ओवेसी भाजपचे ‘चाचाजान’, राकेश टिकैत यांची भाजपसोबत एमआयएमवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
owais

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शाब्दीक युद्धाला धार चढायला सुरुवात झाली आहे. तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांना उद्देशून अब्बाजान असा शब्द वापरला होता. हाच धागा पकडत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी असदुद्दीन ओवेसी हे भाजपचे चाचाजान असल्याची टीका केली आहे. हापुड इथे झालेल्या एका सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. टिकैत हे उत्तर प्रदेशातील विविध भागात जाऊन शेतकरी मेळावे घेत आहेत. यातल्याच एका मेळाव्यात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

जाहीर सभेत बोलताना टिकैत म्हणाले की भाजपचे चाचाजान ओसेवी आता उत्तर प्रदेशात आले आहेत. त्यांनी भाजपला शिव्या दिल्या तर त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होत नाही, कारण भाजप आणि ते एकाच टीममधले आहेत.

टिकैत यांच्या टीकेमुळे एमआयएम संतापली

राकेश टिकैत यांच्या या टिकेला AIMIM चे प्रवक्ते असीम वकार यांनी उत्तर दिलं आहे. टिकैत किती धर्मनिरपेक्ष आहेत हे आम्हाला माहिती आहे. 2017 आणि 2019 च्या निवडणुकीत यांनी भाजपसाठी काम केलं होतं. असं वकार यांनी म्हटलं आहे. जेव्हा मुझफ्फरनगरध्ये दंगल झाली होती तेव्हा टिकैत कुठे होते असा सवालही त्यांनी विचारला आहे.

टिकैत शेतकरी आंदोलनाद्वारे राजकीय जीवनात येण्याची धडपड करतायत-भाजप

भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी म्हटलंय की टिकैत यापूर्वी अनेकदा राजकारणात आपलं नशीब आजमावून पाहिलं आहे, मात्र त्यांना दरवेळी त्यांच्या हाती निराशा आली आहे. जितकेवेळा त्यांनी निवडणूक लढवली तितकेवेळा त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली टिकैत हे राजकीय जीवनात येण्यासाठी धडपडत असल्यामुळेच त्यांच्या मुखी प्रत्येकवेळी राजकारणाची चर्चा असते.

काँग्रेसने केले टिकैत यांच्या टीकेचे समर्थन

काँग्रेसचे प्रवक्त सुरेंद्र राजपूत यांनी टिकैत यांच्या या टीकेचं समर्थन केलं आहे. जिथे कुठे भाजप अडचणीत सापडताना दिसते तिथे ओवेसी त्यांना मदत करताना दिसतात असं राजपूत यांनी म्हटलं आहे. ओवेसी संपूर्ण भाजपचे चाचाजान असून आता भाजपला सांगावं लागेल की ते त्यांच्या चाचाजानकडून काय मदत घेणार आहेत असं राजपूत पुढे म्हणाले.