
>> मेधा पालकर
महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी आयुष्य वेचलेले, आंतरधर्मीय विवाह चळवळीतील अग्रणी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.विलास वाघ यांचे नुकतेच निधन झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मागोवा घेत त्यांनी स्वतःला समाज प्रबोधनाच्या चळवळीत झोकून दिले होते. खान्देशातील धुळे जिह्यातील मोराणे हे त्यांचे मूळ गाव.
1 मार्च 1939 साली मोराने येथे जन्मलेल्या वाघ सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धुळे जिह्यातच झाले. 1958 ते 62 या काळात पुण्यातील स. प. महाविद्यालयात त्यांनी बी.एससी. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. कोकणातील नरडवणे गावात जून 1962 पासून त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 1964 ते 1980 पुण्यातील अशोक विद्यालयात अध्यापनाचे काम केले. महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात त्यांनी 1972 मध्ये पुण्यात सुगावा प्रकाशन सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे. 1981 साली बीएड उत्तीर्ण झाले. नंतर पुणे विद्यापीठात रुजू झाले. 1983 साली पुणे विद्यापीठातील प्रा. उषा वाघ यांच्याशी त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. 1986 साली पुणे विद्यापीठातील नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला. 1964 ते 1980 या काळात पुण्यातील वडारवाडी या उपेक्षित भागात त्यांनी बालवाडी सुरू केली.
सर्वेषा सेवा संघामार्फत देवदासींच्या मुलामुलींसाठी त्यांनी पहिले वसतिगृह सुरू केले. राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे ते एक वर्ष ते अध्यक्ष होते. 1972 साली समता शिक्षण संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी तळेगाव ढमढेरे येथे कस्तुरबा मुलींचे वसतिगृह सुरू केले. तेथेच 1978 साली भटक्या विमुक्त जमातीच्या मुलामुलींसाठी आश्रमशाळा सुरू केली. 1994 साली आपल्या जन्मगावी मोराणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल वर्क कॉलेज सुरू केले. सिद्धार्थ सहकारी बँकेच्या स्थापनेत पुढाकार घेणारे वाघ त्या बँकेचे दोनदा चेअरमन होते. 1974 पासून ‘सुगावा’ नावाचे वैचारिक नियतकालिक त्यांनी सुरू केले. ‘समाज प्रबोधन’ मासिकाचे ते पदाधिकारी होते.
पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट, परिवर्तन मिश्र विवाह संस्था अशा अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांनी पुणे जिह्यात एका गावात सामुदायिक शेतीचा प्रयोग केला होता. प्रा. वाघ यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावले. वेळप्रसंगी पोलीस स्टेशन आणि न्यायालयातही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. यासाठी त्यांना सहचारिणी उषा वाघ यांची खंबीर साथ मिळाली. हे दांपत्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होते, परंतु सामाजिक कार्यासाठी दोघांनीही एकाच दिवशी विचारपूर्वक निर्णय घेऊन नोकरी सोडली आणि फर्ग्युसन कॉलेजसमोरच्या झोपडपट्टीत राहायला आले. सन 1978 पासून त्यांनी या झोपडपट्टीत काम करायला सुरुवात केली होती.
वडार समाजातील मुलांसाठी बालवाडी चालवली. देवदासींच्या मुलांसाठी वसतिगृह चालवले. रेड लाइट भागातील महिलांची मुलं गोळा करून त्यांना शाळेत घातले. पुण्यातील सदाशिव पेठेत आंबेडकरी विचारांचे ‘सुगावा प्रकाशन’ त्यांनी सुरू केले. आज ‘सुगावा प्रकाशना’चा दीपस्तंभ मोठय़ा दिमाखात उभा आहे. ‘सुगावा’चे पहिले पुस्तक ‘माझा अण्णाभाऊ साठे’, तर दुसरे पुस्तक रावसाहेब कसबे यांचे ‘आंबेडकर आणि मार्क्स’ हे होते. त्यानंतर अनेक दलित लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जल नियोजन याविषयी मांडलेल्या विचारांचे डॉ. सुखदेव थोरात यांनी लिहिलेले पुस्तक वाचण्यासारखे आहे. देशाच्या पाणि नियोजन विकासात बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान आहे. विचारवंत गं. बा. सरदार यांचे ‘गांधी आणि आंबेडकर’ हेही ‘सुगावा’चे पुस्तक अभ्यासकांना अनमोल आहे. कॉम्रेड शरद पाटील यांचे ‘मार्क्सवाद आणि फुले-आंबेडकरवाद’, ‘दासशूद्रांची गुलामगिरी’, ‘अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ आदी ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. ‘‘मी सेवादलात वाढलो, समाजवाद्यांत वावरलो, हे सारे खरे आहे; पण मूलतः मी आंबेडकरवादी आहे’’, असे ते म्हणत.
आंबेडकर विचारांचे पाईक असलेले वाघ प्रबोधनाच्या चळवळीतील मैलाचा दगड म्हणून ओळखले जातील. प्रा. विलास वाघ यांना 69 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आळंदी येथे यशस्वी प्रकाशक म्हणून पुरस्कार मिळाला. दलित साहित्य अकादमी, नवी दिल्लीची डॉक्टर आंबेडकर फेलोशिप, दलित मुक्त विद्यापीठ, गुंटूर, आंध्र प्रदेशची डॉक्टर आंबेडकर फेलोशिप त्यांना मिळाली. महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा समाज प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार, लोक कैवारी पुरस्कार, आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, कॅनडा यांचा ‘सुगावा’ मासिकाला पुरस्कार, प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विपु भागवत पुरस्कार, दादासाहेब रुपवते फाऊंडेशनचा समाजभूषण पुरस्कार, दया पवार स्मृती पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार, आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगाव यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित अस्मिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.





























































