ठसा : विक्रम गोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

मराठी-हिंदी चित्रपट, मालिका व नाटकांतून चतुरस्र अभिनयाची स्वतंत्र मुद्रा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना चित्रपट क्षेत्रात बहुमोल योगदान दिल्याबद्दल चित्रभूषण पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे. येत्या 19 ऑगस्ट रोजी मुंबईत रवींद्र नाटय़ मंदिरात पुरस्काराचे वितरण होणार आहे. गोखले यांच्यासोबतच चित्रभूषण पुरस्कार भालचंद्र गोखले, लीला गांधी, सुषमा शिरोमणी, श्रीकांत धोंगडे, किशोर मिस्कीन यांनाही जाहीर झाला आहे, चित्रकर्मी पुरस्कारही चित्रपट क्षेत्रात योगदान देणाऱया मान्यवरांना जाहीर झाले आहेत. अभिनय – मग तो चित्रपटातील असो की मालिका, नाटकांतील असो – विक्रम गोखले तो सकस आणि दर्जेदारच करणाऱ त्या माध्यमात  वाटय़ाला आलेली भूमिका दमदार करणारच असा विश्वास रसिक प्रेक्षकांनाही असतो. पुण्यात जन्म झालेल्या गोखले यांना अभिनयाचे बाळकडूही आपल्याच घरात मिळत गेले. गोखले कुटुंबात पणजी दुर्गाबाई, आजी कमलाबाई आणि वडील चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले अशी अभिनयातील चौथी पिढी सर्वसुपरिचित आहे. भूमिकेचा सखोल अभ्यास, वक्तशीरपणा, शिस्त हे विक्रम गोखले यांचे गुण विशेष उल्लेखनीय समजले जातात. तिन्ही माध्यमांतील चतुरस्र कामगिरीप्रमाणेच गोखले यांचे लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातील योगदान लक्षणीय समजले जाते. कसदार अभिनयाने साकार केलेली नाटकं – एखादी तरी स्मितरेषा, के दिल अभी भरा नही, छुपे रुस्तम, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, खरं सांगायचे तर, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मीलनाचा, समोरच्या घरात, सरगम, स्वामी अशी कितीतरी त्यांनी भूमिका केलेली नाटकं रसिकांना भावली. बॅरिस्टर ही अशीच त्यांच्या भूमिकेची अजरामर नाटय़कृती होय. मॅरेथॉन, आधार, आघात, आम्ही बोलतो मराठी, कळत नकळत, ज्योतिबाचा नवस,  दरोडेखोर, दुसरी गोष्ट, दे दणादण, भिंगरी, नटसम्राट, महानंदा, माहेरची साडी, लपंडाव, वजीर, वऱहाडी आणि वाजंत्री, वासुदेव बळवंत फडके असे मराठी चित्रपट त्यांनी गाजवले. या चित्रपटातील वजीर, माहेरची साडी, ज्योतिबाचा नवस आणि नटसम्राट विशेष लक्षात राहिले. मराठीतील अनेक कलावंत हिंदीतसुद्धा चित्रपटसृष्टीत खूप लोकप्रिय ठरले. विक्रम गोखले हे त्यातील एक महत्त्वाचे कलावंत होत. सिद्धांत, अकेला, अग्निपथ, अधर्म, आंदोलन, इन्साफ, ईश्वर, कैद में है बुलबुल, खुदा गवाह, घर आया मेरा परदेसी, चॅम्पियन, जखमों का हिसाब, जय बाबा अमरनाथ, तुम बिन, थोडासा रुमानी हो जाय, परवाना, प्रेमबंधन, फलक, द स्काय, बदमाश, दुनिया, लाईफ पार्टनर, स्वर्ग-नरक असे विपुल हिंदी चित्रपट सांगता येतील. विक्रम गोखले यांनी हिंदी-मराठी चित्रपटांत वैशिष्टय़पूर्ण भूमिका साकारल्या आणि मालिकांचा छोटा पडदाही व्यापला. मोठय़ा पडद्यावरील हा कलावंत छोटय़ा पडद्यावरून घराघरांत पोहोचला. दूरदर्शनवरील मालिका अकबर-बिरबल, जीवनसाथी, अल्पविराम, उडान, कुछ खोया कुछ पाया, स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र त्याचप्रमाणे ‘या सुखांनो या’ यांसारख्या मालिका लोकप्रिय ठरल्या. ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी इरफान खानसोबत राष्ट्रीय पुरस्कार विभागून मिळाला. मराठी रंगभूमीवरील भरीव योगदानासाठी विष्णुदास भावे आणि हरिभाऊ साने जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत लक्षणीय कामगिरीसाठी बलराज साहनी पुरस्काराने सन्मान झाला, तर 2018 साली पुलोत्सव सन्मानाचे ते मानकरी ठरले. खरे तर चित्रपटाचे माध्यम असो, रंगभूमी असो नाहीतर मालिकांचे माध्यम असो, ही तिन्ही माध्यमे आणि त्यांचा श्रोता हा वेगळा असतो. तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांना नेमके काय हवे असते याची जाणीव मोजक्याच कलावंतांना असत़े विक्रम गोखले हे याबाबतीत आज महत्त्वाचे नाव आहे. साहित्याचे बहुश्रुत वाचन असल्यामुळे त्याचा लेखनासाठी उपयोग होत गेला आणि तिन्ही माध्यमांत काम केल्यामुळे दिग्दर्शन दृष्टीही विकसित होत गेली. कसदार अभिनय, दांडगे पाठांतर, भूमिकांचा सखोल अभ्यास, लेखन, वाचनाचा व्यासंग या सर्वच गुणविशेषांमुळे ते भूमिका जगत राहिले व भूमिका जगत असतात. हे सर्व करीत असतानाच त्यांनी शिस्त, वक्तशीरपणा ही तत्त्वे कायम पाळली. या तिन्ही क्षेत्रांतील त्यांचे योगदान भरीवच आहे. चित्रपटातील योगदानाचा सन्मान म्हणून मराठी चित्रपट महामंडळाने चित्रभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला आहे.