मुद्दा – …तरच एसटी तरेल!

>> सुनील कुवरे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला 72 वर्षे पूर्ण झाली तरी महाराष्ट्रातील जनतेचे एसटीवरील प्रेम काही कमी झालेले नाही. अन्य राज्यांतील सरकारी परिवहन सेवेपेक्षा महाराष्ट्राची परिवहन सेवा त्यामानाने पुष्कळ चांगली आहे. एसटी बसने प्रवास करणारे लाखो प्रवासी असा प्रचंड पसारा महामंडळाचा आहे. मुंबईतील लोकांची जशी लोकल रेल्वे आणि बेस्ट बस जीवनवाहिनी आहे. तशी राज्याच्या ग्रामीण भागातील लोकांची एसटी बस जीवनवाहिनी आहे. आजही गावाकडील लोक ‘लाल परी’ म्हणतात. अतिदुर्गम भागापासून ते खेडेगाव, राज्यातील सर्व शहरांना जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. कारण अतिदुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना, कामावर जाणाऱया लोकांना तसेच आजारी लोकांना तालुका किंवा जिल्हा रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते.

एसटीची सेवा गाव तेथे एसटी, रस्ता तेथे एसटी अशी आहे. दुर्गम भाग, खेडय़ांपासून ते शहरांपर्यंत विस्तारलेली आहे. अशा या परिवहन महामंडळाची परिस्थिती काय आहे? सध्या राज्य परिवहन महामंडळाला कोटय़वधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या काळात एसटीचे चाक थांबले होते. ते चाक आता हळूहळू रुळावर येत आहे. 18 हजार बसेस आणि दररोज 60 लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची जबाबदारी एक लाख चार हजार कर्मचाऱयांवर आहे, पण या कर्मचाऱयांचे पगारही वेळेवर होत नाहीत. याचा विचार सरकारने केला पाहिजे. सरकारकडून त्यासाठी नक्कीच प्रयत्न होत असतात. त्यामुळे कर्मचारी ‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांची सेवा करीत आहेत.

खरे तर एसटी बस सेवा तोटय़ात जायला आजपर्यंत अनेक कारणे आहेत. राज्यातील याआधीच्या सत्ताधाऱयांनी राज्य परिवहन महामंडळाकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी, वाढत्या तोटय़ातून बाहेर पडणे एसटीला अशक्य होऊन बसले आहे. कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठय़ा फायद्यात नसते. त्यासाठी सरकारने काही प्रमाणात अनुदान देऊन तिची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे होते.

परिवहन महामंडळ तोटय़ात जायला अनेक कारणे आहेत. काही वर्षांपूर्वी खासगी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यात कमी अंतरावर वडापची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी होत गेली. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असे एसटीसमोर आव्हान आहे. तसेच प्रवासी करामधून सरकारकडून एसटीला दिला जाणारा सहभाग वेळेत न मिळणे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आदींना दिल्या जाणाऱया सवलतींचा परतावा जो सरकारकडून मिळतो, त्याची भरपाई वेळेत न मिळणे तसेच प्रवाशांच्या सुविधांकडेही दुर्लक्ष अशी अनेक कारणे आहेत. सध्या एसटीच्या 18 हजार बसेस वाहतूक करीत आहेत. यात ‘शिवशाही’ या नावाने खासगी आरामबसेस सुरू आहेत. अनेक लांब पल्ल्याच्या एसटी बसेस बंद केल्या आहेत.

एसटी ही सर्वाधिक गावांमध्ये पोहोचणारी आणि सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारी राज्यातील ही एकमेव व्यवस्था आणि यंत्रणा आहे. तिचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल.

आज एसटी महामंडळाला 97 टक्के महसूल हा तिकीट विक्रीतून मिळतो, तर उर्वरित महसूल हा जाहिरात, पार्सलमधून मिळतो. वर्षाला अंदाजे सहा ते सात हजार कोटी रुपये उत्पन्न मिळूनही महामंडळाला जवळपास संचित तोटा अंदाजे तेवीसशे कोटींच्या घरात जातो. तसेच एसटी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते. शिवाय इतर वेळी भाडेवाढ करते ती वेगळी. तेव्हा एसटीला फायद्यात आणायचे असेल, तर एसटीमध्ये काळानुरूप बदल करावे लागतील. सरकारने डिझेल, पथकरामध्ये सूट द्यावी. प्रवासी कर माफ करावा. बसगाडय़ांमध्ये सुधारणा करावी. तसेच अन्य मार्गाने महसूल मिळविण्याचा प्रयत्न करावा. एसटीने स्वतःचे असे वेगळे प्रयत्न करावेत. आपली परंपरा जपण्यासाठी नवनवीन प्रयोग राबवायला हवेत. प्रवाशांना चांगली सेवा देऊन त्यांचे प्रेम मिळवावे, पण त्यासाठी एसटीच्या व्यवस्थापनाने काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. तरच एसटी फायद्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या