ठसा – सुनील पोटेकर

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष 17 सप्टेंबरला पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त तेथील काही तालुक्यांमध्ये सांस्कृतिक वार्तापत्राने प्रकाशित केलेल्या ‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ या विशेषांकाचे प्रकाशन आणि व्याख्यान असे कार्यक्रम झाले. त्यानिमित्ताने आमचा मुक्काम प्रामुख्याने परभणीत होता. तिथे इंजिनीअर व कीर्तनकार असलेल्या शंकर आजेगावकर या तरुण स्नेह्यांमुळे एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रातील वरिष्ठ तंत्र संचालक आणि जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी असलेले, सुनील पोटेकर हे त्यांचे नाव! हा माणूस म्हणजे झपाटलेला सरकारी अधिकारी आहे. हा शिल्प आणि इतिहासवेडा तर आहेच पण उत्तम चित्रकारही आहे. गो.बं. देगलूरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी परभणी जिह्यातील अनेक दुर्लक्षित स्थाने, देवालये उजेडात आणली. यात कित्येक दुर्लक्षित पुरातन मंदिरांचा समावेश आहे. पोटेकरांनी हा शोध घेण्यासाठी एक टीम तयार केली. शासनाची अल्प मदत घेत शोधकार्य चालू केले. बऱ्याच स्थानी झुडपे वाढली होती तर काही ठिकाणी अस्वच्छतेचे आगार होते. आता काही ठिकाणी साफसफाई चालू आहे. हा शोध घेत असताना त्यांच्यातील चित्रकार अस्वस्थ होत होता. त्यातून तब्बल 48 स्थानांच्या चित्रांचे एक छानसे पुस्तकही (खासगी वितरण) सज्ज झाले. अनेक ठिकाणच्या अस्वच्छतेची वा अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडाझुडपांची किंवा खंडित मंदिरांची बाधा या चित्रकाराला अडवू शकली नाही. मंदिरांचे मोजमाप घेत केवळ कल्पनेने काही मंदिरे त्यांनी पूर्ण पाहिली व रेखाटली. जे न देखे रवी, ते देखे कवी, असे म्हटले जाते. थोडय़ाफार फरकाने हीच उक्ती पोटेकरांना लागू होते असे म्हटले तर वावगे ठरू नये! खंडित मंदिरे वा शिल्पे त्यांच्या दृष्टीसमोर पूर्णरूपाने उभ्या राहतात. मूर्तिकाराला दगडात मूर्ती दिसते त्याप्रमाणे या चित्रकाराला संपूर्ण मंदिर दिसते.  परभणी हा विपुल बारवांचा (विहीर,तळे) जिल्हा आहे. त्यांची विलक्षण बांधणी पहिल्याच वालूर येथील चक्राकार बारवेच्या पेन्सिल स्केचमध्ये दिसते. अन्य अनेक मंदिरे त्यांनी जलरंगापासून जेलपेनचा उपयोग करीत रेखाटली आहेत.   याचसोबत त्यांचे रामायणावरही काम चालू आहे. वनवास काळात श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई यांचा तब्बल दहा वर्षांचा काळ हा मराठवाडा-विदर्भ परिसरात गेल्याचा त्यांचा दावा आहे. दंडकारण्याचा एक नकाशाही त्यांनी सिद्ध केला आहे. जागोजागी असणाऱ्या श्रीरामांच्या वा सीतामाईच्या नावाने असलेल्या स्थानांचा शोध घेतला. जनश्रुतींचा सखोल अभ्यास केला. अशा लोकप्रचलित कथा आपोआप निर्माण झालेल्या नसतात असे त्यांचे प्रतिपादन आहे. हा सर्व प्रकल्प उभा करण्यासाठी त्यांनी वैदिक, पंडित, शिल्पशास्त्राr, इतिहासकार आदी लोकांचा एक अभ्यास गट तयार केला. दक्षिण गंगा म्हणून मान्यता असणाऱ्या गोदावरीच्या तटावरचा भाग म्हणजे रामायण कालीन दंडकारण्य होते. पुढे रामटेककडे जाताना भगवान श्रीराम याच मार्गाने गेले. या दाव्याच्या पुष्टय़र्थ ते वाल्मिकी रामायणातील संदर्भ नमूद करतात. मराठवाडा ही प्रत्यक्ष भगवान श्रीरामांचा पदस्पर्श झालेली पावनभूमी असल्याचे ते दाखवून देतात. गेली दोन वर्षे अत्यंत चिकाटीने हा गट संशोधन करीत होता. नांदेड, परभणी, जालना, हिंगोली आदी जिह्यांतील चोवीस स्थळे वाल्मिकी रामायणातील संदर्भानुसार त्यांनी निश्चित केली आहेत. खूप कामे पडतात, अन्य कोठेही लक्ष द्यायला जमत नाही, सवडच मिळत नाही यासारख्या अनेक सबबी सांगणाऱ्या लोकांसाठी सुनील पोटेकरांसारखा अधिकारी आदर्श ठरावा!

>> डॉ. सच्चिदानंद शेवडे, [email protected]