लेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन

2103

 >> अविनाश पाटील ([email protected])

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन 20 ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनम्हणून आयोजित करण्याचे महाराष्ट्र अंनिसतर्फे ठरविण्यात आले आहे. मागील वर्षी पीपल्स सायन्स नेटवर्क (AIPSN) महाराष्ट्र अंनिस यांच्या संयुक्त आवाहनाने देशातील विविध विज्ञानवादी संस्था, संघटनांच्या सहभागाने राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनव्यापक प्रमाणावर आयोजित करण्यात आला होता. आजच्या राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाच्या निमित्ताने

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी देव, धर्मविषयक श्रद्धा, परंपरा, चालीरीती, रूढी आणि प्रचलित समज-संकेत यांची कालसुसंगत चिकित्सा करणे अभिप्रेत असते. त्यामुळे अर्थातच बुवा-बाबा, त्यांची बुवाबाजी, चमत्कारांचे दावे, सिद्धी, अवतार आणि आध्यात्मिकता यांचा पर्दाफाश करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या तर्कशुद्ध तपासणीच्या कार्य पद्धतीचा अवलंब करावा लागतो. त्यातूनच भूत, आत्मा, पुनर्जन्म, प्लँचेट, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, फलज्योतिष, करणी-भानामती-मूठ अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांचा पर्दाफाश केला गेला आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अवैज्ञानिक, अतार्किक, अमानवीय आदी भौतिक अशा मानवी जीवनातील रूढ संकल्पनांना, समजांना, वृद्धीकरण झालेल्या श्रद्धा-चालीरीती-परंपरांना मोठा धक्का पोहोचला आहे. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत व संघटित कार्यात आजपर्यंतच्या वाटचालीत वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संदर्भाचा काही मर्यादित अर्थानेच विनियोग आपण करू शकलो आहोत. प्रत्यक्षात वैज्ञानिक दृष्टिकोन हा जीवनव्यापी दृष्टिकोन आहे. ती मानवी जीवनाकडे बघण्याची, वर्तमानाची, अवलंबण्याची एक जीवन पद्धती आहे. त्यासाठी त्याला समजून घेताना व आपल्या जीवनात अंगीकारताना अधिक व्यापक अंगाने बघणे, अनुभवणे व व्यवहारात आणणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन (20 ऑगस्ट) ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून आयोजित करताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अशीच विनम्र भूमिका राहणार आहे.

मानवी जीवनाच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आधी तर्क, चिकित्सा, सारासार विचारपासून शास्त्राrय विचारांपर्यंतचे मार्गक्रमण झाले आहे. त्याचा पुढचा विकसित टप्पा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा राहिला आहे. त्यामुळे उणेपुरे चार शतकांची वाटचाल झालेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार हा अखिल मानवी जीवनात प्रचंड खळबळ आणि मुलगामी क्रांतिकारी परिवर्तन करणारा ठरला आहे. त्याबाबत आपण अनेक उदाहरणे आज देऊ शकतो. त्याचा भौतिक विकासासाठी झालेल्या संशोधनांचा, साधन सामुग्रीची अनुभूती मानवाने घेतलेली आहे आणि आपले जीवन अधिकाधिक सुखी-संपन्न करायचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पहिल्या काही शतकांमध्ये तर मनुष्य प्राणी म्हणून जगण्याला अत्यावश्यक असणाऱ्या मूलभूत नैसर्गिक प्रेरणांच्या परिपूर्तीच्या गरजेतून संशोधन व शोधांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर पुढे कृषी जीवन, नागरी जीवनाच्या वाढत्या गरजांनुसार माणसाने अनुभवजन्य वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावून साधनांची, साहित्याची निर्मिती केलेली दिसते. त्याच्या पुढच्या टप्प्यावर मानवी समूहांकडून धर्म, प्रदेश, राष्ट्र निर्मितीच्या संकल्पनांचा जसजसा विकास आणि विस्तार होत गेला तसतसे त्याच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर बऱ्या-वाईट पद्धतीने केला गेला आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाला मानव कल्याणाची व सभोवतालच्या पर्यावरणीय संदर्भाची जोड देणारा नीती विचार, अर्थात मानवीय नैसर्गिक आयाम देण्याचा प्रयत्न मागील शतकांमध्ये केला गेलेला दिसतो. आता तर त्याच्या पुढच्या टप्प्यावर मानवी आकलनाला व अभ्यासाला नेणारे संशोधन उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता आपल्याला केवळ भौतिक साधनांच्या अंगाने बघण्यासाठी जोपासला गेलेला वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी व्यक्तिमत्त्व म्हणून विकसित झालेल्या अभ्यास, संशोधनाच्या संदर्भासह अद्ययावत केला पाहिजे असे वाटते. त्यामुळे कदाचित माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील बदलीसाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांमध्ये प्रामुख्याने विचाराच्या अंगाने केले गेले आवाहन पुरेसे ठरलेले नाही. कारण माणसाचे व्यक्तिमत्त्व हे भावना व विचारांचे मिश्रण आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला माणसांच्या विचारासोबत किंबहुना विचारापेक्षा भावनांना विवेकी आवाहन करण्याचा आयाम वृद्धिंगत करावा लागेल. जे काम आजपर्यंत धर्म या व्यवस्थेच्या माध्यमातून झालेले आपल्याला बघायला मिळते. म्हणून असे म्हणावेसे वाटते की, आपण विवेकी समाज निर्मितीचे स्वप्न बाळगणारे लोक आता विचारांबरोबर मानवी भावनांचा अधिक विचार करू आणि मानवी संबंधांच्या क्षमतांना वृद्धिंगत करीत मानव समूहांच्या जगण्याचे, प्रश्नांचे निराकरण करण्याला प्राधान्य देऊ शकू. अर्थात यासाठी आजही माणसांच्या जगण्यातील विविध प्रश्न भौतिक अंगाने सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था-संघटनांच्या कामांकडे अधिक संवेदनशीलतेने व गांभीर्याने बघायची गरज जाणवते. त्यांच्याकडूनदेखील मानवी प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पद्धतीने वा जाणते-अजाणतेपणी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला गेला आहे असे आपल्याला दिसते. आम्ही अशा अनेकविध क्षेत्रात व स्तरांवर कार्यरत असणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा समाज परिवर्तनातील प्रकाशाच्या बेटांना समाजासमोर आणण्याचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या परिप्रेक्षात अधोरेखित करण्याचा प्रयत्न भविष्यात करण्याची अपेक्षा बाळगून आहोत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासाठी यथाशक्ती अशा सर्व प्रयत्नांमध्ये आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे हे यानिमित्ताने जाहीर करू इच्छितो. आज 20 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र अंनिस व देशभरातील सर्व समविचारी विज्ञानवादी संघटना-संस्था-गट-व्यक्तींच्या सहभागाने आपापल्या ठिकाणी विविधांगी पद्धतीने उपक्रमशील राहूया!

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या