लेख : थेंब थेंब पाण्यासाठी…

rain

>> दिलीप जोशी (khagoldilip@gmail.com)

सूर्य थेट डोक्यावर आलाय. मे महिन्यात तो महाराष्ट्रात असाच तळपतो. आता जूनमध्ये 21 तारखेला दक्षिणायन सुरू झालं की, तो पुन्हा एकदा डोक्यावर येईल, परंतु त्यावेळी त्याच्या चटक्यांपासून बचाव करण्यासाठी निसर्गानेच मेघांची छत्री निर्माण केलेली असेल. ‘एल निनो’ वगैरेचा विपरीत परिणाम झाला नाही तर यंदा पाऊस बरा होईल म्हणतात. हवामान खात्याचे अंदाज डॉ. गोवारीकरांच्या पावसाच्या मॉडेलपासून मार्गदर्शक ठरायला लागलेत. गेल्या वर्षी जायकवाडी धरण पूर्णपणे भरल्याची बातमी होती, पण इतका पाऊस होऊनही जलसमृद्धी का नाही? सरकारी आणि बिगरसरकारी असे जलसाक्षरतेचे प्रयत्न सुरू आहेत. एक तरुण मित्र आपल्या मित्रांसह पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सक्रियतेने सहभागी झाला. दीडेक फूट पार खणायची कधीच सवय नसल्याने आणि ऑफिसात कायम ‘एसी’त राहण्याची सवय लागल्याने दोन दिवस सर्वांग दुखत होतं म्हणाला, परंतु आपण  जे काम केलं आणि ज्या खेडय़ातल्या माणसांशी ‘कनेक्ट’ झालो याचा त्याला अधिक आनंद झाला होता. पुढच्या वर्षी पुन्हा नक्कीच जाणार आहे असे त्याने ठामपणे सांगितले.

पाण्यासाठी वणवण करणाऱ्यांची दृश्य पाहिली की, ‘पाणी’ ही किती मोलाची गोष्ट आहे ते कळतं. शहरी भागातल्या पाण्याच्या अपव्ययाविषयी हळूहळू जागृती होतेय आणि त्या मोहिमेत तरुणाई भाग घेतेय ही समाधानाची गोष्ट आहे. वरुण राजाची कृपा महाराष्ट्रावर वेळेवर होवो आणि राज्य लवकरच ‘सुजलाम, सुफलाम’ होवो असंच कोणीही म्हणेल.

गेल्या दोन-तीन दशकांत पाण्याचा प्रश्न जगभरच बिकट बनत चाललाय. उन्हाळा नकोसा वाटतोय, पण एकेकाळी उन्हाळय़ाची सुट्टी आनंददायी असायची. दुपारी कडक ऊन असलं तरी जवळपास दाट सावली देणारी झाडं असायची. आमच्या राजावाडीतच चिंचेची दहा-बारा डेरेदार झाडं होती. सगळी दुपार त्याखाली जायची. चिंचेचा कोवळा पाला, फुलं आणि गाभुळलेल्या चिंचा ही सार्वजनिक मालमत्ता. त्यातही त्यावर जास्त हक्क मुलांचा. ‘फार चिंचा खाऊ नका’ असं घरून कितीही सांगितलं गेलं तरी गुपचूप मिठाची पुडी खिशात टाकून झाडावरून पाडलेल्या चिंचा नि कैऱ्या खाण्याची रंगत काही और असायची. मुंबईसारख्या शहरातच ठायी-ठायी मोठमोठय़ा, खोड दोन जणांच्या कवेत मावणार नाही अशा झाडांची आरास होती.

आज गलिच्छ झालेल्या आणि स्वच्छ करण्याचे संकल्प ‘ऐकणाऱ्या’ मिठी नदीला एकेकाळी स्वच्छ पाणी होतं. शहरातले नालेसुद्धा स्वच्छ झुळझुळ पाणी वाहणारे बारमाही निर्झर होते. अशा ओहळात छोटे मासे पकडायला जाणं हा सुट्टीतला आमचा आणखी एक उद्योग असायचा.

मुंबईत असूनही वनस्पतींचं वैविध्य असलेल्या वस्तीत राहायला मिळावं हे भाग्यच. तशी चेंबूर, दादर, परळ भागातही वनश्री होती. घाटकोपरचा डोंगर हिरवागार असायचा. तो पार करत ‘बॉम्बे वॉटर वर्क्स’ची डिझेलवर चालणारी ट्रॉली जायची. इंग्रजांच्या काळातील पाणीपुरवठय़ाच्या या दुहेरी जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी (मेन्टेनन्स) स्मॉल गेज रेल्वेलाइन होती. तिचे अवशेष आजही आमच्या राजावाडीत दिसतात. (नंतर तिथे टॉय ट्रेन आली.) मुंबईच्या पाणीपुरवठय़ाकडे ब्रिटिश काळापासून खूप लक्ष दिलं गेलं. आता मात्र त्या तलावांच्या परिसरातल्या लोकांना उन्हाळय़ात पाणीटंचाईला तोंड द्यावं लागतं अशी परिस्थिती उद्भवते.

चार दशकांपूर्वीची लोकसंख्या तुलनेने कमी होती. मुंबई बेटावरच अनेक विहिरी-तळी होती तर बाहेरच्या ग्रामीण भागात बारमाही वाहत्या नद्या होत्या. पाण्याचा वारेमाप उपसा होत नव्हता. उन्हाळय़ात पाण्याची चणचण भासायची, पण आताइतकी भीषण नव्हती. वस्ती कमी असल्याने हिरवाई भरपूर होती. अंबरनाथ, बदलापूर ही टेकडय़ांची गावं. तिथे कुणाकडे सुट्टीला गेलं की, जवळच्याच टेकडय़ांवर पसरलेल्या करवंदांच्या जाळय़ा खुणावायच्या. काटे टोचण्याची पर्वा न करता करवंदं आणि कोणीतरी झाडावर चढून जांभूळ काढण्यातला आनंद अवर्णनीय होता. करवंदांचा चिक आणि जांभळांच्या डागांनी कपडे रंगायचे. या न जाणाऱ्या डागांबद्दल घरून तंबी मिळायची, पण हुडपणाच्या त्या काळात सारं ऐकून न ऐकल्यासारखं करत हा रानमेवा चाखण्याची ओढ लागायची.

ऊन पिऊन फुललेला आणि घमघमणारा सोनचाफा, पळसाची लालेलाल फुलं, गुलमोहराच्या फुलांचे विशाल गुच्छ आणि सावर, पांगाऱ्याच्या फुलांची त्यात भर. सारा आसमंत रंगीन झालेला असायचा. कैरीचं पन्हं, कोकम सरबत, ताक वगैरे गोष्टी अगदी गड-किल्ल्यांवही मिळायच्या. उन्हाळी ट्रेकसुद्धा सुखद वाटायचे. माणसांच्या वस्तीपासून जरा दूर जाऊन निसर्गाशी ‘संवाद’ साधण्याचा हा मोसम. अभ्यासाचं टेन्शन नसलेला ‘अभ्यास’ नकळत व्हायचा. अनेक पाना-फुलांची-फळांची ओळख व्हायची. कोकिळकुजन कानी आलं की, झाडात दडलेला कोकिळ शोधण्याची स्पर्धा लागायची. गरम वारे सुटायचेच, पण वाळवंटात ‘लू’ असते इतके ते त्रासदायक नसायचे.

… पण गेल्या काही वर्षांत सारं बदललं. माणूस बदलला, निसर्ग बदलला, प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगचा फटका साऱ्या जगालाच बसला. ऋतुचक्राचा आस खिळखिळा झाला. अवकाळी पाऊस, गारपीट किंवा थेंबभरही पाणी न देणारा किंवा पिकं वाहून नेणारा ओला-सुका दुष्काळ याची आवर्तनं सुरू झाली. जीवनावश्यक असलेलं पाणीच नसेल तर हिरवाई कुठली आणि उदंड रानमेवा कुठला? सगळय़ालाच उतरती कळा लागली.

… पण यावरही प्रयत्नपूर्वक मात करता येईल. त्यासाठी हजारो हात राबतायत. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असं खऱ्या अर्थाने वाटणाऱ्यांनी हे नवं आक्राळविक्राळ आव्हान स्वीकारलंय. भूजलाची पातळी वाढवणं आणि पाणीसाठे भरून राहतील असं नियोजन करताना ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणी वेळेआधीच बाष्पीभूत होतंय. या सगळय़ाचा विचार आणि लगेच कृती करावी लागेल. हे सर्वांचं काम आहे. आपणही आपला खारीचा वाटा उचलायलाच हवा. तरच उद्या ‘सुजलाम सुफलाम्’ होईल. पुढच्या पिढय़ांसाठी हा ग्रह संपन्न ठेवणं आपलं वैश्विक कर्तव्य आहे. ‘हिरवळ आणि पाणी’ असेल तिथेच आनंदाची गाणी स्फुरतील. ‘ये रे ये रे पावसा’ असं मनापासून म्हणूया.