विराटच्या बॅटची मनमानी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

खरं तर मी टी 20 मालिकेवर सर्व सामने संपल्यावर लिहिणार होतो.

कसोटीची गोष्ट वेगळी असते. ती शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमासारखी असते. टी 20 म्हणजे कॅब्रे किंवा आजच्या भाषेत आयटेम डान्स. प्रत्येक मॅचनंतर कशाला हवंय रसग्रहण?

पण दोन गोष्टींमुळे मला लिहावंस वाटलं.

दोन्ही विराटशी संबंधित.

एक त्याने कालच्या हरलेल्या सामन्यात अफलातून खेळी केली आणि दुसरं म्हणजे त्याची संघाची निवड.

त्याने सूर्यकुमार याला का वगळलं?

रोहितला घ्यायचंय म्हणून असं उत्तर येईल. अजून हिंदुस्थानात बार्टर सिस्टीम अस्तित्वात आहे का? मुंबईच्या एका खेळाडूला घेताना दुसऱयाला का वगळावं?

अरे त्याला मागच्या सामन्यात फलंदाजीसुद्धा मिळाली नव्हती. ग्लास तोडायची संधी नाही तरी डच्चू? काय वाटलं असेल त्याला? वर तीन शून्य ‘बाजीरावाचं’ कौतुकसुद्धा केलं. राहुल मलाही आवडतो. पण तो आज अपयशी ठरतोय. त्याला द्या किंचित विश्रांती. आयपीएलमधला सूर्यकुमारने विराटला दिलेला अमिताभचा ‘दिवार’ लूक त्याला नडत नाही ना? विराटची ही मनमानी मला पटली नाही.

पण बॅटची मनमानी आवडली. त्याने शेवटच्या पाच-सात ओव्हरमध्ये जी मनमानी केली त्याने मी दिङ्मूड झालो. त्या खेळीत खेळलेल्या फटक्याने झालो. त्याच्या हुशार फलंदाजीने झालो. तो गोलंदाज आणि कर्णधार  यांच्याबरोबर जो बुद्धिबळ खेळला त्याने झालो.

एका बाजूने बळी जात असताना त्याने पहिल्या 28 धावा 29 चेंडूंत केल्या. कुठल्याही फॉरमॅटमध्ये त्याची सुरुवात तशीच असते. मग तो गियर बदलतो आणि त्याची गाडी कुणी रोखू शकत नाही. इथेही इंग्लंडने हात टेकले.

टी-20 मध्ये 15 ओवर्समध्ये 5 बाद 87 ही धावसंख्या दारिद्रय़रेषेखालील. तिथून त्याने धावसंख्येला किमान उच्च मध्यमवर्गीय केलं. पुढच्या  स्वतःच्या 49 धावा त्याने 17 चेंडूंत काढल्या. हा फक्त झंझावात नव्हता. ही बुद्धिमान फलंदाजी होती. टी-20 मध्ये आता काही गोष्टी चटकन ओळखता येतात. पण इथे त्याने अशी फलंदाजी केली की गोलंदाज त्याला पुढचा चेंडू कुठला टाकणार ते आधीच सांगतायत. क्षेत्ररचना त्याच्या डोक्यात असायची, त्यातला बदल तो टीपकागदासारखा टिपत असे. मोठय़ा मैदानावर उसळते चेंडू मारताना सीमारेषेवर झेल जायची शक्यता असते. पण विराटने मारलेला फटका सीमारेषा ठाऊक असल्याप्रमाणे वागायचा. त्याने वूडच्या एका ओव्हरमध्ये 16 धावा घेतल्या. वूडच्या मनात काय चालू आहे हे त्याने अचूक ओळखलं होतं.

त्याने मारलेला एक पूल अजून अंगावर शिरशिरी आणतो. तो ऑफस्टंपबाहेर चेंडूची वाट पाहत उभा होता. ताशी 147 किलोमीटर वेग होता त्या चेंडूचा. सर्वोच्च दर्जा तिथे दिसतो. अहमदाबादचे गवतही शहारले असेल त्या फटक्यांची पालखी वाहताना. आणि नंतर पुढचा चेंडू कुठे येणार हे त्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान नव्हतंच. ‘तू कशाला माझ्याकडे यायची तसदी घेतोस मीच तुझ्याकडे येतो’ म्हणत विराट त्याच्याकडे गेला आणि तो रॉबिनहूडच्या बाणाप्रमाणे सरळ गेला.

हरलेल्या मॅचवर विराटची खेळी हा उतारा होता.