
>> डॉ. सच्चिदानंद शेवडे
बहुधा 2004 अथवा 2005 या वर्षातली गोष्ट. नेहमीप्रमाणे मी श्रवणयोग या संस्थेतर्फे अंदमान यात्रेला निघालो होतो. त्या वेळेला सोबत डॉ. वेणीमाधव उपासनी सपत्नीक होते. विमानामध्ये व्याख्यान देण्याचे मी आधीच ठरवले होते. त्यानुसार आत पायलटची परवानगी घेऊन झाली होती.
जागेवर उभे राहूनच बोलणे, माईक न वापरणे, घोषणा न देणे अशा बऱयाच काही गोष्टी त्याने सांगितल्या. ते सगळे मान्य करून मी जागेवर उभे राहूनच सावरकरांवरील व्याख्यानाला सुरुवात केली. ‘अरे, विमानात व्याख्यान देणे ही ऐतिहासिक गोष्ट आहे. याचे रेकॉर्डिंग व्हायलाच पाहिजे.’ असे म्हणत घाईने डॉक्टरांनी त्यांच्या बॅगमधून व्हिडीओ कॅमेरा बाहेर काढला आणि माझ्या त्या विमानामधल्या व्याख्यानाचे स्वतःच शूटिंग करून घेतले. पुढे अंदमानमध्ये आम्ही सोबतच होतो.
26 फेब्रुवारीला म्हणजे सावरकर आत्मार्पण दिनी माझ्या ‘प्रहार’ या पुस्तकाचे प्रकाशन सावरकर सेल्युलर तुरुंगात डॉक्टरांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉक्टरांना खूप आग्रह केला म्हणून ते चार शब्द तरी बोलले. अन्यथा पूर्ण यात्राभर त्यांनी माझ्याकडून ‘सावरकर चरित्रकथन’ लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि म्हणाले की, ‘मी तुझे ऐकायला आलेलो आहे, त्यामुळे या यात्रेत मी काहीच बोलणार नाही.’ खरे तर मी त्यांच्यापेक्षा वयाने, मानाने आणि अधिकाराने सर्वथैव कनिष्ठ असूनही त्यांनी असे सांगणे हा त्यांचा मोठेपणा होता. संपूर्ण यात्राभर ते बोलल्यानुसारच वागले. मोठय़ा माणसांचे मोठेपण हे त्यांच्या कृतीतून दिसत असते असे जे म्हटले जाते ते प्रत्ययाला आले.
डॉ. वेणीमाधव उपासनी यांचे शालेय शिक्षण धुळे जिह्यातील निजामपूर, शिंदखेडा आणि जळगाव आदी ठिकाणी झाले. पुढे वैद्यकीय शिक्षण मुंबई, पुणे आदी ठिकाणी झाल्यानंतर साठच्या दशकात त्यांनी डोंबिवलीमध्ये आपल्या वैद्यकीय सेवेची सुरुवात केली होती. लवकरच एक यशस्वी चिकित्सक म्हणून त्यांची ख्याती झाली. डोंबिवली येथे इंदिरा रुग्णालय स्थापून वैद्यकीय व्यवसायासोबत कुलपरंपरेनुसार कीर्तन-प्रवचन सेवेचे व्रत त्यांनी आचरले हे विशेष. अखिल भारतीय कीर्तनकुलाचे ते कुलप्रमुख झाले. लोकांना वैद्यकीय उपचारांसोबत आध्यात्मिक मार्गदर्शनही करू लागले.
भागवत कथा, ज्ञानेश्वरी आदी विषयांवर कीर्तन व प्रवचने करीत त्यांनी देश-विदेशात अनेकांचे प्रबोधन केले. त्याचप्रमाणे दूरदर्शन, आकाशवाणी यासारख्या माध्यमातूनही त्यांनी कार्यक्रम केले. सोपी भाषा आणि नेमके दृष्टांत यामुळे लवकरच ते ख्यातनाम झाले. गावोगावी कार्यक्रम करणे व रुग्णालय सांभाळणे अशी कसरत सुरू झाली. पुढे त्यांचे सुपुत्र डॉक्टर झाल्यावर काही काळात त्यांनी रुग्णालयाची संपूर्ण धुरा त्याच्यावर सोपवली. डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान, पेंढरकर महाविद्यालयासह अनेक संस्थांच्या विश्वस्त वा मार्गदर्शकाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. डोंबिवली भूषण, धन्वंतरी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.
सुखार्थः सर्व भूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः।
सुखं च न विना धर्मात् तस्मात् धर्मपरो भवेत्।
सर्व भूतमात्रांची प्रवृत्ती सुख मिळण्याकडे असते. धर्माचरणाशिवाय सुख मिळत नाही. म्हणून ज्याला सुख हवे त्याने धर्मप्रवृत्त असायला हवे. हे लक्षात ठेवून त्यांनी वानप्रस्थ स्वीकारला. त्यानंतर काही वर्षांपूर्वी फुलगाव येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडून चतुर्थाश्रमाची दीक्षा घेतली. त्यानंतर ते अच्युतानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. आता कीर्तने बंद झाली, परंतु प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनाचे कार्य चालू ठेवले.
जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात, असे गीतरामायणात म्हटले आहे. जन्माला येणारा प्रत्येक जण परतीचे तिकीट घेऊन आला आहे, हे ठाऊक असूनही कोणाच्याही मृत्यूमुळे दुःख होणे हा मानवी स्वभाव आहे. इथे तर कीर्तन-प्रवचन या माध्यमातून तळमळीने अथक परिश्रम घेत योगदान देणारा एक व्यासंगी हरपला. याच्या वेदना प्रखर आहेत.





























































