
>> प्रशांत गौतम
लेखक, समीक्षक आणि संपादक अशा तिहेरी भूमिकेतून साहित्य क्षेत्राला परिचित असलेले विलास खोले यांचे झालेले निधन धक्कादायकच होय. पुण्यात 5 डिसेंबर 1944 रोजी जन्मलेल्या खोले यांनी अखेरचा श्वासही पुण्यात घेतला. त्यांच्या निधनाने आस्वादक समीक्षेचा वस्तुपाठ घालून देणारे समीक्षक, व्यासंगी संपादक, चिंतनशील लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व साहित्य क्षेत्राने गमावले आहे. नूतन मराठी विद्यालय, ‘फर्ग्युसन’चे विद्यार्थी असलेल्या खोले यांनी सुरुवातीपासून शिक्षण क्षेत्रात चमक दाखवली. एम.ए. परीक्षेत सर्व विषयांत पहिल्या क्रमांकाने पारितोषिक मिळवले. कुलपतींच्या सुवर्णपदकांसह पुणे विद्यापीठातून घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाले.
‘शोकांतिकेची संकल्पना व काही मराठी नाटपं’ या विषयांवर त्यांनी 1980 साली पीएच.डी प्राप्त केली. तोच पीएच.डीचा ग्रंथ पुढील काळात ग्रंथरूपाने आला. खटाव येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 1968 च्या सुमारास अधिव्याख्याता म्हणून नोकरी केल्यानंतर 1975 च्या सुमारास श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागात विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. 31 डिसेंबर 2004 रोजी विद्यापीठाच्या मुंबई, पुणे येथील मराठी विभागप्रमुख, तसेच पुणे परिसरातील पदव्युत्तर अध्ययन व संशोधन विभागाचे प्रशासकीय समन्वयक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. विशेष म्हणजे खोले अनुदान आयोगाचे ए मिरीटस फेलो व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याचे सीनियर फेलो म्हणून कार्यरत होते. शिक्षण क्षेत्रातील भरीव व ठसठशीत कामगिरी असलेल्या खोले यांची साहित्य क्षेत्राला ओळख लेखक, समीक्षक, संपादक अशी होती. ‘शोकांतिकेचा उदय’, ‘बाप ज्ञानेश्वर’ ‘समाधिस्त’, ‘अमेरिका व्हाया लंडन’, ‘भक्तिशोभा’ ही साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. ‘ललित’ या वाङ्मयीन मासिकांत त्यांनी नोबेल पुरस्कारप्राप्त लेखिकांवर एक लेखमाला लिहिली होती. याच नावाचा एक ग्रंथ प्रकाशित झालेला आहे.
खोले हे व्यासंगी व बहुआयामी दृष्टी लाभलेले साक्षेपी संपादक होते. त्यांच्या संपादनातून अगस्तीचे अंगण (प्रभाकर पाध्ये) यांच्या साहित्याचे रेखा इनामदार यांच्यासोबतचे संपादन, तसेच स्त्री-पुरुष तुलना ताराबाई शिंदे लिखित पुस्तकाचे संपादन, विसाव्या शतकातील मराठी समीक्षा, अर्धशतकातील मराठी कादंबरी असे त्याचे संपादन क्षेत्रातील कार्य सांगता येईल. चौकट (स्त्रीयांच्या कथा), राजेंद्र बनहट्टी यांच्या दीर्घकथा, शांताराम कथा, दंडकारण्यातील प्रणयिनी, साने गुरुजींचे निवडक निबंध, आज्ञापत्र, लव्हाळीः काही दृष्टिक्षेप, महाराष्ट्रातील राजकारणाचे साहित्यातील बिंब, भक्तिगंगेच्या वाटेवर (हे. वि. इनामदार यांच्या सहकार्याने) आध्यात्म आणि विज्ञान, सूर्यबिंबचा शोधा वा. म. जोशी जीवनदृष्टी आणि विचार अशा महत्त्वपूर्ण ग्रंथांना खोले यांची प्रस्तावना लाभली. खाले यांनी विपुल प्रमाणात व्यक्ती चित्रणात्मक लेखन केले. विविध नियतकालिकांतून वैविध्यपूर्ण विषयांवर समीक्षालेखन केले. नाटक आणि रंगभूमी हा परिभाषा संग्रह त्यांनी नुकताच पूर्ण केला होता. ‘विभ्रम’ या पुस्तकातून त्यांनी मराठी कविता, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारांचा तौलणिक अभ्यास मांडला, तर ‘विलोभन’ या ग्रंथातून मौखिक वाङ्मय, कोषवाङ्मयपासून ते बेस्ट सेलरपर्यंत विविध साहित्य प्रवाहांचा मोठा पट मांडला.
गेल्या अर्धशतकातील कादंबरी, विसाव्या शतकातील समीक्षा चौकट, स्त्री कथांचे संपादन ही त्यांची महत्त्वपूर्ण साहित्य संपदा आजही साहित्य क्षेत्रातील जाणकारांसाठी महत्त्वाची समजली जाते. यात त्या-त्या प्रांतांचा एकूणच विस्तृत पट वाचकांसमोर येत जातो. त्यांच्या विविध साहित्य संपदेस राज्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन यासारखे महत्त्वाचे पुरस्कार लाभले. लेखनाची स्वतंत्र वाटचाल करीत असताना समीक्षा, संपादन क्षेत्रात त्यांनी केलेली भरीव कामगिरी महत्त्वपूर्ण अशीच आहे. त्यांच्या निधनाने आपण एक व्यासंगी लेखक, साक्षेपी संपादक, समीक्षक गमावला आहे.

























































