मुद्दा – वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. हर्षवर्धन कांबळे

महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालय सेवेतील वैद्यकीय अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय हा विषय सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या कर्मचारी वर्गाचे सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्न वर्षे आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी यांचादेखील समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्र सर्वात जास्त जीवनावश्यक बाबीमध्ये मोडते यात शंकाच नाही. ‘जान है तो जहान हैं’ असे म्हणतातच ना!

वाढती लोकसंख्या, वाढते आरोग्याचे प्रश्न, महाग खाजगी आरोग्य यंत्रणा आणि मर्यादित असणाऱ्या शासकीय आरोग्य सेवा लक्षात घेता अधिकाधिक वैद्यकीय अधिकारी सेवेत असणे गरजेचे आहे, ही अपेक्षा लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी यांना केवळ अठ्ठावन्न वर्षांत घरी पाठवणे कितपत योग्य आहे? सेवानिवृत्त झालेला मेडिकल ऑफिसर आपला छोटा-मोठा खासगी दवाखाना टाकून रुग्ण सेवा आयुष्यातून निवृत्त होईपर्यंत देतोच. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवा अभियानांतर्गत मेडिकल ऑफिसर म्हणून वयाच्या पासष्ट वर्षांपर्यंत अर्ज करता येतो, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणासारख्या जवळपास सर्वच राज्यांत मेडिकल ऑफिसरचे सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्न नाहीतर साठ किंवा त्यापुढचे वय आहे. केवळ आपलेच राज्य मात्र अठ्ठावन्न वर का अडकून पडले आहे? हा एक प्रश्न आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्न करण्याचा निर्णय दिला आहे. कोरोना विषाणूच्या दोन तीव्र लाटांचा सामना करण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेऊन वय साठ आणि साठ अधिक दोन असे करण्यात आले होते. या निर्णयाच्या विरोधात बीड जिह्यातील काही लोक कोर्टात गेले आणि हा निर्णय कळाला. आरोग्य सेवा अधिक भक्कमपणे आणि सर्वदूर पोहोचवायची इच्छा असेल तर मेडिकल ऑफिसर म्हणून साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत सेवा करवून घ्यावी. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात तसा विशेष प्रस्ताव मांडून पारीत करून घ्यावा. निश्चितपणे याचा लाभ चांदा ते बांदा आणि आमगाव ते इचलकरंजीपर्यंत सर्वांना होईल.