आरोग्यपूर्ण स्वयंपाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शमिका कुलकर्णी

स्वयंपाक आणि आरोग्य यांचा एकमेकांशी परस्परपूरक संबंध आहे. आपण जसे खातो तसे असतो. आरोग्यपूर्ण सकस, पौष्टिक आहार ही निरामय आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पण याचबरोबर घरातील अन्न हे कोणत्या भांड्यात शिजवले जाते हे पाहणेही खूप महत्त्वाचे असते. आज आपण सर्रास निर्लेपच्या भांड्याचा वापर करतो. पण पूर्वापार चालत आलेली धातूची भांडी आपल्या आरोग्यात भर घालत असतात. पाहूया आरोग्यपूर्ण धातूची भांडी…

मातीची भांडी

मातीची भांड्यांतून जेवल्याने शरीराला पोषक द्रव्ये मिळतात. त्यामुळे आजारपण दूर ठेवता येते. चांगल्या आरोग्यासाठी जेवण हळूहळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण शिजायला वेळ लागतो. पण त्यामुळे आरोग्याला फायदाच होतो. मातीच्या भांड्यात दूध गरम करणे, अन्न शिजवणे, पोळ्या व भाकऱ्या यांसाठी वापरणे योग्य असते. मातीच्या भांड्यांत जेवण केल्यास शंभर टक्के पोषक द्रव्ये शरीराला मिळतात.

लोखंडाची भांडी

लोखंडाची भांड्यात अन्न शिजवल्यास त्यातील लोह अन्नात उतरते व शरीराला मिळते. त्यामुळे अनेक रोग नाहीसे होतात. शरीलाला कुठेही आलेली सूज लोखंडी भांड्यात जेवल्याने कमी होऊ शकते. पंडुरोग आणि कावीळही त्यामुळे नाहीशी होते. या भांड्यांमध्ये जेवण शिजवले तरी त्या भांड्यात जेऊ नये. कारण लोह उष्णतेचे वाहक असल्यामुळे बुद्धी कमी होते. या भांड्यातून दूध प्यायला हरकत नाही.

तांब्याची भांडी

तांबे हा धातू उष्णतेचा वाहक आहे. यात पाणी साठवणे योग्य ठरते. यात पाणी ठेवलेले पाणी प्यायल्यास रक्त शुद्ध होते. स्मरणशक्ती तीव्र होते आणि यकृतासंबंधी आजार दूर होतात. या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहते. पण यात स्वयंपाक करताना आम्ल पदार्थांचा वापर करू नये. याबरोबरच याचा वापर दुधासाठी कधीच करू नये. शरीराला त्यामुळे नुकसान पोहोचते.

स्टीलची भांडी

या भांड्यांचा वापर स्वयंपाकासाठी व जेवणासाठी केला जातो. स्टीलची अन्नाबरोबर कोणतीही प्रक्रिया होत नसल्यामुळे यात अन्न वाटणे व शिजवणे किंवा साठवून ठेवणे योग्य ठरते. पण स्टीलच्या भांड्यामुळे जसे शरीराला काही नुकसान होत नाही तसा काही फायदाही होत नाही.

चांदीची भांडी

चांदीच्या भांड्यात जेवणे श्रीमंतीचं लक्षण तसेच आरोग्यदायी फायदेही आहेत. या भांड्यात जेवल्याने मेंदू तल्लख होतो. डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी चांगली होते आणि याबरोबरच पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रणात राहातो. चांदी शीतल असल्याने त्याच्या वापराने शरीराला थंडावा मिळतो. जेवणे शक्य झाले नाही तर चांदीच्या फुलपात्रातून पाणी प्यायले तरी फायदा होतो.

नॉन स्टीक भांडी

कमी तेल लागते म्हणून नॉनस्टीक भांड्यांचा वापर केला जातो, पण ही भांडी हानिकारक ठरतात. कारण त्यातील रासायनिक तत्त्वे अन्नात मिसळून शरीरात पसरतात.

कांस्य व पितळेची भांडी

पितळाच्या भांड्यात जेवण शिजवल्याने कमीत कमी पोषक तत्त्वे नष्ट होतात. त्याचबरोबर कास्याच्या ताटात जेवल्याने बुद्धी तल्लख होते. रक्त शुद्ध होते.पण या भांड्यात आम्ल पदार्थ ठेवू नयेत. कारण त्याच्या प्रक्रियेने ते पदार्थ आंबतात व खायला अयोग्य होतात.

अॅल्युमिनियमची भांडी

अॅल्युमिनियम बॉक्साईटपासून बनवले जाते. या भांड्यांमध्ये जेवण बनवल्याने शरीराला नुकसानच होते. अॅल्युमिनियम लोह व कॅल्शियम शोषून घेते त्यामुळे ते हानिकारक ठरते. हाडे कमजोर होतात. यकृताचे आजार होतात. अनेकदा अस्थमा, मधुमेह, क्षयरोग होतो. यात अन्न शिजवताना अन्नातील 87 टक्के पोषक तत्त्वे नष्ट हातात.

लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.