ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘संगीत मत्स्यगंधा’, ‘गारंबीचा बापू’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘वाऱ्यावरची वरात’ आदी नाटकांसह 100 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपट, मालिकांतून विविधांगी भूमिकांचे आव्हान समर्थपणे पेलणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्या 79 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे.

‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवर कोरोनाची लागण झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आशालता यांच्या जाण्याने चित्रपट आणि नाट्यसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून चतुरस्र अभिनेत्री गमावल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे.

”नाटक आणि सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पडणाऱ्या अभिनेत्री आशालता यांच्या निधनाच्या बातमीने अतीव दुःख होत आहे. मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आमचे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.” – लता मंगेशकर, गानसम्राज्ञी

”संगीत नाटकांपासून सुरू झालेला आशालता यांचा प्रवास बॉलीवूडपर्यंत जाऊन पोहोचला. एकाच गुरूकडे आम्ही अभिनय शिकलो. त्या माझ्या गुरूभगिनी असल्याने त्यांच्या जाण्याचे दु:ख मला जास्त आहे. अशी चतुरस्र, गुणी अभिनेत्री पुन्हा होणे नाही.” – अशोक सराफ, अभिनेते