
कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. जतमधील 40 गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याच ठराव केला आहे. त्यामुळे या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले आहेत. त्यावर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया भाजपवर टीका केली आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारकडून काहीसी दिरंगाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होताच सीमाप्रश्नाकडे लक्ष दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर हेच बोम्मई म्हणाले होते की, छोटीमोठी घटना आहे. तेव्हा सुद्धा भाजपाच्या आमदार खासदारांची तोंडं बंद होती. यांना महाराष्ट्राबद्दल कधीच अस्मिता नव्हती, अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, लोकसभेत आठ वर्षांपासून मी हा प्रश्न शिवसेनेचा खासदार म्हणून मांडत असताना, भाजपाचे लोकसभेतील खासदार पळून जातात. मी हा मुद्दा मांडायला सुरुवात केली की, कर्नाटकातील भाजपाचे खासदार उभा राहतात आणि मग शिवसेनेचे खासदारही उभा राहतात, पण भाजपाचे महाराष्ट्रातील खासदार कुठे असतात? त्यामुळे हे सगळं वरवर दाखवण्याचं त्यांच ढोंग आहे. दरवर्षी केवळ औपचारिकता म्हणून अर्थसंकल्पाच्या भाषणात शेवटी सीमाप्रश्न मांडला जातो. मूळ प्रश्नांना बगल देण्यात भाजपा तरबेज आहेत, म्हणून त्यांनी जतचा विषय काढला. बेळगाव कर्नाटकात राहीलं काय आणि महाराष्ट्रात राहीलं काय अशी भूमिका मांडणारी भाजपा आहे, अशी सणसणीत टीका सावंत यांनी केली आहे.



























































