्थ जन्माला येतो. कन्नडमध्ये पापी कृत्याला दोषा असं म्हणतात तर त्या गरीब आचाऱ्याच्या दोषातून जन्माला आलेले ते दोषे अर्थात डोसे. ते चटणीसह खाल्ले जातात. कन्नडमध्ये चट्ट म्हणजे वाईट सवय. डोसा मत्तू चटणी. ‘वाईट सवयींसह दोष’ असाही अन्वयार्थ  या कथेत जोडलेला आहे.

ही कथा खरी असण्याची शक्यता कमी असली तरी डोसा, डोसे या नावाचा अन्य अर्थ उलगडण्यास कोणताही दुसरा पर्याय उरत नाही. मसाला डोसा सर्वसाधारणपणे यत्रतत्र सर्वत्र आढळणारा प्रकार. त्यामागे दोन कथा आहेत. सुरुवातीला साधा डोसाच लोक खात असत. दक्षिणेकडे डोसा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. ज्या काळात कांदा खाणं वर्ज्य समजलं जायचं, त्या काळी बटाटे आणि कांदे घालून केलेल्या मिश्रणाची भाजी आपण खाऊ घालतोय वा खातोय हे कळू नये यासाठी ती डोशांच्या आत गुंडाळून दिली जायची. त्यातून मसाला डोशाचा जन्म झाला.

दुसरी कथा मैसूरच्या महाराजांशी नातं सांगते. मैसूरचे महाराज खवय्ये होते. ते अनेकदा मेजवानी देत, पण त्यात खूप सारे अन्न उरून वाया जाई. महाराजांना ते अजिबात पसंत नव्हते.  त्यांनी आचाऱयांना यावर उपाय शोधायला सांगितला. आचाऱयांनी उपाय शोधला आणि   त्यातून उरलेली भाजी डोशांतून खपवताना कुणा हुशार बल्लवाचार्यांच्या कल्पनेतून मसाला डोशांचा जन्म झाला.

 या सगळ्या कथा शब्दशः मीठमसाला लावून तयार झालेल्या असल्या तरी कदाचित डोशांच्या उगमाचा बारीकसा  धागा जोडणाऱ्या वाटतात. डोसा हा काही तारांकित पदार्थ नाही. तो अधिकतर पोटभरीचा दिलासा किंवा नाश्त्याची सोय अशा वर्गात मोडतो.  म्हणावं तर पातळसर आणि दिसायला अतिसामान्य डोसा म्हणता म्हणता भरल्या पोटाची शाश्वती देतो.