विदर्भ-मराठवाडय़ात कृत्रिम पावसाची तयारी: विमान उड्डाणासाठी केंद्र सरकारकडे परवानगी

179

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईसह कोकणात व नाशिकमध्ये नद्या व धरणे दुथडी भरून वाहू लागल्याचे चित्र सध्या असले तरी संपूर्ण राज्यात आजच्या तारखेपर्यंत सरासरी 85 टक्केच पाऊस झाला आहे. सध्या सोलापूरसह विदर्भ- मराठवाडय़ात तर सरासरी 50 टक्केच पाऊस झाला आहे. या भागात पावसाने दिलेली ओढ लक्षात घेता राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ख्याती या कंपनीला कंत्राट दिले आहे.

राज्यावरचे दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी राज्य सरकारने 30 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली आहे. पण दरम्यानच्या काळात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची वेळ येणार नाही अशी अटकळ बांधण्यात आली होती. पण मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर वगळता मराठवाडा- विदर्भात अजूनही सरासरी पन्नास टक्केच पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे. या भागासह अन्य काही भागांतील अपुरे पर्जन्यमान लक्षात घेता राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी पुढे सुरू ठेवली आहे. मागील वर्षी 11 जुलै रोजीपर्यंतच्या नोंदीनुसार राज्यात 106 टक्के पाऊस झाला होता, पण तरीही राज्यात राज्यात दुष्काळ पडला होता. सध्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असली तरी दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी अजून पावसाची आवश्यकता आहे.

संभाजीनगरला विमान तैनात
राज्यातील मराठवाडा, विदर्भ व इतर भागांत क्लाऊड सीडिंगच्या माध्यमातून पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी संभाजीनगर येथे सी बॅण्ड डॉप्लर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे.

परवानग्यांसाठी अर्ज
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानाची आवश्यकता असते. हे विमान, वैमानिक, रडार व उपकरणे परदेशातून येतात. त्यामुळे विमान उड्डाण करण्यापूर्वी नागरी हवाई उड्डाण विभागाची तसेच उपकरणे परदेशातून आणण्यापूर्वी कस्टम विभागाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे या परवानग्या मिळवण्यासाठी संबंधित खात्यांकडे अर्ज केले आहेत. या सर्व परवानग्या आल्यावर जुलैअखेरीपर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमान व यंत्रणा महाराष्ट्रात येईल. त्यानंतरही पुरेसा पाऊस न झाल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी हवेत झेपावू शकेल अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या