साखरपुडा झाला, आता लग्नाला उशीर नको!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>द्वारकानाथ संझगिरी

मेलबर्नमधील चार दशकांचा दुष्काळ टीम इंडियाने संपवला. ऑस्ट्रेलियाला तिसऱया कसोटी सामन्यात धूळ चारली. हिंदुस्थानचा हा दीडशेवा कसोटी विजय. या विजयाने ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकण्याची संधी पुढच्या वळणावर उभी आहे. साखरपुडा झालाय, आता लग्न उरकून टाका. वाङ्निश्चय थाटामाटात पार पडला त्याचं श्रेय रवी शास्त्रीसकट आपण सर्वांना देऊया. हरल्यावर पहिला वार रवी शास्त्री झेलतोय. मग जिंकल्यावर पहिला हार त्याला नको का? त्याने आणि विराटने या वेळी संघ उत्तम निवडला. एक नवीकोरी आघाडीची जोडी आणि उगाचच वेगवान गोलंदाजांची खोगीर भरती करण्याऐवजी रवींद्र जाडेजाची निवड!

त्यात विराट कोहलीने टॉस उडवल्यावर कुणाचं नाव घेतलं तोच जाणे. चक्क टॉस जिंकला. विराटवर नशीबसुद्धा खूश असल्याची ती ग्वाही होती. अर्थात हनुमंत विहारीला आघाडीला ढकलला होता. कलियुगातही प्रत्येक हनुमानाला रामाचा दास व्हावं लागतं का देव जाणे? त्याच्याकडे ‘हो’ म्हणण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं. पण निदान हनुमंत विहारीला मानसिक तयारी करायला वेळ तरी मिळाला. हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये असे अनेक ऍक्सिडेंटल आघाडीचे फलंदाज आहेत. एकतर इतका ऍक्सिडेंटल होता की अपघातातून बाहेर यायच्या आत त्याची कारकीर्द संपली. 1967 इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या साडेसहाशे धावांचं क्षेत्ररक्षण करून परतताना कर्णधार पतौडीने रमेश सक्सेना या बिहारी खेळाडूला सांगितले, तुझं तंत्र चांगलं आहे. आघाडीला जा. त्याला जावं लागलं. त्यानंतर त्याची कारकीर्द संपली. हनुमंत विहारी हा आघाडीची भूमिका कायम बजावू शकत नाही. हे त्याने त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीने दाखवून दिलंय. तो ‘देवागौडा’ होऊ शकतो. नरसिंह राव नाही.

मयांक अगरवालचं यश सुखाऊन गेलं. केवळ त्याने केलेल्या धावा हे त्याचं कारण नाही. त्याचा आत्मविश्वास, त्याचं टेंमरामेंट, त्याचं तंत्र आणि त्याचा पॉझिटिव्ह ऍप्रोच मला जास्त भावला. त्याच्या तंत्राला यापुढे आणखीन कठीण परीक्षा द्याव्या लागतील. पण पहिल्या कसोटीत तो खेळतोय, उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीचा सामना करताय आणि दोन्ही डावांत धावाही करतोय. याला मी डिस्टिंगशन मिळवणं म्हणेन. आघाडीच्या जोडीने लाल चेंडूला ताठ कणा दाखवल्यामुळे तो नेहमीप्रमाणे मधल्या फळीत घुसला नाही. त्याचा फायदा पुजारा, कोहली, रहाणेला झाला. पुजारा त्याच्या आयुष्याच्या सर्वोत्तम फॉर्मात खेळतोय. संघासाठी ‘घोरपड’ व्हायचं ही त्याची जुनी सवय आहे. पण ऑस्ट्रेलियातला त्याचा आत्मविश्वास, त्याचा बचाव वेगळाच आहे. एरव्ही परदेशी त्याला घाईत चेंडू खेळावे लागतायत असं वाटायचं. इथे तो चक्क चेंडूची वाट पाहतोय आणि वेळप्रसंगी फटकेही तो लीलया मारतोय. पूर्वी एखादा चांगला फटका त्याने मारल्यावर त्याच्याकडे फटके असल्याचा संशय यायचा. आता चक्क पुरावाच त्याने सादर केला. मुख्य म्हणजे या वेळी हिंदुस्थानी फलंदाज ऑफस्पिनर नाथनला चांगले खेळले. नवख्या मयांक अगरवालने त्यांना मार्ग दाखवला. मयांक अगरवालाचं फिरकी गोलंदाजी खेळण्याचं पदलालित्य पाहून ऑस्ट्रेलियातल्या माजी खेळाडूंना आनंद झाला असेल. चेंडूची धूळभेट त्या पद्धतीने घ्यायची त्याची सवय होती. क्रिझच्या बंकरमधून ते नेहमीच खेळले नाहीत.

अगरवाल-पुजारा आणि पुजारा-विराट कोहली भागीदारीने हिंदुस्थानच्या धावसंख्येचा पाया घातला. विराटने संयम पुजाराकडून उसना घेतल्याप्रमाणे फलंदाजी केली. हिंदुस्थानने फलंदाजी शतपावली करावी तशी केली. पण मला त्यात चुकीचं काही वाटलं नाही. कारण शेवटी धावांचा आकडा महत्त्वाचा होता. खेळपट्टीने पहिल्या दिवसाचा स्वभाव बदलला होता. कधी चेंडू खाली ठेवणं, कधी वर उसळणं ही तिची मनमानी सुरू होती. त्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजी कचकडय़ाची आहे आणि आपली गोलंदाजी उच्च दर्जाची. वेगापेक्षा मोठय़ा धावसंख्येची जास्त गरज होती. ऑस्ट्रेलियन फलंदाजी अपेक्षेप्रमाणे कोसळली. गेल्या सामन्यात महंमद शमीने विकेट्स खिशात टाकल्या होत्या. इथे जसप्रीत बुमराहने टाकल्या. हा गोलंदाज टी-20मधून आपल्याला मिळाला त्यावर आता माझा विश्वास बसत नाही. टी-20च्या विहिरीत पोहणारा मुलगा कसोटीच्या महासागरात असा पोहतोय की देशोदेशीच्या देवमाशांनी त्याच्याकडे अचंबेने पहावे. सरासरी वेग चक्क ताशी 145 किलोमीटर्स. दोन्ही स्विंग, सिम, रिव्हर्स स्विंग, उसळता चेंडू, यॉर्कर स्लोअरवन. अरे आणखीन काय असतं वेगवान गोलंदाजांकडे? बरं वेगवान गोलंदाजांकडे असणारी शरीराची आक्रमक भाषा त्याच्याकडे नाही. ‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस प्रयाण’ थाटाचा त्याचा चेहरा. त्याचा फक्त बॉल बोलतो. तो हेल्मेटला लागतो तेव्हा हेल्मेटही कापते. त्याच्या कोचचे आभार मानूया की त्याने बुमराहची ऍक्शन बदलली नाही. त्यामुळे त्याची लय तशीच राहिली. आणि फलंदाजांना चेंडू कळायला किंचित वेळ लागतो. यातला ‘किंचित’ हा शब्द फार मोठा फरक घडवून आणतो.

पण मला हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन न देणं आवडलं नाही. गोलंदाज दमले वगैरे काहीतरी कारणं देऊ नका. मानसिकदृष्टय़ा गुडघ्यावर उभ्या असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भुईसपाट करायची तीच वेळ होती. समजा शेवटचा दिवस पावसात वाहून गेला असता तर? फॉलोऑन देऊन हिंदुस्थानने कसोटी सामना चौथ्या दिवशी संपवायला हवा होता. चौथ्या डावात खेळावं लागलं तर हा भेकड विचार करावा का? आणि आपण इतके घाबरतो चौथ्या डावात खेळायला? दुसऱया डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजीला उसळत्या चेंडूवर ‘लेग ट्रप’ लावून हिंदुस्थानी फलंदाजीला नामोहरम करता येतं हा डावपेच गवसला. हा डावपेच त्यांनी आतापर्यंत का वापरला नाही, देव जाणे. पण आपल्या दुसऱया डावातल्या फलंदाजीने त्यांना त्याची आठवण करून दिली. त्याचा प्रयोग आता सिडनीला होईल. कारण त्यांची गोलंदाजी सशक्त आहे.

तरीही एक नक्की की, लोखंड गरम आहे. आताच हातोडा मारायला हवा. ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची इतकी चांगली संधी लवकर मिळणार नाही.