
सामना ऑनलाईन | लंडन
बर्मिंघमच्या मैदानावर यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात अशेस सिरीजमधील पहिला कसोटी सामना रंगत आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने अशेस कसोटीचा पहिला दिवस गाजवला. इंग्लंडचा संघ वरचढ ठरत असताना स्मिथने एकाकी झुंज देत 144 धावांची झुंजार खेळी केली. दुसरीकडे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने 5 बळी घेत अशेस कसोटी मालिकेच्या इतिहासात 100 बळी घेणार 19 व गोलंदाज होण्याचा मान पटकावला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने प्रथम फलंदाजी घेतली. परंतु बर्मिंघमच्या स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. बंदीच्या कारवाई नंतर पहिलीच कसोटी खेळणारा डेव्हिड वॉर्नर पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे 2 धावांवर बाद झाला. यावेळी प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली.
खराब सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ सावरू शकला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक बळी घेत ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 बाद 122 अशी केली. ऑस्ट्रेलियाचा संघ 150 धावांच्या आता बाद होणार असे वाटत असताना संघाच्या मदतीला स्मिथ धावून आला. स्मिथने तळाचा फलंदाज पीटर सिडल याला हाताशी घेत आधी 150, मग 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. या दोघात नवव्या विकेटसाठी तब्बल 92 धावांची भागीदारी झाली. मोईन अली याने सिडलला बटलरकरवी बाद करत ही जोडी फोडली. यावेळी स्मिथ अर्धशतक ठोकून शतकाच्या जवळ पोहोचला होता.
सिडल बाद झाल्यानंतर स्मिथने डावाची सूत्र आपल्या हाती घेतली. शांत खेळणाऱ्या स्मिथने मग आक्रमक रूप घेतले आणि कसोटीतील आपले 24 वे शतक पूर्ण केले. शतकानंतर स्मिथ अधिक आक्रमक झाला आणि चौकार, षटकार खेचत आपला इरादा स्पष्ट केला. ऑस्ट्रेलिया 300 धावांचा टप्पा ओलांडणार असे वाटत असताना ब्रॉडच्या रका लेग कटरने स्मिथचा त्रिफळा उडवला आणि कांगारूचा डाव 284 धावात आटोपला. बाद होण्यापूर्वी स्मिथने 144 धावांची झुंजार खेळी केली. इंग्लंडकडून ब्रॉडने 5, वोक्सने 3 आणि बेनस्टोक्स व मोईन अलीने प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने बिनबाद 10 धावा केल्या होत्या.




























































