तुम्हाला मुसलमानांना दुय्यम दर्जा द्यायचा आहे, ओवेसींची भागवतांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर हिंदुस्थानी मुसलमानांबद्दल केलेल्या विधानावरून टीका केली आहे. देशातील मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिकत्व तुम्हाला द्यायचे आहे असा शब्दांत ओवेसी यांनी भागवत यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधला.

मोहन भागवत यांनी ‘विवेक’ साप्ताहिकाला शुक्रवारी मुलाखत दिली होती. ‘हिंदुस्थानी मुस्लिम सर्वाधिक समाधानी आहेत. एखाद्या देशावर राज्य करणारा विदेशी धर्म अजूनही अस्तित्वात आहे असे उदाहरण फक्त हिंदुस्थानात बघायला मिळते. हिंदुस्थानने अन्य धर्मिय अनुयायांना हक्क दिले तसे पाकिस्तानने दिले नाहीत. त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला.’ असे भागवत यांनी त्या मुलाखतीत म्हटले होते.

भागवत यांच्या या मुलाखतीवरूनच ओवेसी यांनी ट्विटरवरून टीका केली आहे. ‘मुस्लिमांच्या आनंदाचे परिमाण काय आहे? भागवत नावाचा माणूस आपल्याला कायम हेच सांगत असतो की बहुसंख्यांकांबाबत आपण कायम पृतज्ञ राहिले पाहिजे. मात्र राज्यघटनेने दिलेल्या आत्मसन्मानाचा आदर केला जातो की नाही हे आमच्या आनंदाचे परिमाण आहे. कारण तुमच्या विचारसरणीला देशात मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिकत्व द्यायचे आहे. आमच्या स्वतःच्या देशात आम्ही बहुसंख्यांकांबाबत कृतज्ञ राहिले पाहिजे हे मला तुमच्याकडून ऐकण्याची गरज नाही. असे ट्विट ओवेसी यांनी केले आहे.