मुद्दा – मंदिरे आणि त्यावर अवलंबून हिंदुस्थानी जनजीवन

>>  सुनील जाधव  

कोरोनाने जवळपास सहा महिन्यांपासून संपूर्ण जगाचा ताबा घेतला आहे. जगाचे सगळे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्याला आपला देशही अपवाद नाही. आपल्या देशातदेखील या महामारीने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 40 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यातील निम्मी संख्या महाराष्ट्रातील आहे. कोरोनाच्या मृत्यू दराचे प्रमाणही मोठे आहे. वास्तविक कोरोनाचा संसर्ग आवाक्यात राहावा म्हणून संचारबंदी तसेच लॉक डाऊनसारखे उपाय केले गेले, तरी म्हणावी तशी परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. रोजच्या मृत्यूची संख्या व रोज बाधित होणाऱ्य़ांचे प्रमाणदेखील मोठे आहे.

बाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा म्हणावी तशी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची मागणी तसा पुरवठा होऊ शकत नसल्याच्याही तक्रारी आहेतच. सरकारसह विविध सामाजिक संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इतर स्वयंसेवी संस्था तसेच विविध धर्मादाय या आरोग्य आणीबाणीला तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय अन्नधान्याची तसेच औषधांची मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक दानशूर व्यक्ती, उद्योगपती तसेच सिने कलावंत मंडळींनीही मोठी मदत केली. तेव्हा काही विज्ञानवाद्यांनी मंदिरे, देवस्थाने काय करीत आहेत असे आक्षेप घेतले, परंतु विविध देवस्थानांनी कोटय़वधींची मदत नेहमीप्रमाणे केली आहे. मात्र संकटच एवढे मोठे आहे की ही प्रत्येक मदत अपुरीच पडते आहे.

कोरोना रुग्णांसाठी भव्य आणि सर्व सोयींनी युक्त रुग्णालयांची उभारणीदेखील मंदिर देवस्थानांनी केली आणि शासनाला एक प्रकारची मदत केली. जेव्हा मंदिरे उघडी होती तेव्हा काही बुद्धिजीवी देवच नाही, मंदिरात दान देण्यापेक्षा दवाखान्यात मदत करा असे डोस पाजत होते. परंतु या मंडळींनी कधी मंदिरात जाऊन दोन रुपयांचा हार घातला नाही किंवा चारआण्याची उदबत्ती लावली नाही. वास्तविक ज्या मंडळींनी कधी एक रुपयाही दानपेटीत टाकला नाही त्यांना असे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. अर्थात, अशी नैतिकता आज कोण पाळताना दिसत नाही. लॉक डाऊनमध्ये जवळजवळ सर्वजण घरीच आहेत. उद्योग-व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे रोजगार बुडाले आहेत. खरे तर आपली देवस्थाने अनेक वर्षांपासून लाखो लोकांना विविध स्वरूपात रोजगार देत होते. त्याचे महत्त्व आता लॉक डाऊनमध्ये मंदिरे बंद झाल्यावर समजले हेही नसे थोडके! मंदिरांमुळे लाखोंना विविध रूपांत वर्षानुवर्षे रोजगार मिळत होता. पुन्हा हा रोजगार सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना मिळत होता. आता मंदिरे बंद झाल्यामुळे फूल विक्रेते, फुले विकणारे शेतकरी, प्रसाद आणि इतर पूजा साहित्य विकणारे, खेळणी विक्रेते, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था पाहणारे, हॉटेल, टुरिस्ट तसेच लॉजिंगवाले, पुजारी, मंदिराच्या बाहेर भिक्षा मागून पोट भरणारे अशा लोकांची संख्या मोठी होती. अशा मंदिरांच्या जिवावर खूप लोक वर्षानुवर्षे उदरनिर्वाह करत आहेत. पण ही मंदिरेच कोरोनामुळे बंद झाली. त्यामुळे या सगळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आजही आपल्या राज्यात किंवा देशात बहुसंख्य गावे किंवा शहरे संपूर्णपणे मंदिरे, देवस्थानांवरच अवलंबून आहेत. तेथे स्वातंत्र्यानंतर उद्योगधंद्यांची निर्मिती झालेली नाही. आजही तेथील बहुतेक कुटुंबांचा उदरनिर्वाह मंदिरांवरच अवलंबून आहे. त्यामुळे देवच नसल्याने देवाची पूजा करण्यात आपला वेळ वाया घालू नका असे सांगणाऱ्य़ांनी आजपर्यंत तेथे ते औद्योगिकीकरण का करू शकले नाहीत याचेही उत्तर द्यावे. आजही देशातील अनेक गावे-शहरांच्या आर्थिक स्रोताचे मुख्य साधन मंदिरेच आहेत. मंदिरांना किंवा हिंदू धर्माला न मानणारे जेव्हा मंदिरे उघडण्याची मागणी करतात, त्यासाठी आंदोलने करतात त्यावरून आपल्या समाजासाठी मंदिरांचे धार्मिकच नाही, तर आर्थिक महत्त्वदेखील लक्षात येते.

आपली प्रतिक्रिया द्या